BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१९ ऑग, २०२२

'मी वकील आहे, तुझे बरोबर करतो' ! वकील पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल !


शोध न्यूज (विजय काळे) : विवाहितेचा विविध प्रकारे छळ केल्याच्या तक्रारीवरून वकील असलेल्या पतीसह पाच जणांच्या विरोधात मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


महिला सक्षमीकरणासाठी अनेक उपाययोजना केल्या जात असतानाही आणि महिलांविषयक कायदे कडक केले जात असतानाही महिलांविषयक घडणारे गुन्हे कमी होताना दिसत नाहीत. हुंडा देणे घेणे कायद्याने गुन्हा असला तरी हुंड्याशिवाय लग्न होताना दिसत नाहीत, एवढेच काय, लग्न झाल्यावर देखील कित्येक वर्ष हुंड्यासाठी विवाहितेचा छळ अजूनही होताना दिसत आहे. ग्रामीण भागात तर याचे प्रमाण अधिक असून शहरी भागातील सुशिक्षित कुटुंबात देखील असे प्रकार घडत आहेत त्यामुळे कित्येक विवाहिता आजही आत्महत्या करीत आहेत. भिकारी बनून अनेक तरुण पती आपल्या पत्नीच्या माहेरकडून पैशाची मागणी करताना आजही पाहायला मिळतात. मोहोळ तालुक्यात तर कायदा माहित असलेल्या एका वकील पतीसह पाच जणांच्या विरोधात छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. 


मोहोळ तालुक्यातील एका मुलीचे आटपाडी तालुक्यातील गजेंद्र हनुमंत माने याच्यासोबत एक वर्षापूर्वीच लग्न झाले होते. पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार लग्नात मुलीच्या आईने मुलीला संसारोपयोगी वस्तू, अन्य साहित्य दिले होते. हा विवाह झाल्यानंतर एक महिनाच व्यवस्थित गेला आणि नंतर लगेच या नव्या नवरीचा छळ तिच्याच घरात सुरु झाला. वकील असलेला पती गजेंद्र माने हा आपण दुसरे लग्न करणार असल्याचे सांगत शिवीगाळ, मारहाण करू लागला. "मी वकील आहे, तुझे कसे करायचे ते मी बरोबर करतो" अशी दमदाटी करायला सुरुवात केली. नुकतेच लग्न झालेल्या या विवाहितेस एकीकडे पती त्रास देत होता तर दुसरीकडे सासू, लक्ष्मी, सासरा हनुमंत, नणंद संध्याराणी आणि पल्लवी हे सगळेच तिच्या विरोधात गेलेले होते. 'तुझा पायगुण चांगला नाही, तू आमच्या घराला शोभत नाहीस' असे म्हणत मानसिक आणि शारीरिक त्रास देत होते.


लग्नानंतर एक महिन्यातच विवाहितेला हा त्रास असह्य होत होता. संसार सुरु होण्यापूर्वीच तिच्या आयुष्यात हे वादळ उठले होते. तिने आपल्या आई आणि मामाकडे धाव घेत छळाची परिस्थिती सांगितली. त्यानंतर काहींनी मिळून या मुलीची आणि तिच्या सासरच्या मंडळींची समजूत घालून तिला पुन्हा सासरी पाठविण्यात आले. त्यानंतरचे काही दिवस व्यवस्थित गेले पण पुन्हा तिच्याबाबतीत घरात वेगळेच काही घडू लागले. सासरा हनुमंत माने हा तिला लाज वाटेल अशा पद्धतीने कृत्य करू लागला. आपल्या लेकीसारखी असलेल्या सुनेशी सासऱ्याचे हे वर्तन तिच्यासाठी त्रासदायक ठरू लागले. सासरा हनुमंत आणि सासू लक्ष्मी या दोघांनी १६ ऑगस्ट रोजी या मुलीला पंढरपूर येथे आणून सोडले.  विवाहितेने माहेरी संपर्क करून याबाबतची सर्व माहिती आणि घडलेली घटना सांगितली. 


सदर प्रकरणी आता मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून वकील पती, सासू, सासरा आणि दोन नणंद या पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Harassment of married woman for dowry, crime against lawyer) मला दुसरे लग्न करायचे आहे म्हणून मारहाण शिवीगाळ करीत गाडी घेण्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये हुंडा आणि दोन तोळे सोने घेवून ये अन्यथा येथे राहायचे नाही असे म्हणत छळ केल्याचा हा गुन्हा मोहोळ पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. 


  • अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !

  



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !