BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१३ ऑग, २०२२

'गद्दार, गद्दार ..' ! बंडखोरांच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक !

 


शोध न्यूज : शिवसेनेचे बंडखोर आमदार, खासदार तसेच नवे मंत्री आपापल्या मतदारसंघात पोहोचू लागले तसे स्थानिक शिवसैनिक आक्रमक होऊ लागले असून शिवसैनिकांचा हा उद्रेक राज्यात विविध ठिकाणी दिसून आला.


शिवसेना फोडून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ४० आमदार सुरत आणि गुवाहाटीला गेले तेंव्हापासून शिवसेनेत उद्रेक आहे. मुंबईपासून राज्याच्या काही भागात आमदारांची कार्यालये शिवसैनिकांनी फोडली होती त्यानंतर आमदारांना केंद्राची सुरक्षा पुरविण्यात आली होती. शिवसेनेशी एकनिष्ठ असलेल्या शिवसैनिकांना हे बंड सहन झाले नसून वेळोवेळी त्यांच्या कृतीतून हे दिसून आले आहे. शिवसेना फोडणाऱ्या आमदाराचा 'गद्दार' असा सातत्याने उल्लेख केला जात आहे. शिवसेनेत असलेला हा रोष आज पुन्हा बाहेर आला आणि संतापाचे पडसाद रस्त्यावर उमटू लागले आहेत. नुकताच मंत्रीमंडळाचा विस्तार झाला असून उद्या रविवार आणि परवा स्वातंत्र्यदिन असल्याने बंडखोर आमदार, खासदार आपल्या मतदारसंघाकडे परतू लागले आहेत. 


नव्याने मंत्री झालेल्यांचे त्यांचे समर्थक जोरदार स्वागत करीत असतानाच शिवसेनेच्या मोठ्या रोषाला त्यांना सामोरे जावे लागत असल्याचे दिसत आहे. यवतमाळचे आमदार संजय राठोड यांना मंत्रीपद देण्यात आले आहे आणि त्यावर राज्यात वादग्रस्त प्रतिक्रियाही उमटत आहेत. राठोड यांच्या स्वागतासाठी समर्थक सज्ज असताना शिवसेनेने मात्र आपला रोष व्यक्त केला आहे. दत्त चौकात राठोड यांच्या स्वागतासाठी लावलेल्या स्वागत फलकावरील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो शिवसैनिकांनी काढून टाकला आणि शिवसेनाप्रमुखांचा फोटो न लावता बंडखोरांनी निवडणूक लढवून दाखवावी असे आव्हानच दिले.  

 

शिवसेनेतून फुटून गेलेल्या आणि मागील काळात ईडी च्या कारवाईने चर्चेत आलेल्या खासदार भावना गवळी यांचे देखील आज यवतमाळ येथे आगमन झाले आणि शिवसेनेच्या रोषाचा 'प्रसाद' त्यानाही मिळाला. ईडी प्रकरणात अडकल्यानंतर खासदार भावना गवळी या तबब्ल तीन वर्षांनी मतदारसंघात पोहोचल्या पण महिला शिवसैनिकांनी 'गद्दार.. गद्दार' अशा शब्दात त्यांचा उल्लेख केला. शिवसैनिकांनी त्यांच्या निषेधाचे फलक झळकवले. (Traitor, traitor Shiv Sainik aggressive against the rebels) भावना गवळी यांच्या फोटोवर 'फुली' मारून ' तीन वर्षांनी प्रथमच यवतमाळ जिल्ह्यात शिवसेना पक्षाशी गद्दारी करून पाय ठेवणाऱ्या खा. भावना गवळीचा जाहीर निषेध' अशा प्रकारचे फलक फडकविण्यात आले. 


शिवसेनेतून फुटून गेलेल्या आमदार, खासदार यांना आता संरक्षणात फिरण्याची वेळ आली आहे. जे शिवसैनिक या नेत्यांची ढाल बनत होते तेच आता शत्रू म्हणून समोर आले आहेत. कोल्हापूर येथे देखील आज शिवसेना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज कोल्हापूर दौरा होता आणि या पार्श्वभूमीवर शिवसैनिक आक्रमक झालेले होते. कोल्हापूर शिवसेना गेल्या काही दिवसांपासून धुमसती आहे आणि आज हा उद्रेक पुन्हा रस्त्यावर आला. पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांचा कोल्हापूर दौरा असल्याचे पाहून शिवसैनिकांनी निदर्शने करण्याची घोषणा केली. अब्दुल सत्तार आणि संजय राठोड या मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करीत शिवसेना निदर्शने करणार होती पण त्याआधीच पोलिसांनी धरपकड सुरु केली. शिवसैनिकांसह जिल्हाप्रमुख संजय पवार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले त्यामुळे वातावरण अधिकच आक्रमक झाले. 


सावंत आज बार्शीत !

शिवसेनेतून फुटलेले आणखी एक आमदार तानाजी सावंत हे मंत्री बनून आज सोलापूर जिल्ह्यात येत आहेत.  मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर ते प्रथमच येत आहेत पण ते थेट बार्शी येथील बीआयटी कॉलेज आणि तेथून मोटारीने परंडा येथे जाणार आहेत. भूम वाशीतून ते धाराशिवमधील शासकीय विश्रामगृहावर जाणर असून स्वातंत्र्यदिनाचे ध्वजारोहण ते धाराशिव येथे करणार आहेत . 


  • अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !