नांदेड : वऱ्हाडाच्या टेम्पोला भीषण अपघात होऊन नव्या नवरीसह आठ जणांचा मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना भोकर ते हिमायतनगर मार्गावर घडली आहे.
भोकर तालुक्यातील सोमठाणा ते राजवाडी पाटीच्या दरम्यान ओव्हरटेक करण्याच्या नादात हा अत्यंत भीषण असा अपघात झाला आहे. मेक्सिको प्रवासी वाहन आणि ४०७ टेंपो यांच्या झालेल्या अपघातात वाहनांचा तर चक्काचूर झाला आहे पण नवरीसह आठ जणांना या अपघातात प्राण गमवावा लागला आहे. जारीकोट येथील विवाह सोहळा उरकून वऱ्हाडी मंडळी उमरखेड तालुक्यातील साखरा येथे निघालेले असताना वाटेत हा अपघात झाला. टेंपो आणि मॅजिक वाहनांची समोरासमोर जोराची धडक झाली आणि ही दुर्घटना घडली आहे.
विवाह समारंभ आटोपून परत येत असताना झालेल्या या अपघातात २१ वर्षे वयाची नववधू पूजा ज्ञानेश्वर पामलवार हिच्यासह तिचा भाऊ दत्ता पामलवार यांच्यासह एकूण आठ जण ठार झाले आहेत तर अन्य पाच जण गंभीररित्या जखमी झालेले आहेत. या जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. नव्या घराचा उंबरठा ओलांडण्याआधीच हे जग सोडून जाण्याची वेळ नवरीवर आल्याने प्रचंड हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मोठ्या उत्साहात आणि आनंदात विवाह सोहळा साजरा करण्यात आला आणि घरी पोहोचण्याच्या आधीच मृत्यूने गाठले. या दुर्घटनेमुळे परिसरात प्रचंड शोकाकुल वातावरण झाले असून लग्नाचा आनंद शोकात परिवर्तित झाला आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !