BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

५ ऑग, २०२२

ग्रामपंचायतीवर पहिल्यांदाच आले महिला राज !

 



मंगळवेढा : ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालांची चर्चा सुरु झाली असतानाच सोलापूर जिल्ह्यातील एका ग्रामपंचायतीवर महिला राज अवतरले असून येथील संपूर्ण कारभार महिलांच्याच हाती गेला आहे.

 
महिला सक्षमीकरणाची आणि महिलांना राजकीय आरक्षणाची आवश्यकता नेहमी पटवून दिली जाते. आरक्षण असल्यामुळे महिलांना निवडणुकीत स्थान मिळू लागले असून महिला देखील चांगल्या प्रकारे काम सांभाळू लागल्या आहेत. सर्वच पदांवर महिलांचा प्रभाव आता पुरुषप्रधान संस्कृतीने देखील मान्य केला आहे. तथापि कुठल्याही निवडणुकीत सर्वच्या सर्व जागा महिलांना मिळण्याचे उदाहरण दिसत नाही. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील सलगर खुर्द या गावाने मात्र महिलांचा आगळावेगळा सन्मान केला असून संपूर्ण ग्रामपंचायत महिलांच्या हाती दिली आहे. मंगळवेढा तालुक्यातील हे गाव तालुक्याच्या एका टोकाला असले तरी राज्याचे लक्ष आता वेधले गेले आहे. 


गावाच्या इतिहासात पहिल्यांदाच ग्रामपंचायत पूर्णपणे महिलांच्या ताब्यात गेली आहे. नव्याने निवडणूक आलेल्या सर्व महिला सदस्या असून विद्यमान सरपंच देखील महिलाच आहेत. या महिला सरपंचांचा कारभार काही महिनेच उरला असला तरी त्यानंतर नव्या सरपंच देखील महिलाच असणार आहेत. या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण सर्वसाधारण महिलासाठीच आहे त्यामुळे सदस्यपदाच्या सर्व जागांवर महिला उमेदवारानीच अर्ज दाखल केले होते. सात जागांच्या या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत दोन महिला आधीच बिनविरोध निवडून आलेल्या आहेत. उरलेल्या पाच जागांवर देखील महिला सदस्य निवडून आलेल्या आहेत त्यामुळे या ग्रामपंचायतीचा संपूर्ण कारभार महिलाच सांभाळणार आहे. हा एक दुर्मिळ योगायोग आहे. 


अंजली बिभीषण पाटील, साळूबाई ज्ञानोबा मासाळ, चिमाबाई महादेव बेलदार, मनीषा रमेश ओलेकर, आरती अजय कांबळे, संध्याराणी विलास काटकर, द्रोपदा अरविंद पाटील या महिला सदस्या यापुढे सलगर खुर्द ग्रामपंचायतीचा कारभार सांभाळणार आहेत. ही एक कौतुकाची बाब मानली जात असून महिलांना आपली कामाची चमक दाखविण्याची एक नामी संधी आली आहे. प्रत्यक्ष निवडणूक कितीही चुरशीची झाली असली आणि कुणीही निवडून आले तरी महिला सदस्याच निवडून येणार होत्या. पुरुष मंडळीना यावेळी सदस्य होता आले नाही आणि महिलांना ही संधी प्राप्त झाली.  


अनकेदा निवडून आलेल्या महिलांचे पती त्यांना काम करू देत नाहीत, प्रत्येक कामात पतींचा हस्तक्षेप असतो त्यामुळे  या नवनिर्वाचित महिलांचे पती कितपत हस्तक्षेप करतात यावर बरेच काही अवलंबून आहे. ( First time only women came to power on the Gram Panchayat) पत्नी निवडून येते पण पतीच मिरवत असतो असे अनेक ठिकाणी पाहायला आणि अनुभवायला मिळते, आता या गावात काय घडतेय ते पुढील काळात दिसून येणार आहेच पण सद्या मात्र सलगर खुर्द गावाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.  या गावाने खऱ्या अर्थाने नारी शक्तीचा सन्मान केला आहे. 


  • अधिक बातम्यांसाठी       येथे क्लिक        करा !


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !