BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१३ ऑग, २०२२

पंढरपूर तालुक्यातील बंधारे गेले पाण्याखाली ! शेतीतही पाणी !


पंढरपूर : उजनी आणि वीर धरणातून पाणी सोडल्याने नीरा, भीमा नद्या दुथडी भरून वहात असून पंढरपूर तालुक्यातील बंधारे पाण्याखाली गेले असून शेतीत पाणी घुसू लागले आहे.


राज्याच्या विविध भागात जोरदार पावसामुळे नद्या नाले भरून वाहू लागले आहेत. उजनीच्या वरील बाजूला असलेल्या धरणांची पातळी देखील वाढली असून काही धरणातून पाणी सोडले जात आहे. खडकवासला धरण तर आधीच भरले असल्याने गेल्या काही दिवसापासून पाणी सोडले जाऊ लागले आहे. खडकवासला धरणातून पाणी सोडले गेल्याने पुण्यात देखील पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. या धरणातून १३ हजार २९२ क्युसेक्स विसर्ग सुरु आहे. अजूनही या धरणातून पाणी सोडले जात आहे. वरच्या धरणातून सोडण्यात येणारे पाणी हे उजनी धरणात दौंड येथे मिसळत आहे त्यामुळे उजनी जलाशयाची पातळी वाढत आहे. ही परिस्थिती लक्षात घेत उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडले जात आहे. वीर धरणातून येणारे पाणीही संगम येथे भीमेच्या पात्रात मिसळत आहे त्यामुळे भीमा नदीची पातळी वाढत आहे. 


नीरा आणि भीमा नदीत धरणातून पाणी सोडले जात असल्यामुळे दोन्ही नद्या दुथडी भरून वाहात आहेत. उजनी धरणात आज सकाळी १०५ टक्क्याहून अधिक जलसाठा झाला असून आज सकाळी ४० हजार क्युसेक्सचा विसर्ग करण्यात आला. हा विसर्ग आणखी दहा हजाराने वाढविण्यात येणार असल्याचे सांगितले गेले आहे. उजनी जलाशयात येत असलेल्या पाण्याचा विसर्ग लक्षात घेत धरणातून सोडण्यात येणारे पाणी कमी अधिक करण्यात येत असते. वीर धरणातून सोडण्यात येत असलेला विसर्ग कमी करण्यात आला असला तरी अजूनही २४ हजार क्युसेक्स विसर्ग सोडला जात आहे. शिवाय आधी सोडण्यात आलेल्या विसर्गामुळे भीमेची पातळी वाढलेलीच आहे. उजनीतून विसर्ग वाढविण्यात येत असल्यामुळे भीमेची पातली आणखी वाढणार आहे. 


दोन्ही धरणातून सोडलेले पाणी भीमा नदीत एकत्र होत असल्याने भीमा नदीची पातळी वाढत असून कालच पंढरपूर येथील जुना दगडी पूल पाण्याखाली गेला आहे तर पंढरपूर तालुक्यातील बंधारे देखील पाण्याखाली गेलेले आहेत. पटवर्धन कुरोली, मुंडेवाडी हे बंधारे देखील आता पाण्याखाली गेलेले आहेत. नदीकाठच्या सखल भागातील शेतीत देखील पाणी घुसू लागले असल्याचे शेतकरी सांगू लागले आहेत. भीमा नदीत एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी येईल असे वाटत नव्हते परंतु अचानक पाणी वाढू लागल्याने शेतकऱ्यांची मोठी दाणादाण उडाली. नदीकाठावरील विद्युत पंप काढून घेण्यासाठी धावाधाव करावी लागली. यात काही शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचेही सांगण्यात येत आहे. प्रशासनाने वेळीच सूचना न दिल्याच्याही तक्रारी येऊ लागल्या आहेत. 


पंढरपूर येथील चंद्रभागा नदीची पातळी वाढलेली असून चंद्रभागेतील मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. जुन्या दगडी पुलावरील पाण्याची पातळी देखील वाढत असून प्रशासनाने पूर्ण खबरदारी घेतली आहे. (Bhima river flooded, water level increased) नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांचे स्थलांतर आणि सुरक्षा याबाबत उपाययोजना करण्यात आल्या असून संबंधित भागातील नगरसेवक देखील या नागरिकांच्या मदतीसाठी सज्ज असल्याचे दिसत आहे. 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !