पंढरपूर : दिवसभर गोळा झालेला सोन्याचा चुरा घेवून कामगार पळून गेला असून यामुळे मालकास अडीच लाखांचा गंडा बसला आहे. सदर प्रकरणी पंढरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुकानात चोरी होऊ नये म्हणून विशेष लक्ष दिले जाते आणि तशी काळजीही घेतली जाते. तरीही काही भामटे ग्राहकांच्या भूमिकेत दुकानात शिरतात आणि हातचलाखी करीत दुकानातील किमती माल हातोहात चोरून नेतात, अलीकडे हे प्रकार सीसीटीव्ही मध्ये चित्रित होतात त्यामुळे केलेली अफलातून हातचलाखी पाहायला देखील मिळू लागली आहे. दुकानदार ग्राहकांच्या हालचालीवर लक्ष आणि नियंत्रण ठेवतात पण दुकानातील कामागारानेच बेईमानी केली तर दुकानदार नक्कीच अडचणीत येतो. असाच प्रकार पंढरपूर येथे घडला असून मशीनवर पडलेला सोन्याचा कीस (चुरा) घेवून हा कामगार पळाला आहे. (Pandharpur Crime) या चुऱ्याची किंमत अडीच लाखावर आहे.
पंढरपूर येथील येळे वस्तीच्या परिसरात समाधान बजरंग सावंत यांचे श्रावणी मनी आर्ट हे सोन्याचे मणी डिझाईन करण्याचे दुकान आहे. या दुकानात सहा कामगार काम करीत आहेत. येथे मशीनवर सोन्याचे डिझाईन करण्यात येते. मशीनवर हे काम केले जात असताना सोन्याचा चुरा पडत असतो. या चुऱ्याची किंमत देखील मोठी असते. सावंत यांच्या दुकानात काम करणाऱ्या एस. के. अमिरूल इस्लाम नावाच्या कामगाराने या सोन्याच्या चुऱ्यावरच डल्ला मारला आणि बेपत्ता झाला आहे. (Gold design worker escapes by stealing) अडीच लाख रुपये किमतीचा ५५ ग्राम ८६० मिली वजन असलेला चुरा घेवून त्याने पोबारा केला असल्याची तक्रार सावंत यांनी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात केली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
दिवसभर या कामगाराने मशीनवर सोन्यावर डिझाईन करण्याचे काम केले. हे काम करीत असताना दिवसभर मशीनवर पडलेला अडीच लाख रुपये किमतीचा सोन्याचा चुरा घेवून, कुणालाही काही न सांगता हा कामगार बेपत्ता झाला आहे. पळून गेलेला कामगार हा कोलकाता येथील असून दुकानातील अन्य पाच कामगार हे सांगली जिल्ह्यातील आहेत. पळून गेलेला कामगार हा मागील आठ महिन्यापासून सावंत यांच्याकडे काम करीत होता, घराच्या बांधकामासाठी म्हणून त्याने ६५ हजार रुपयांची उचल देखील घेतलेली होती. सावंत हे त्याला दर महिन्याला १८ हजार रुपयांचा पगार देत होते शिवाय त्याच्या जेवण्याची देखील व्यवस्था केली होती.
- अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !