BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

९ ऑग, २०२२

मुलांना फास देवून आईची गळफास घेवून आत्महत्या !

 



मोहोळ : आपल्या तीन वर्षांच्या मुलीसह गळफास घेऊन मातेने आत्महत्या केल्याची अत्यंत धक्कादायक आणि काळीज भेदणारी घटना मोहोळ तालुक्यात घडली त्रासाला कंटाळून हे टोकाचे पाऊल उचलण्यात आले आहे. 


पतीच्या किंवा सासूच्या त्रासाला कंटाळून महिलांच्या होत असलेल्या आत्महत्या थांबताना दिसत नसून कायदे कितीही कडक केले तरी महिलांना संरक्षण मिळताना दिसत नाही. छळाला कंटाळून महिला आत्महत्या करीत आहेत आणि छळ करण्याचे कारण आणि प्रकार देखील वेगवेगळे असतात. असह्य होऊन महिला आयुष्याचा शेवट करतात पण मोहोळ तालुक्यातील कोरवली येथे आपल्या अवघ्या तीन वर्षे वयाच्या मुलीसह तिच्या आईने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.  या घटनेने संपूर्ण कोरवली गावाला धक्का बसला आहे. अवघे गाव शोकमग्न स्थितीत आहे. २५ वर्षे वयाची महिला प्रीती विजयकुमार माळगोंडे आणि ३ वर्षांची आरोही विजयकुमार माळगोंडे या दोघीही मृत झाल्या असून एकाच चितेवर मायलेकरांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. 


पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, कोरवली येथील विजयकुमार माळगोंडे याच्याशी प्रीतीचा पाच वर्षांपूर्वी विवाह झाला होता. हा विवाह झाल्यानंतर विजयकुमार हा प्रीतीला घेवून शेतातील वस्तीवर राहू लागल होता. या दांपत्यास आरोही आणि बसवराज अशी दोन अपत्ये होती. विवाहानंतर काही काळ व्यवस्थित गेला परंतु नंतर विजयकुमार हा पत्नी प्रीतीला त्रास देवू लागला. शिवीगाळ करीत मानसिक आणि शारीरिक त्रास विजयकुमार देत होता. याची परिणीती पुढे टोकाला गेली आणि आत्महत्येची दुर्दैवी घटना घडली. 


प्रीतीने सोमवारी आपला भाऊ मल्लिनाथ याला फोन केला होता. यावरून विजयकुमार चिडला होता आणि त्याने जाब विचारला. मल्लिनाथ याला कशासाठी फोन केला म्हणून प्रीतीला चप्पल आणि चाबकाने मारले. त्यानंतर तिला धमकी देवून तो शेतात जनावरांसाठी लागणारी वैरण आणायला गेला. झालेल्या मारहाणीमुळे  आणि सतत होत असलेल्या त्रासाला कंटाळलेल्या प्रीतीने वेगळाच विचार केला आणि पती शेतात जाताच तिने भलतेच धाडस केले. आपली तीन वर्षे वयाची आरोही, दीड वर्षांचा मुलगा बसवराज यांना घरातील पत्र्याच्या लोखंडी अँगलला साडी बांधून फळफ़ास दिला. (Mother committed suicide by hanging her children)त्यानंतर स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केली.  


दक्षिण सोलापूर तालुकयातील हत्तूर येथील प्रीतीचा भाऊ मल्लिनाथ राजशेखर मंगरुळे याने प्रीतीचा पती विजयकुमार हा आपली बहीण प्रीती हिला नेहमी मारहाण करीत होता, शिवीगाळ तसेच दमदाटी देखील करीत होता. यामुळेच प्रीतीने हे पाऊल उचलले असल्याची तक्रार पोलिसात दिली आहे. प्रीतीचा पती विजयकुमार यानेही मृत पत्नीच्या विरोधात तक्रार दाखल केली असून आपली मुलगी आरोही हिला गळफास देऊन ठार मारले आणि स्वतः आत्महत्या केली अशी तक्रार त्याने दिली आहे. दोन्ही बाजूच्या तक्रारी पोलिसांनी दाखल करून घेतल्या आहेत   


देव तरी त्याला --
या सर्व थरारक घटनेत देव तरी त्याला कोण मारी' याचा प्रत्यय आला. आईने दीड वर्षाचा मुलगा बसवराज यालाही गळफास लावला परंतु सुदैवाने बसवराज यातून बचावला. त्याच्या गळ्याला गळफास व्यवस्थित बसला नाही म्हणून त्याचा जीव वाचला आहे.  तीन वर्षांची आरोही मात्र गळफास लागून मृत्युमुखी पडली. आईनेही आपले जीवन संपवले. 


  • अधिक बातम्यांसाठी       येथे क्लिक        करा !


एकाच चितेवर अंत्यसंस्कार 
आई प्रीती आणि मुलगी आरोही या दोघींवर एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्काराचा असा प्रसंग पाहून गावकरी आणि नातेवाईक देखील हळहळले. काळीज गोठवणारा हा प्रसंग कुणालाही पाहवत नव्हता. या प्रसंगाने गावकऱ्यांचे डोळे देखील ओलावले. दोन्ही बाजूनी तक्रारी दाखल झाल्याने अंत्यसंस्कारावेळी संघर्ष होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !