BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१० ऑग, २०२२

पंढरीत सराईत गुन्हेगारांची टोळी गजाआड ! २३ गुन्हे उघडकीस !!

 




सोलापूर : बंद असलेली घरे आणि दुकाने फोडणारी टोळी सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने पकडली असून यातील दोघांना पंढरपूर तालुक्यात सापळा लावून पकडले आहे. 


मागील काळात पंढरपूर, माळशिरस, सांगोला तालुक्यात अज्ञात चोरट्यांनी भलताच धुडगूस घातला होता. घराला कुलूप लावून नागरिक बाहेर गेलेले असलेल्या घरात घुसून रोकड आणि दागिने यांची चोरी केली जात होती. एका रात्रीत एकाच ठिकाणी दुकाने फोडून चोरी केली जात होती. पंढरपूर तालुक्यात देखील अशा अनेक चोऱ्या झाल्या होत्या. सुस्ते येथे देखील एका रात्रीत अनेक दुकाने फोडली होती. सांगोला तालुक्यातील बामणी येथेही चोरांनी एकाच रात्री अनेक दुकाने फोडली होती. शिवाय घरे बंद करून नागरिक परगावी गेले असतील अशा घरांना लक्ष्य करून त्या घरात चोरी केली जात होती. सोलापूर जिल्ह्यात असे अनेक गुन्हे घडले होते. 


अशा प्रकारच्या चोऱ्या होत असल्याने नागरिकांत आणि दुकानदारांत या चोरट्यांची दहशत निर्माण झाली होती. नागरिकांनी चोरांची धास्ती घेतली होती आणि घराला कुलूप लावून परगावी जाण्याचे धाडस होत नव्हते. जाणे आवश्यक असल्याने नागरिक परगावी गेले तर त्याचे लक्ष आपल्या घराकडेच लागत होते. शेजारी पाजारी फोन करून घराच्या सुरक्षिततेबाबत माहिती घेतली जात होती.  असुरक्षिततेची भावना निर्माण झाल्याचे दिसत होते परंतु चोरटे सापडत नव्हते. चोरी करून चोर बेपत्ता होत होते त्यामुळे नागरिकात देखील चिंतेचे वातावरण होते परंतु सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने नेहमीप्रमाणे यशस्वी कामगिरी करून या टोळीला जेरबंद केले आहे. 


सोलापूर जिल्ह्यात अशा चोरीच्या अनेक घटना घडल्यामुळे आणि चोर बेपत्ता असल्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांना याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे आणि त्यांच्या पथकावर सदर गुन्हे उघडकीस आणण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. जिल्ह्यातील विविध तालुक्यातील उघडकीस न आलेले गुन्हे शोधण्याची मोहीम या पथकाने सुरु केली आणि त्यानुसार माहिती प्राप्त करण्याचा प्रयत्न सुरु केला. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदार यांच्या मदतीचे त्यांची शोध मोहीम सुरु झाली. 


माळशिरस तालुक्यात ४ लाख ६७ हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेल्याचा एक गुन्हा प्रलंबित होता. या गुन्ह्याची उकल पोलिसांनी केली. या गुन्ह्याचा शोध घेत असतनाच यातील आरोपी पंढरपूर तालुक्यातील खेड भोसे येथे येणार असल्याची माहिती या पथकाला मिळाली आणि त्यांनी मग खेडभोसे गावाकडे आपला मोर्चा वळवला. आरोपींना पकडण्यासाठी सापळा लावण्यात आला आणि खेडभोसे येथे यातील दोन आरोपीना या पोलिसांनी पकडले. या आरोपींना ताब्यात घेवून त्यांच्याकडे चौकशी सुरु केली असता पोलिसांना मोठी माहिती मिळाली. सदर आरोपींनी त्यांच्या दोन साथीदारांसह त्यांनी जिल्ह्यात विविध ठिकाणी बंद असलेली घरे आणि दुकाने फोडली असल्याचे कबुल देखील केले असल्याचे पोलिसांनी सांगितले. 


लाखोंचा मुद्देमाल हस्तगत !

या चोरट्यांनी दरवाजांचे कोयंडे तोडून, खिडक्यांचे ग्रील कापून काढून घरफोड्या, चोऱ्या केल्या असल्याची माहिती तर दिलीच पण पोलिसांनी त्यांचाकडून १५ लाख ६१ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. जिल्ह्यातील २१ घरफोड्या आणि मोटार सायकल चोरीचे २ गुन्हे उघडकीस आणले आहेत. (Gang of thieves arrested in Solapur district) या यशस्वी कामगिरीमुळे गुन्हे शाखेच्या पथकाचे कौतुक होत आहे. 


पंढरपूरची टोळी !

रवी उर्फ बबुल्या मोहन काळे, विजय उर्फ फुल्या मोहन काळे (दाळे गल्ली, पंढरपूर) हे सद्या पंढरपूर तालुक्यातील खेड भोसे येथे राहतात. या दोघांना अटक करण्यात आली असून पंढरपूर येथील बबन अंकुश पवार, कालिदास अंकुश पवार, नवनाथ अंकुश पवार हे तिघे अजूनही फरार आहेत.  पंढरपूर शहरासह टेंभुर्णी, वैराग आदी परिसरात यांनी दुकाने फोडणे तसेच  घरफोड्या असे गुन्हे केले आहेत.  विशेष म्हणजे या टोळीतील हे आरोपी परस्परांचे नातेवाईक आहेत. फरार असलेले आरोपी पकडल्यानंतर आणखी काही गुन्हे उघडकीस येथील असा पोलिसांना विश्वास आहे. 


सोलापूर जिल्ह्यात धुडगूस !

सदर टोळी ही पंढरपूर तालुक्यातील असली तरी त्यांनी सोलापूर शहर, पंढरपूर, सांगोला, माळशिरस, वेळापूर, मोहोळ, माढा, नातेपुते अशा परिसरात धुडगूस घातलेला आहे.  बंद घरे आणि दुकाने फोडून अनेक चोऱ्या केल्या आहेत. फरार असलेल्या तीनही आरोपींना लवकरच पकडले जाईल असा पोलिसांना विश्वास आहे.  


  • अधिक बातम्यांसाठी       येथे क्लिक        करा !

   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !