BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२७ ऑग, २०२२

गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन घर, शेळ्या जळून खाक !



शोध न्यूज : पंढरपूर तालुक्यात गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन संपूर्ण घर जळून खाक झाले असून काही शेळ्या देखील या आगीत दगावला आहेत. सुदैवाने घरात कुणीही नसल्याने जिवीतहानी झाली नाही. 


पंढरपूर तालुक्यातील देगाव हद्दीतील भोई वस्तीवर बबन भोई यांच्या पत्राशेड असलेल्या घरात रात्री अचानक गॅस टाकीचा स्फोट झाला आणि या घराला आग लागली. घरी कुणीच नसल्यामुळे ही आग अधिकच भडकत गेली आणि संपूर्ण घराला आगीने वेधले. घरातील सर्व चीजवस्तू या आगीत जळून खाक झाल्याच पण पूर्ण घराची राख या आगीने केली आहे. घरातील सगळे लोक शेजारील वस्तीवर असलेल्या एका वाढदिवसाच्या कार्यक्रमास गेले होते. तिकडे वाढदिवसाचा आनंद साजरा होत होता आणि इकडे आगीने पूर्ण घराचा ताबा मिळवला होता. (
Gas cylinder explosion in Pandharpur taluka , house burnt) परंतु वाढदिवसाच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने कुटुंबातील सर्वांचे जीव वाचले आहेत. या आगीत पाच शेळ्या मात्र होरपळून मृत्युमुखी पडल्या आहेत. 


 
गॅस टाकीचा स्फोट झाला तेंव्हा स्फोटाचा आवाज दूर अंतरापर्यंत ऐकू गेला. रात्रीच्या शांत वातावरणात सुमारे तीन ते चार किमी अंतरापर्यंत या स्फोटाचा आवाज आल्याचे सांगितले जात आहे. स्फोटाचा आवाज ऐकून परिसरातील लोकांनी घटनेचा अंदाज घेतला. देगाव येथील सरपंच संजय घाडगे आणि अन्य काही जण या वस्तीवर धावले. संपूर्ण घराला आगीने वेढलेले असताना त्यांनी ही आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. स्फोटाचा आवाज झाल्यानंतर देगाव येथील गावकरी आवाजाची चौकशी करीत राहिले, एकमेकांना फोन करून आवाजाबाबत माहिती घेत राहिले. यावेळी हा गॅस टाकीचा स्फोट असल्याचे सरपंच घाडगे याना समजले. तात्काळ लोक या वस्तीकडे धावत आले परंतु या घरात कुणीच नसल्याचे त्यांना दिसले. सरपंच घाडगे यांनी त्वरित पोलीस तसेच तहसीलदार याना या घटनेची माहिती दिली. देगावमधील अनेक लोक येथे एकत्र झाले होते.  


गॅस टाकीचा स्फोट नेमका कशामुळे झाला याची काहीच माहिती मिळू शकली नाही. घरात कुणीच नसल्याने याबाबत कुणालाच काही सांगता येत नव्हते. गेल्या काही काळापासून अनेक सिलिंडर लिकेज असल्याचे आढळून येत आहे. सील काढल्यानंतर रेग्युलेटर लावताना गॅस बाहेर येत असल्याचा आवाज येतो आणि घाबरगुंडी उडते. वायसर बदलल्यानंतरच हा प्रकार बंद होतो. या प्रकाराबाबत अनेक नागरिकांच्या तक्रारी सतत सुरु असतात. हा धोकादायक प्रकार पूर्णपणे बंद होण्याची आवश्यकता आहे. भोई यांच्या घरातील प्रकार मात्र नेमका कसा आणि कशामुळे झाला हे सद्या तरी समजू शकले नाही. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !