BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२७ ऑग, २०२२

महिलेच्या पोटातून आतडी आली बाहेर !

 




शोध न्यूज : प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून शस्त्रक्रियेत काही घोटाळा झाल्यामुळे महिलेच्या पोटातील आतडी बाहेर आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 


सामान्य जनतेला आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी शासनाने एका तालुक्यात अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रांची व्यवस्था केलेली आहे. शिवाय तालुक्याच्या ठिकाणी एक रुग्णालय थाटले आहे परंतु सरकारी दवाखान्याबाबत जनमत काय आहे हे प्रत्येकालाच माहित आहे. सरकारी दवाखान्यातील डॉक्टर आणि इतर कर्मचारी यांचे त्रासदायक अनुभव आल्याच्या अनेक तक्रारी होत असतात आणि रुग्णाचे नातेवाईक सरकारी रूग्णालयाऐवजी खाजगी रूग्णालयालाच प्राधान्य देत असतात. अगदी नाईलाज असेल तरच धाडस करून सरकारी आरोग्य केंद्रात रुग्ण जात असतो.  सरकारी आरोग्य केंद्राची प्रतिमा सुधारणे आवश्यक असताना काही ना काही वेगळ्याच घटना समोर येतात. मंगळवेढा तालुक्यातील घटनेने तर अनेकांना धक्का बसला आहे. 


कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया झालेल्या एका महिलेची आतडी पोटातून बाहेर आली आणि तिला पुन्हा सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मंगळवेढा तालुक्यातील भोसे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात या महिलेवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात आली परंतु यावेळी काही त्रुटी राहिल्यामुळेच ही घटना घडली असल्याचा आरोप रुग्ण महिलेच्या नातेवाईकानी केला आहे. आरोग्य विभागाने मात्र रस्त्यावरील खड्ड्यामुळे हे घडले असल्याचे म्हटले आहे. सदर महिलेच्या शस्त्रक्रियेत कोणतीही चूक झालेली नाही, टाके ओले असताना रस्त्यावरील खड्डे, खराब रस्त्यावर बसणारे हादरे, जोराने खोकला आल्यास अथवा वजन उचलल्यामुळे काही महिलांना असा त्रास होऊ शकतो असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. 


मंगळवेढा तालुक्यातील खडकी येथील पल्लवी शंकर घोगरे यांच्यावर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यासाठी भोसे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. शस्त्रक्रिया झाल्यानंतर टाके तोडून २५ ऑगष्ट रोजी त्यांना घरी पाठविण्यात आले. यानंतर काही वेळेतच टाके तोडलेल्या जागेतून आतडी बाहेर आली त्यामुळे प्रचंड घबराट निर्माण झाली. या प्रकाराने प्रचंड घाबरून गेलेल्या महिलेच्या पतीने पुन्हा भोसे येथील प्राथमिक रुग्णालयाशी संपर्क साधून याबाबत माहिती दिली. (
Intestines came out of the woman's stomach) त्यानंतर आरोग्यसेविका महिलेच्या घरी खडकी येथे पोहोचली आणि महिलेला घेवून मंगळवेढा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला. रुग्णालयात दाखल करून घेण्यास नकार दिल्यानंतर रात्री उशिरा मंगळवेढ्याच्या प्राथमिक रुग्णालयात प्रथमोपचार करून सोलापूर येथे पाठविण्यात आले.


या घटनेने खळबळ उडाली असून भोसे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर ठपका ठेवण्यात येत आहे तर रुग्णालय प्रशासन मात्र आपली काहीही चूक नसल्याचे सांगत आहे. भोसे येथील आरोग्य केंद्रातील चुकीमुळे ही परिस्थिती निर्माण झाली असल्याचा आरोप रुग्ण महिलेच्या सासूने केला आहे. या घटनेने मात्र प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आणला आहे आणि याची मंगळवेढा तालुक्यात चर्चा देखील सुरु झाली आहे . 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !