BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१५ ऑग, २०२२

आ. विनायक मेटे यांच्या आईनेही घेतला अपघाताबाबत संशय !

 





शोध न्यूज : आमदार विनायक मेटे यांचा अपघात आहे की घातपात आहे ? याबाबत चौकशीची मागणी होत असताना त्यांच्या आईनेही अपघाताबाबत संशय उपस्थित केला आहे, दरम्यान 'त्या" ट्रकचा शोध पोलिसांना लागला आहे. 


आमदार विनायकराव मेटे यांचा काल सकाळी भल्या अपघाती मृत्यू झाला आहे. पुणे - मुंबई द्रुतगती मार्गावर हा अपघात झाला असून त्यांच्या वाहनांची परिस्थिती पाहता अपघात हा मोठा होता पण या अपघातातून या गाडीचा  चालक बचावला आहे. एकटे आ. मेटे यांचाच मृत्यू झाला आहे. (Mete's accident suspicious) काल सकाळी या अपघाताची बातमी येताच महाराष्ट्र हादरला. राजकीय वर्तुळातून आणि मराठा संघटनाकडून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. अपघातानंतर मात्र काही वेळेतच या अपघाताबाबत शंका उपस्थित करणे सुरु झाले आणि पोलिसांनी देखील त्या दिशेनेही तपास सुरु केला आहे. 

 

  • स्व. विनायक मेटे यांच्या मातोश्रींनी देखील हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे त्यामुळे घटनेचे गांभीर्य अधिक वाढले आहे ! अपघातातील ट्रक हा पालघर जिल्ह्यातील आहे. चालक हा गुजरात मधील कांसा या गावचा आहे !


अपघाताच्या या घटनेबाबत संशयाचे धुके अधिक गडद होत असले तरी पोलीस तपासात सगळ्या बाबी समोर येणार आहेतच पण राज्यात याबाबत  मोठी चर्चा सुरु झाली आहे आणि काही प्रश्न देखील उपस्थित होऊ लागले आहेत. प्रचंड वर्दळीचा रस्ता असताना अपघातग्रस्तांना कसलीही मदत मिळाली नाही. एवढी मोठी घटना घडून पोलीस देखील वेळेत पोहोचले नाहीत,  वेळेत मदत न मिळणे ही बाब शंकास्पद असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे या घटनेला वेगळे वळण लागते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. 


आ. विनायक मेटे यांची गाडी ज्या ट्रकला धडकली तो ट्रक तेथे न थांबता पळून गेला, या ट्रकचे फुटेज देखील पोलिसांना मिळाले आणि आता या ट्रकची आणि ट्रकचालकाची ओळख देखील पटली आहे.  मेटे यांची कार ट्रकला पाठीमागून धडकली आहे.  आठ पथकाच्या मदतीने या घटनेची चौकशी सुरु करण्यात आली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील चौकशीचे आश्वासन दिलेले होते. सदर ट्रकचा क्रमांक  DN 09/ 9404 असा असून उमेश यादव असे या ट्रक चालकाचे नाव आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून ट्रकची ओळख पटविण्यासाठी ट्रक मालकाला देखील सोबत घेवून पोलिसाचे पथक गुजरातला गेले. ट्रकचालक ट्रक घेवून फरार झाल्याचे ट्रकमालकाने सांगितले आणि त्यांच्या मदतीने ट्रक जप्त करून चालक उमेश यादव याला दमणमधून अटक केली आहे.


आ. विनायक मेटे यांचा अपघात होताच प्रारंभी त्यांच्याच  कार्यकर्त्यांकडूनच या अपघाताबाबत संशय व्यक्त केला गेला आणि चौकशीची मागणी  करण्यात आली. त्यानंतर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी शंका व्यक्त करीत अचानक झालेल्या या घटनेची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे. नुकतीच राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होऊन सत्तांतर घडले आहे. राज्यात ही मोठी घडामोड सुरु असतानाही विनायक मेटे यांच्यासारख्या नेत्यांनी याबाबत एका शब्दानेही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नव्हती. कसली प्रतिक्रियाही त्यांनी दिली नाही परंतु आता अचानक त्यांना मुंबईला बैठकीसाठी म्हणून बोलावण्यात आले. मेटे याना नेमके कुणी मुंबईला बोलावले होते ? कशासाठी बोलावले होते? याबाबत देखील चौकशी झाली पाहिजे अशी मागणी खा. अरविंद सावंत यांनी केली आहे. 

 

आमदार विनायक मेटे यांच्या या अपघाताबाबत शंका उपस्थित झाल्या असून याबाबत चौकशी करण्याची मागणी देखील होत आहे. आ. मेटे यांचा हा अपघात हा अपघातच आहे की घातपाताची घटना आहे याबाबत पोलिसांच्या चौकशीनंतरच सत्य समोर येणार आहे.(MLA Vinayak Mete's mother also suspected about the accident) कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी यांनी अपघाताबाबत शंका घेऊन चौकशीची मागणी केलीच पण आता स्व. विनायक मेटे यांच्या आईनेच तशा प्रकारची शंका उपस्थित केल्याने या संशयाला अधिक बळ मिळाले आहे. 


मराठा नेत्यांची मागणी  

अपघाताबाबत संशयाचे वादळ उठले असताना मराठा आंदोलनातील नेत्यानाही घातपाताचा संशय आहे.  मंत्रालयातून शनिवारी मेटे यांना दोन वेळा फोन आले होते. आधी ही बैठक रविवारी दुपारी चार वाजता ठरली होती आणि नंतर सायंकाळी सात वाजता त्यांना पुन्हा फोन आला आणि ही बैठक दुपारी १२ वाजता असल्याचे सांगितले गेले. 'आपण बीड येथे असून एवढ्या तातडीने कसे पोहोचता येईल' असे आमदार मेटे म्हणाले परंतु तातडीने मुंबईला येण्यासाठी त्यांच्यावर कुणी दबाव टाकला? असे प्रश्न मराठा आंदोलनाचे नेते दिलीप पाटील यांनी उपस्थित केले असून चौकशीची मागणी देखील केली गेली आहे. 


आज अंत्यसंस्कार !

स्व. विनायक मेटे यांचे पार्थिव बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील त्यांच्या राजेगाव या मूळगावी दाखल झाले असून आज दुपारी ३ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस हे देखील यावेळी उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासोबत राज्यभरातील अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. 





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !