शोध न्यूज : सोलापूर - पुणे महामार्गावर अत्यंत थरारक घटना घडली असून अज्ञात लुटारूनी गोळीबार करून ३ कोटी ६० लाख रुपयांची लुट केल्याची थरारक घटना घडली आहे.
सोलापूर - पुणे हा महामार्ग सतत वर्दळीचा असतो आणि वाहनाची गर्दीही या रस्त्यावर असते. असे असले तरी इंदापूरच्या जवळ अत्यंत थरारक आणि सिनेस्टाईल घटना घडली. इंदापूर तालुक्यातील वरकुटे बुद्रुक पाटी येथे अभूतपूर्व थरार घडला. या घटनेने पोलीस दल देखील हादरून गेले आहे. भावेशकुमार अमृत पटेल हे गुजरातमधील मेहसाना जिल्ह्यातील असून सद्या ते मुंबईत राहत आहेत. त्यांनी याबाबत फिर्याद दिली असून त्यानुसार रात्रीच्या वेळेस ही घटना घडली. आपल्या चार चाकी स्कर्पिओ गाडीतून (टीएस ०९ ईएम ५४१७) ते निघाले असता वरकुटे पाटी येथे गतीरोधकावर त्यांच्या गाडीचा वेग कमी झाला आणि एका वेगळ्याच घटनेला त्यांना सामोरे जावे लागले.
गतीरोधकामुळे त्यांच्या गाडीचा वेग कमी झाला असतानाच चार अज्ञात लोक पुढे आले. हातातील लोखंडी टॉमी दाखवत गाडी थांबविण्याचा प्रयत्न करू लागले. प्रसंग ओळखून पटेल यांनी गाडीचा वेग वाढवला आणि पुण्याच्या दिशेने वेगात गाडी पुढे नेली. त्यानंतर या लुटारूनी स्विफ्ट आणि टाटा कंपनीच्या गाडीतून पाठलाग करण्यास सुरुवात केली. (Solapur - Pune Highway) लुटारू पाठलाग करीत आहेत हे पाहून पटेल यांनी आपल्या गाडीचा वेग आणखी वाढवला. पटेल यांची गाडी वेगाने निघालेली पाहून लुटारू देखील वेगाने पाठलाग करू लागले. हिंदी नव्हे तर इंग्रजी चित्रपटात शोभेल असे पाठलागाचे थरारनाट्य सोलापूर - पुणे महामार्गावर सुरु झाला होता.
पटेल यांची गाडी हातची निसटून जातेय असे वाटताच लुटारूनी पटेल यांच्या गाडीवर गोळीबार सुरु केला. पटेल बंधू जीवाच्या आकांताने गाडी पळवत राहिले पण काही अंतरावर गेल्यावर त्यांची गाडी थांबविण्यात लुटारू यशस्वी झाले. भावेशकुमार पटेल आणि विजयकुमार यांना या चौघांनी मारहाण सुरु केली. याचवेळी त्यांनी गाडीत असलेली ३ कोटी ६० लाख रुपयांची रोकड आणि १४ हजार रुपये किमतीचे दोन आणि १२ हजार रुपये किमतीचा एक मोबाईल असा ऐवज लुटून नेला. अत्यंत थरकाप उडविणारी ही घटना काही वेळेत घडून गेली होती.
भावेशकुमार पटेल यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात याबाबतची फिर्याद दिली असून पोलिसांनी अज्ञात चार लुटारुंच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पटेल यांच्या गाडीत एवढी मोठी रक्कम कशी ? हा देखील एक प्रश्न पोलिसांना पडला आहे. एवढी मोठी रक्कम घेवून हे नेमके कुठे आणि कशासाठी निघाले होते याची चौकशी पोलीस तपासात होईलच पण सोलापूर - पुणे महामार्गावर एवढा थरार पहिल्यांदाच घडला आहे. (Chasing and firing, robbery worth crores) यामुळे या मार्गावरून रात्रीच्या वेळी प्रवास करणे धोक्याचे आणि भीतीदायक वाटू लागले आहे. पोलिसांनी जलदगतीने तपास सुरु केला असून त्यासाठी पथके निर्माण केली आहेत.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !