BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२६ ऑग, २०२२

चेअरमन अभिजित पाटील यांच्यासह इतरांचीही चौकशी !

 



शोध न्यूज : डिव्हीपी उद्योग समूहाचे प्रमुख आणि विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांच्यासह त्यांच्या निकटवर्तीयांची देखील आयकर विभाग चौकशी करीत असल्याची माहिती मिळू लागली आहे. 


विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांच्या घर, कार्यालयावर काल सकाळीच आयकर विभागाचे अधिकारी धडकले. आयकर विभागाने अचानक टाकलेल्या या धाडीची चर्चा पंढरीत सुरु होवू लागली असतानाच त्यांच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील धाराशिव साखर कारखान्यावर देखील अशीच धाड पडली असल्याची माहिती बाहेर आली. त्यामुळे अभिजित पाटील हे आयकर विभागाचे 'टार्गेट' आहेत हे दिसून येवू लागताच त्यांच्या नाशिक जिल्ह्यातील कारखान्यावर देखील धाड पडल्याची माहिती आली. आयकर विभागाने सर्व ठिकाणी एकाच वेळी धाडी घातल्या आहेत. 


राज्यात आयकर विभागाने धाडी टाकण्याची मोठी कारवाई केली असून एकाच दिवशी २५ ठिकाणी हे छापे घालण्यात आले आहेत. या कारवाईत पन्नास अधिकाऱ्यांनी ४८ वाहने वापरली आहेत, या कारवाईत साखर उद्योजक आणि वैद्यकीय व्यावसायिक यांना 'लक्ष्य' बनविण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी अशा धाडी जालना जिल्ह्यात पडल्या होत्या आणि काही दिवस तपासणी करून कोट्यावधी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. आता कालपासून सुरु झालेल्या धाडसत्रात आयकर विभागाच्या हाती काय येतेय याकडे उभ्या महाराष्ट्राचेच लक्ष लागले आहे. 


  • स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सचिन पाटील यांची  चौकशी आयकर विभागाकडून करण्यात येत अशी चर्चा सुरु झाली परंतु तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांनी 'आपण अभिजीत पाटील यांना भेटण्यासाठी आलो होतो' असे सांगितले आहे. 


काल सकाळी सोलापूर  जिल्ह्यात विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांच्या घरी आणि अन्य ठिकाणी आयकर विभागाने छापेमारी सुरु केली तर सोलापूर प्रसिद्ध डॉक्टर आणि बांधकाम व्यावसायिक यांच्यावर छापे टाकण्यात आले. काल भल्या सकाळी ही कारवाई सुरु झाली असून अजूनही ती सुरूच आहे. ही कारवाई आणखी किती काळ सुरु राहील हे सांगता येत नाही. या कारवाईमुळे सोलापूर जिल्ह्यात मात्र खळबळ उडाली आहे. साखर व्यवसायातील अभिजित पाटील यांना टार्गेट करण्यात आल्यामुळे या क्षेत्रातील अनेकांनी धसका घेतला असल्याचे दिसत आहे. 


आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी अभिजित पाटील यांच्या विविध ठिकाणी तपासणी सुरु ठेवलीच आहे पण त्यांच्या संबंधित काही लोकांची देखील चौकशी सुरु केली आहे. पाटील यांच्या विविध संस्थांची बारकाईने चौकशी आणि तपासणी तर केली जातच आहे पण त्यांच्याशी निगडीत असलेल्या अन्य काही घटकांची देखील चौकशी आयकर अधिकारी करू लागले आहेत. यात व्यापारी, कारखान्याचे संचालक आणि संबंधित शेतकरी यांना देखील आयकर विभागाने चौकशीसाठी बोलावण्यात आल्याची मोठी माहिती समोर आली आहे. (Investigation of persons related to sugar factory with Abhijit Patil) तपासणी केलेल्या कागदपत्रांच्या आधारे आयकर विभागाला आवश्यक वाटेल त्यांच्याकडे अधिकाऱ्यांचा कटाक्ष जाऊ लागला आहे . यामुळे अनेकांना धडकी भरली आहे. 


कालपासून सुरु असलेल्या या धाडसत्रात अधिकाऱ्यांच्या हाती काय लागले याची माहिती दिली जात नाही पण हे धाड सत्र अखंड सुरूच आहे. या कारवाईबाबत मोठी गोपनीयता पाळली जात आहे त्यामुळे नेमकी काहीच माहिती बाहेर येत नाही.  नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील विठेवाडी येथेही अभिजित पाटील यांचा 'धाराशिव साखर कारखाना लि. युनिट -२ ' संचालित वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना आहे. तेथेही प्राप्तीकर विभागाने धाड घातलेली आहे. धाराशिव कारखाना व्यवस्थापनाने हा कारखाना २५ वर्षांसाठी भाडेतत्वावर घेतला आहे आणि अभिजित पाटील हेच या कारखान्याचे अध्यक्ष आहेत.   


अभिजित पाटील यांनी गेल्या काही वर्षात मोठी प्रगती केली असून विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर एकहाती सत्ता संपादित केली आहे तर सांगोल्याचा बारा वर्षांपूर्वी बंद पडलेला साखर कारखाना सुरळीत केला आहे. त्यांचे राजकीय वलय वाढत चाललेले असतानाच ही  मोठी कारवाई सुरु झाली आहे. सोलापूर जिल्ह्यात अनेक साखर कारखाने आहेत परंतु अभिजित पाटील यांच्यावरच ही कारवाई कशामुळे झाली आहे असा प्रश्न उपस्थित झाला आहे. चौकशी पूर्ण झाल्यावरच याबाबत काही माहिती समोर येण्याची शक्यता आहे.  


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !