शोध न्यूज : 'ताई, पाणी द्या हो' असं म्हणत दारात येवून आणि पुन्हा घरात घुसून डोळ्यादेखत चोरी करून पसार झाल्याची एक घटना समोर आली आहे. अशाच प्रकारची एक घटना सोलापुरातही नुकतीच घडली होती.
घर सुरक्षित असे म्हटले जाते पण आता एकट्या महिलाही घरात सुरक्षित नाहीत आणि घरातील मालमत्ताही असुरक्षित असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. बारामती तालुक्यात आंबे बुद्रुक या गावात भर दिवसा ही घटना घडली आहे. रंजना भाऊसाहेब जगताप या महिलेने याबाबत पोलिसात फिर्याद दिली असून पोलीस देखील अवाक झाले आहेत. भरदिवसा घर लुटण्याचा एक वेगळाच फंडा चोरांनी शोधून काढला आहे. या घटनेने परिसरातील लोक देखील भयभीत झाले असून घरात थांबणाऱ्या महिलांना देखील असुरक्षित वाटू लागले आहे.
रंजना जगताप या महिलेचे पती शेतात गेले होते. त्यामुळे एकट्याच घरात असलेल्या रंजना आपले घरातील काम आटोपून थांबल्या होत्या. भर दुपारी त्यांच्या घरी एक व्यक्ती आला आणि पाणी मागू लागला. महिलेने दरवाजा बंद केलेला होता आणि सेफ्टी लॉक देखील लावलेले होते. महिलेने आतूनच 'कोण आहे?' अशी विचारणा केली तेंव्हा या व्यक्तीने 'मी आबा आहे' असे सांगितले. आपल्या नात्यातील आबा आले असावेत असे समजून महिलेने दरवाजा उघडला आणि पाणी दिले. याच दरम्यान आणखी दोघे घरी आले.
या 'आबा' ला महिलेने ओळखले नव्हते आणि पाठीमागून आलेले लोक देखील अपरिचित आणि शंकास्पद वाटून गेले. महिलेला शंका येताच त्या घरात जाऊन दरवाजाचे सेफ्टी लॉक लावू लागल्या. एवढ्यात त्या दोघांनी या महिलेला जोराने ढकलून दिले आणि चाकूचा धाक दाखवायला सुरुवात केली. महिलेच्या अंगावरील, घरातील दागिने आणि रक्कम काढून देण्यास त्यांनी सांगितले. घाबरून गेलेल्या या एकट्या महिलेने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. 'ओरडलीस तर जिवंत ठेवणार नाही' अशी धमकी देवून त्यांनी या महिलेला गप्पा बसण्यास भाग पाडले.
घाबरलेली महिला भीतीने गप्प होताच त्यांनी तिच्या गळ्यातील मंगळसूत्र, कर्णफुले, अंगठी असे दागिने काढून घेतले. तेवढ्यावर त्यांचे समाधान झाले नाही. त्यांनी 'घरातले पैसे कुठे ठेवलेत? आम्हाला काढून दे" असे धमकावले. (Theft by entering the house asking for water) एकटी असणारी महिला घाबरलेल्या अवस्थेत कपाटाकडे निघाली असता हे भामटे तिच्या मागे जात तिला ढकलून दिले आणि कपाटातील १३ हजार रुपये, सोफ्यावर ठेवलेला मोबाईल घेवून पसार झाले. जाताना त्यांनी दरवाजाला बाहेरून कडी लावली.
दागिने, रोख रक्कम आणि मोबाईल असा १ लाख ३३ हजाराचा ऐवज भरदिवसा लुटून हे चोर दुचाकीवरून पसार झाले. ही घटना नंतर परिसरात समजली तेंव्हा घराघरात भीतीचे वातावरण तयार झाले. दिवसाढवळ्या चोर घरात घुसून असे प्रकार करीत असतील तर सगळीच सुरक्षा धोक्यात आल्याची भावना नागरिकांची झाली आहे. (Baramati Crime) विशेषत: महिला वर्गात घबराट पसरली असून महिलांनी दिवसभर घरात कोंडून घ्यावे काय ? असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.
महिलांनीही लुटले-- !
सोलापूर येथेही नुकतीच अशी एक घटना घडली आहे, भाजी भाकरी मागत काही महिला घरात शिरल्या आणि घरातील रोकड, दागिने घेवून त्या निघून गेल्या. सोलापूर शहरात अक्कलकोट रोडवरील एमआयडीसीमधील नीलम नगर येथे घडली. मोहन येलगटी यांच्या घरात चार अनोळखी महिला आल्या. भिकारी असल्याचे दाखवत या महिलांनी येलगटी यांची बहिण वैष्णवी यांना 'आपल्याला भूक लागली असून भाजी भाकरी द्या, पाणी द्या' अशी मागणी केली. केवळ एवढी मागणी करून त्या थांबल्या नाहीत तर त्यांनी वैष्णवी यांना बोलण्यात गुंतवले. इकडच्या तिकडच्या गप्पा मारून वैष्णवी यांचे लक्ष वेधले. वैष्णवी बोलण्यात गुंतल्याचे पाहून यातील दोन महिलांनी कपाटातील सोन्याचे दागिने आणि दीड लाख रुपये अत्यंत चलाखीने काढून घेतले आणि तेथून पसार झाल्या.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !