BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

४ ऑग, २०२२

पंढरपूर तालुक्यात पुन्हा बिबट्याची दहशत !

 


पंढरपूर तालुक्यात पुन्हा एकदा बिबट्याची दहशत निर्माण झाली असून पटवर्धन कुरोली परिसरात बिबट्यासदृष्य प्राणी दिसल्यामुळे ही घबराट उडाल्याचे दिसत आहे. 


गेल्या दोन वर्षांपासून पंढरपूर तालुक्यात विशेषत: वाखरी, पटवर्धन कुरोली, देवडे या परिसरात बिबट्यासदृष्य प्राणी दिसल्याचे सांगितले जात असताना अद्याप तरी याबाबत स्पष्टता आलेली नाही. करमाळा तालुक्यात बिबट्याने अशीच दहशत माजवली होती. उसाच्या फडात त्याचे आस्तित्व जाणवत होते तसेच इतरत्र देखील त्याच्या काही खुणा आढळून येत होत्या. काही प्राण्यांची  शिकार देखील केल्याचे आढळून आले होते, तसा प्रकार पंढरपूर तालुक्यात देखील आढळून आलेला होता. करमाळा तालुक्यात बिबट्याला ठार मारले गेले परंतु तेंव्हापासून शेतकरी अधिक धास्तावले आहेत. पंढरपूर, मोहोळ तालुक्यात बिबट्यासारख्या प्राण्याचे दर्शन झाल्याचेही सांगण्यात येत होते. आता पुन्हा एकदा पंढरपूर तालुक्यात बिबट्यासदृष्य प्राण्याचे आस्तित्व जाणवू लागले आहे. 


पंढरपूर तालुक्यातील पटवर्धन कुरोली, देवडे या परिसरात रात्रीच्या वेळेस बिबट्यासारखा प्राणी काही शेतकऱ्यांना दिसला असल्याचे सांगितले गेले. या घटनेची चर्चा परिसरात झाली आणि त्यामुळे परिसरातील शेतकरी धास्तावले आहेत. देवडे येथील राहुल सोनटक्के हे पांडुरंग गायकवाड यान दवाखान्यात घेवून निघालेले असताना बिबात्यासारखा एक प्राणी रस्ता ओलांडून पटवर्धन कुरोली नदीपात्राकडे जाताना दिसल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी आजूबाजूच्या शेतकऱ्यांना फोन केला आणि याबाबतची माहिती देवून इतरांना सावध केले. यामुळे शेतकरी देखील घाबरून गेले आणि त्यांनी रात्रभर गस्त घालून जनावरांचे तसेच घरांचेही संरक्षण केले. दुसऱ्या दिवशी म्हणजे काल बुधवारी वन विभागाने या परिसरात पाहणी केली, यावेळी त्यांना पावलांचे काही ठसे देखील आढळून आले आहेत. 


वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घेतलेले ठसे हे बिबट्यासारख्या हिंस्र प्राण्याचे आहेत असे देखील सांगितले जात आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनातील भीती आणखीच वाढली आहे. सदर ठसे वरिष्ठ वन अधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आले असून त्याच्या तपासणीनंतर हे ठसे नेमके कोणत्या प्राण्याचे आहेत हे समजू शकणार आहे परंतु पटवर्धन कुरोली, देवडे परिसरात पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान वन विभागाने या परिसरातील नागरिक आणि शेतकरी यांना सावधगिरी बाळगण्याच्या सूचना दिल्या आहेत. (Leopard terror again in Pandharpur taluka) रात्री शेतात जाण्यास किंवा वस्तीवर राहण्याची देखील भीती वाटू लागली असून वन विभागाने शक्य तितक्या लवकर याबाबत स्पष्टता करण्याची गरज निर्माण झाली आहे. प्रत्यक्षात बिबट्या असेल अथवा नसेल पण दहशत मात्र बिबट्याचीच निर्माण झाली असल्याचे दिसत आहे.     


  • अधिक बातम्यांसाठी       येथे क्लिक        करा !


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !