पंढरपूर : नागरिकांच्या मनावर चोरांचे दडपण असतानाच पुन्हा एकदा झालेल्या चोरीच्या घटनेने पंढरपूर शहर हादरले असून नागरिकांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असल्याचे दिसून येत आहे.
गेल्या काही महिन्यापासून पंढरपूर शहर आणि तालुक्यात चोरांनी भलताच धुमाकूळ घातला आहे. कुलूपबंद घरात घुसून चोरी होण्याचे अनेक प्रकार आजवर समोर आलेले आहेत. चोरांनी आपला मोर्चा दुकानांकडे वळवला असल्याचेही काही दिवसांपूर्वीच पंढरपूर तालुक्यात दिसून आले. ग्रामीण भागात बस स्थानक परिसरात तसेच महत्वाच्या रस्त्यालगत विविध व्यावसायिकांनी आपली दुकाने थाटली आहेत पण रात्रीत ही दुकाने सुरक्षित राहतील याची मात्र शाश्वती आता राहिली नाही. पंढरपूर तालुक्यातील सुस्ते येथे एका रात्रीत सहा दुकाने फोडल्याची घटना घडल्यानंतर भोसे पाटी येथे कापड दुकान फोडून सव्वा सात लाखांची चोरी झाली. पंढरपूर शहरात आणि उपनगरात देखील चोरीच्या घटना घडत आहेत.
पंढरपूर येथील नवीन कराड नाका परिसरातील दत्तनगरात पुन्हा झालेल्या लाखोंच्या चोरीने नागरिक हादरले आहेत. छताच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी बंगल्यात प्रवेश करून लाखो रुपयांची चोरी झाल्याचे समोर आले आहे. न्यायालयीन कर्मचारी मिलिंद नरखेडकर हे येथे भाड्याने सहकुटुंब राहतात. ते परगावी निघाले असता दागिने काढण्यासाठी कपाट उघडले आणि त्यांना धक्का बसला. कपाटात ठेवलेले दागिने जागेवर नसल्याचे त्यांना दिसून आले. घरात इकडे तिकडे तपासणी करीत ते छताच्या दरवाजाजवळ गेले असता दरवाजा अर्धवट उघडा असल्याचे त्यांना दिसले. या दवाजाचा कडी कोयंडा देखील तुटलेल्या अवस्थेत दिसला तेंव्हा एकूण प्रकारचा त्यांना अंदाज आला.
चोरीच्या या घटनेत सोन्याच्या पाटल्या, चैन, बदाम, झुबे, अंगठी, नथ इत्यादी ३ लाख ८८ हजार रुपये किमतीचे दागिने चोरीला गेले असल्याची फिर्याद सरिता मिलिंद नरखेडकर यांनी पंढरपूर शहर पोलिसात दिली असून पोलिसांनी अज्ञात चोरांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर नागरिकांच्या मनात पुन्हा एकदा चोरांची दहशत वाढली आहे. चोरांना कुणाचे भय उरले आहे की नाही अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे गेल्या काही महिन्यात दिसून येऊ लागले आहे. घराचा दरवाजा कुलूपबंद दिसला की चोरांना आयते निमंत्रण मिळाल्यासारखे होत असल्याने नागरिकांना परगावी जाणे देखील धाडसाचे वाटू लागले आहे.
गजबजलेल्या भागात झालेल्या या चोरीमुळे नागरिक भयभीत होऊ लागले आहेत. कधी कुणाच्या घरात चोर चोरी करून जातील हे सांगता येत नसल्याने प्रत्येक कुटुंबाला चोरांची धास्ती वाटू लागली आहे. चोरी झाली की नागरिक पोलिसांच्याकडे बोट दाखवतात परंतु नागरिकांनी देखील आपल्या मालमत्तेच्या सुरक्षेची दक्षता घेण्याची गरज आहे. पंढरपूर शहराचा विस्तार अत्यंत वेगाने होत आणि झालेला असून अनेक उपनगरांची सातत्याने भर पडत आहे. वाढत्या वसाहती आणि पोलिसांची असणारी मर्यादित संख्या यामुळे चोरांचे फावत आहे. एका चोरीचा विसर पडतो न पडतो तोच दुसरी चोरी झाल्याची घटना समोर येते त्यामुळे मनावरील चोरांचे दडपण कायम राहताना दिसत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !