BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

४ ऑग, २०२२

रस्ता नाही म्हणून पाटलाने खरेदी केला घोडा !

 


सोलापूर : शेतात जाण्यासाठी रस्ता नाही म्हणून एका शेतकऱ्याने चक्क घोडाच खरेदी केला आणि त्यावरून आपल्या दुधाचा व्यवसाय सुरु केल्याची एक घटना समोर आली आहे.

 
केवळ राज्यातीलच नव्हे तर देशभरातील रस्ते चकाचक झाले आहेत पण शहरी आणि ग्रामीण भागातील रस्ते मात्र आजही खड्ड्यात शोधावे लागत आहेत.  शहरापर्यंत येणारे रस्ते चकचकीत आहेत पण शहरात पाय ठेवताच तो खड्ड्यातच अधिक पडत असतो. ग्रामीण भागाची तर यापेक्षा देखील कठीण अवस्था आहे. निवडणूक प्रचारात रस्त्याचा मुद्दा केला जातो आणि निवडणूक होताच रस्ता तयार करू असे सांगणारे पुन्हा या गावांकडे फिरकतही नाहीत आणि कधी चुकून फिरकलेच तर त्यांना आपण दिलेल्या आश्वासनाचा सोयीस्कर विसर पडलेला असतो. पुढच्या निवडणुकीत पुन्हा त्याच रस्त्याबाबत आश्वासन दिले जाते. 


शेतकरी बांधवाला शेती करण्याशिवाय पर्याय नाही आणि शेती करण्यात सतत वेगवेगळ्या अडचणी येत असतात. त्यातच रस्ता ही एक प्रमुख समस्या असते आणि गावागावात रस्त्याचा प्रश्न वर्षानुवर्षे भिजत पडलेला असतो. शेताच्या रस्त्यांची तर त्याहून कठीण अवस्था आहे. शेतीमाल काढून आणण्यासाठी अनेक ठिकाणी रस्ताच नसतो, असला तरी तो वादात गुदमरलेला असतो. ऊस पिकवला जातो पण साखर कारखान्याची वाहने ऊसापर्यंत नेता येत नाहीत अशी परिस्थिती असते. 


शेतातील रस्ते हे वर्षानुवर्षे न्यायालयाच्या निकालाच्या प्रतीक्षेत असतात पण जेथे असा मुद्दा नसतो तेथेही शेतकऱ्यास आपल्या शेतात जाण्यासाठी रस्ता शोधावा लागतो. वस्तीवरून गावात दुध घालण्यासाठी यायचे तरी दुध उत्पादक शेतकऱ्याची दुचाकी देखील व्यवस्थित चालावी एवढा रस्ता नसतो. अशाच प्रकारच्या त्रासाला कंटाळून वाळूज येथील एका तरुण शेतकऱ्याने थेट घोडाच खरेदी केला आहे. पेट्रोल- डीझेलचे दर तर परवडत नाही त्यामुळे अनेकांनी वाहतुकीची पर्यायी व्यवस्था केली असताना रस्ता नसल्याने वाळूज येथील माऊली पाटील यांनी थेट घोड्याचीच खरेदी केली आहे.  (As a road problem, the farmer bought a horse) दुधाची वाहतूक देखील ते याच घोड्यावरून करू लागले आहेत.


दुधाचा व्यवसाय करणाऱ्या पाटील यांची शेती वाळूजपासून दोन किमी अंतरावर आहे. वाळूज ते तडवळे असा एक गाडीरस्ता असून हा रस्ता त्यांच्या शेतातून जातो पण या रस्त्याचा काही भाग भोगावती नदीतून जात असल्याने अडचणीचे होते. नदीला पाणी आले की रस्ता बंद होतो. हा रस्ता काळ्या मातीचा असल्यामुळे पाउस झाला की सगळा चिखल होतो आणि या चिखलातून दुचाकी नेणे हे केवळ अशक्य होते. शेतापर्यंत वाहन नेताच येत नाही त्यामुळे ठरलेली सगळी कामे अडकून पडतात आणि त्याला काही पर्यायही नसतो. शेतातून साठ ते सत्तर लिटर दूध डोक्यावरून देखील नेता येत  नाही त्यामुळे पाटील यांनी घोडा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आणि एक घोडा त्यांनी विकत घेतला. 


माऊली पाटील आता याच घोड्यावरून दुधाची वाहतूक करीत आहेत. दुधाचे कॅन ते याच घोड्याच्या पाठीवर टाकतात आणि गावात येऊन डेअरीला दूध घालतात. पाटील यांचे शेजारी सचिन मोटे हे बैलगाडीच्या मदतीने दुधाची वाहतूक करीत असतात. देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि अनेक पुढाऱ्यांनी रस्त्यांच्या केवळ गप्पाच मारल्या पण शेतकरी बांधवांची ही अवस्था कायम आहे. निवेदने दिली जातात, आश्वासने ऐकली जातात पण रस्त्यासारखा सामान्य प्रश्न घेऊन आजही शेतकऱ्यांना सरकारचे उंबरठे झिजवावेच लागतात हे एक मोठे दुर्दैवी वास्तव आहे.   


  • अधिक बातम्यांसाठी       येथे क्लिक        करा !


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !