शोध न्यूज : शेतातील विजेची तार तुटून थेट अंगावर पडल्याने दोन शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.
महावितरणच्या विद्युत वाहिन्या या शेतातून जात असतात आणि सैल झालेल्या तारांमुळे घर्षण होऊन ठिणग्या पडतात आणि शेतकऱ्यांची पिके जाळून जातात. ऊसाचे फड पेटून खाक होतात, त्यासोबत पाईपलाईनही जळून जाते आणि आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. विद्युत वाहक तारांकडे वेळीच आणि गंभीरपणे लक्ष न दिल्याने कित्येकदा तार तुटून शेतात पडते. ही तार लक्षातही येत नाही आणि वीज प्रवाह असलेल्या तारेवर पाय पडून शेतकरी मृत्युमुखी पडतो, अशा घटनाही घडताना दिसतात. आता तर विद्युत प्रवाह असलेली तार तुटून थेट शेतकऱ्याच्या अंगावर पडली आणि दोन तरुण शेतकऱ्यांना आपला प्राण गमवावा लागला आहे. त्यामुळे आणखी किती काळ असे चालणार आणि किती जणांचे बळी घेतले जाणार असाच प्रश्न उपस्थित झाला आहे.
सांगली जिल्ह्यातील जत घाडगेवाडी रस्त्यावर असलेल्या पाटील वस्ती येथे २६ वर्षांचे तरुण शेतकरी शिवाजी पांडुरंग महारनुर आणि केवळ १६ वर्षे वयाचा रोहित अजित पाटील हे दोघे शेतात काम करीत होते. या शेतातून ११ के. व्ही. ची मुख्य विद्युत वाहिनी गेलेली आहे. या वाहिनीची विद्युत प्रवाह असलेली तार तुटली आणि ती थेट रोहित पाटील याच्या अंगावर पडली. विद्युत प्रवाहित तार असल्यामुळे रोहितला विजेचा जोरदार धक्का बसला. या तारेपासून त्याला बाजूला करण्यासाठी शिवाजी महारनूर हे धावून गेले. त्यानाही तारेतील विजेचा जोरदार धक्का बसला आणि दोघेही मृत्युमुखी पडले. रोहितची आई देखील या दोघांना वाचविण्याचा प्रयत्न करू लागली आणि तिलाही दुखापत झाली आहे.
शेतात काम करतानाही शेतकऱ्याच्या डोक्यावर या संकटाची टांगती तलवार असल्याने आणि एकाच वेळी दोघांना, त्यांचा काही दोष नसताना देखील प्राणाला मुकावे लागले आहे. (Two young farmers killed by electric wire) या घटनेने परिसरातून प्रचंड हळहळ व्यक्त होऊ लागली आहे. शिवाय शेतकरी अशा घटनेबाबत चिंता व्यक्त करू लागले आहेत.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !