BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१८ ऑग, २०२२

पेट्रोलचा टँकर उलटला, सतर्क पोलिसांमुळे अनर्थ टळला !

 



पंढरपूर : अचानक टायर फुटून पेट्रोलचा टँकर उलटला आणि पेट्रोल डिझेलची गळती सुरु झाली, परंतु काही दुर्घटना होण्यापूर्वीच पोलिसांनी सतर्कता दाखविल्याने संभाव्य अनर्थ टाळला आणि  टळला गेला आहे. 


पेट्रोल हे अत्यंत ज्वालाग्रही असल्यामुळे कुठल्याही क्षणी मोठा भडका उडण्याची आणि मोठी आग लागण्याची शक्यता असते. साध्या ठिणगीचाही संपर्क आल्यास पेट्रोल आग पकडत असते. पेट्रोल वाहातून करणाऱ्या वाहनाचा अपघात झाल्यावर तर हा धोका अधिकच वाढत असतो. त्यामुळे अशा वेळी तातडीने अत्यंत सतर्कता बाळगणे आवश्यक असते . पंढरपूरकडून अकलूजकडे निघालेला पेट्रोलचा एक टँकर ( एम एच १२ /१२०२) आज दुपारी पंढरपूर तालुक्यातील भंडीशेगावजवळ उलटला. हा अपघात होताच टँकरमधील पेट्रोलची गळती सुरु झाली. (
A petrol tanker overturned in Pandharpur taluka) या घटनेची माहिती पंढरपूर ग्रामीण पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी धावत सुटले आणि दक्षतेचे उपाय योजले. त्यामुळे संभाव्य अनर्थ टळला. 

  
नुकतेच शेतात मशीनमध्ये पेट्रोल भरीत असताना पेटलेल्या बिडीमुळे एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली होती.  थोड्याशा स्पार्किंगने देखील पेट्रोलचा भडका उडून मोठा अनर्थ घडू शकतो पण हा अपघात झाल्यावर वेगळेच चित्र दिसले. पेट्रोलची गळती सुरु होताच आजूबाजूच्या नागरिकांनी धाव घेतली आणि बाटली, ड्रम अशा मिळेल त्या पद्धतीने पेट्रोल घेण्यास सुरुवात केली. वास्तविक हा अत्यंत धक्कादायक प्रकार होता. पेट्रोलचा टँकर उलटल्यावर नागरिकांनी तेथून दूर जाण्याऐवजी फुकटच्या पेट्रोलच्या मोहापोटी मोठा धोका पत्करला जात होता. दरम्यान घटनास्थळी पोलीस दाखल झाले आणि पोलिसांना पाहताच या नागरिकांनी तेथून पळ काढला. 


पोलीस तेथे पोहोचताच त्यांनी काही अनुचित घडू नये यासाठी सतर्कता बाळगली. आजूबाजूला कुणी चुकूनही विडी, सिगारेट पेटवू नये अथवा काडी ओढणार नाही याची दक्षता घेतली. तातडीने क्रेन मागवून उलटलेला टँकर व्यवस्थित करण्यात आला. ट्रॅकर सरळ केल्यानंतर पेट्रोलची गळती थांबली. पंढरपूर ग्रामीण पोलिसांनी अत्यंत त्वरेने धाव घेत दक्षता घेतल्यामुळे मोठा अनर्थ टळला असून बाटली, ड्रममधून पेट्रोल नेणाऱ्या नागरिकांच्या धाडसाबाबत आणिबेपर्वाईबाबत मात्र मोठी चर्चा होऊ लागली आहे. फुकटच्या पेट्रोलच्या मोहात मोठा अनर्थ घडण्याचीही शक्यता होती परंतु पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने सुदैवाने अशी काही दुर्घटना घडली नाही.


'पेट्रोल' सुद्धा ?    

फळांची वाहतूक करणारे वाहन उलटले की फुकटची  फळे पळविण्यासाठी फुकट्याची गर्दी उसळते हे नेहमी आढळून येथे परंतु पेट्रोल सुद्धा ? अलीकडेच दारूच्या बाटल्याची वाहतूक करणारा ट्रक उलटला होता आणि बाजूलाच ड्रायव्हर जखमी अवस्थेत पडला होता. गर्दी झाली पण एकानेही चालकाला रुग्णालयात दाखला करण्याची तसदी घेतली नव्हती.  जो तो बाटल्या लांबाविण्यासाठीच धावत होता. या घटनेने माणुसकीचाही अपघात झाल्याचे दिसून आले होते.  इथे तीव्र ज्वलनशील पेट्रोल असताना आणि काहीही धोका होण्याची शक्यता दिसत असताना पेट्रोलचा मोह होतच राहिला. काही अनुचित घडले असते तर ...?



अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !