नवी दिल्ली : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कधीच चहा विकला नाही असा खुलासा खुद्द नरेंद्र मोदी यांचे बंधू प्रल्हाद मोदी यांनी केला असून मोदींना चहावाला असून म्हणू नका असे पुन्हा एकदा सांगितले आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेल्वे स्टेशनवर चहा विकल्याचे सतत सांगण्यात येते, नव्हे त्याचे भांडवल देखील करण्यात येत असते. एवढेच काय, स्वतः पंतप्रधान मोदी यांनी देखील अनेकदा स्वतःला 'चायवाला' म्हणवून घेतले आहे. लहानपणी चहा विकणारा एक मुलगा देशाचा पंतप्रधान होतो याचे केवळ भारतालाच नाही तर परदेशात देखील अभिमान वाटत आला आहे. पण त्यांच्या राजकीय विरोधकांनी ही घटना खोटी असल्याचे वारंवार म्हटले आहे. एवढेच काय पण नरेंद्र मोदी हे लहान असताना गुजरातमधील वडनगर हे रेल्वे स्टेशनच अस्तित्वात नव्हते असा देखील आरोप केला जातो. वडनगर रेल्वे स्टेशन १९७३ साली तयार झाले आहे आणि नरेंद्र मोडी यांचा जन्म १९५० साली झाला आहे. हे स्टेशन जेंव्हा सुरु झाले तेंव्हा नरेंद्र मोदी हे लहान नव्हे तर तब्बल २३ वर्षे वयाचे होते आणि त्यांनी तर वयाच्या विसाव्या वर्षी आपले घर सोडले होते. यावर अनेकदा काथ्याकुट झालेला आहे.
नरेंद्र मोदी यांचे बंधू प्रल्हाद मोदी यांनी देखील अनेकदा यावर भाष्य केले असून नरेंद्र मोदी यांनी कधीही चहा विकला नाही असे सांगितले आहे परंतु नरेंद्र मोदी यांच्या नावाला 'चहावाला' हा शब्द चिकटविण्यात येतच आहे. चहाविक्रेते देखील मोठ्या अभिमानाने हे सांगत असतात. प्रल्हाद मोदी यांनी मात्र गेल्या काही वर्षात पुन्हा पुन्हा याबाबत खुलासा केला आहे. आता पुन्हा एकदा त्यांनी याबाबत स्पष्टीकरण केले असून रोखठोकपणे त्यांनी वास्तव आणि वस्तुस्थिती मंडळी आहे. नवी दिल्ली येथे जंतर मंतरवर एका आंदोलनात ते सहभागी झाले होते. अखिल भारतीय रास्त भाव धान्य दुकानदारांच्या फेडरेशनच्या वतीने एक आंदोलन आयोजित करण्यात आले होते. या आंदोलनात प्रल्हाद मोदी सहभागी झाले होते. ते या फेडरेशनचे अध्यक्ष आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी हे एक रेशन दुकान चालवतात. माझा भाऊ पंतप्रधान असला म्हणून काय झाले? मी उपाशी मरु काय ? असा सवाल प्रल्हाद मोदी यांनी अलीकडेच जाहीरपणे केला होता आणि या विधानाची मोठी चर्चाही झाली होती.
यावेळी बोलताना त्यांनी आपले बंधू आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चहा विकण्याच्या विषयावर जोरदार हरकत घेतली आणि नरेंद्र मोदी यांनी कधी चहा विकला नाही हे स्पष्ट केले. 'नरेंद्र मोदी हे चहावाला नाहीत तर चहा विकणाऱ्यांचा मुलगा आहेत. पत्रकार वारंवार त्यांना चहा विकणारा म्हणत असतात ही त्यांची चूक आहे. आमच्या वडिलांनी संपूर्ण आयुष्यभर चहा विकूनच आमचे पाच भाऊ आणि बहिणींचे पालनपोषण केले आहे. आपल्याकडील पत्रकार नरेंद्र मोदी यांनाच 'चहावाले म्हणून लिहितात. लिहायचेच आले तर चहावाल्याचा मुलगा असे लिहा, चहावाला नको' असे प्रल्हाद मोदी यांनी म्हटले आहे. (Prime Minister Narendra Modi did not sell tea)
- अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !