BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१४ ऑग, २०२२

सोलापूर जिल्ह्यात कोरोनाला ओहोटी !

 


सोलापूर : जगाला काळजीत टाकणारा कोरोना आता शिथिल होऊ लागला असून सोलापूर जिल्ह्यातील कोरोनाचे आक्रमण आता परतू लागले आहे. कोरोना वाढण्याची भीती व्यक्त होत असतानाच ही लाट ओसरताना दिसत आहे. 


कोरोनाने संपूर्ण जगाला वेठील धरले आणि आयुष्याची सगळी गणितं बदलून गेली. दोन वर्षांचा कालावधी माणसाना बंदिस्त करून गेला. लाखोंचे बळी गेले आणि जगलेल्यांचे रोजगार गेले. आर्थिक चक्रे कोरोनाच्या गाळात रुतून बसली असून त्यातून पूर्णपणे सावरण्यासाठी अजूनही वेळ लागणार आहे. पहिल्या, दुसऱ्या लाटेने भयावह नुकसान केले आणि त्यानंतर पुन्हा तिसरी लाट आली. तिसरी लाट येण्याबाबत मतमतांतरे होती पण चोरपावलाने तिसरी लाट आली, अर्थात या लाटेचा प्रभाव पहिल्या लाटांसारखा नव्हता त्यामुळे ही लाट फारसे काही करू शकली नाही. अजूनही मुंबईत कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत पण या लाटेचा प्रभाव तितकासा नसल्याने नागरिकांनी ही लाट फारशी मनावर घेतली नाही. कोरोनाचे नियम पाळण्याचे आवाहन केले गेले असले तरी कुणीही कोरोना प्रतिबंधात्मक नियम आचरणात आणताना दिसत नाही. 


कोरोना प्रतिबंधात्मक लसीमुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची तीव्रता कमी झाली आणि त्यामुळे पहिल्या दोन लाटांसारखे मृत्यू या लाटेत पाहायला मिळत नाही. सोलापूर जिल्हा कोरोनाच्या बाबतीत पहिल्या दहा जिल्ह्यात होता. त्यात पंढरपूर तालुका सर्वात आघाडीवर होता. हळूहळू सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत राहिले पण झपाट्याने कोरोना रुग्णांच्या संख्येला ओहोटी देखील लागू लागली आहे. सोलापूर जिल्ह्यातील कोरोणाचा प्रभाव आता कमी कमी होत असून जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोना केवळ नावापुरता उरला असल्याचे दिसत आहे. (Corona patients are negligible in Solapur district) सोलापूर शहरात कोरोना रुग्णांची संख्या २७ तर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सर्व तालुक्यातील मिळून रुग्णसंख्या केवळ ५१ उरली आहे. 


बार्शीत सर्वाधिक रुग्ण !

सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात रुग्णांची संख्या आता नावापुरती उरली असली तरी सर्वाधिक रुग्ण हे बार्शी तालुक्यात आहेत. सर्वाधिक १६ रुग्ण बार्शी तालुक्यात तर त्या खालोखाल १० रुग्ण माढा तालुक्यात आहेत. पंढरपूर, माळशिरस, मंगळवेढा, मोहोळ या तालुक्यातून कोरोना हद्दपार झाला असून उर्वरित तालुक्यात दोन ते सात रुग्ण सक्रीय आहेत. त्यामुळे सद्या जिल्ह्यातील कोरोना लाट निष्प्रभावी ठरताना दिसत आहे. 


भीती होती पण --

कोरोना रुग्ण वाढू लागले असतानाच पंढरपूरची आषाढी यात्रा सुरु झाली होती. राज्यातून कोनाकोपऱ्यातून भाविक पंढरीत आले होते, विविध गावांतून पालखी सोहळे पंढरपूरला पोहोचले होते. लाखोंची गर्दी एकत्र जमल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढेल अशी भीती होती, विशेष म्हणजे मास्क सक्ती नसल्याने आषाढी यात्रा विनामास्क पार पडली होती. यात्रा संपल्यानंतर पंढरपूर तालुक्यात कोरोनाचा मोठा प्रभाव जाणवेल आणि राज्यातील रुग्णसंख्या वाढेल अशी भीती होती परंतु सुदैवाने असे काहीच झाले नाही. यापुवीचे अनुभव वेगळे होते. 


पाच हजार मृत्यू !

सोलापूर जिल्ह्यात कोरोनामुळे ५ हजार २४१ रुग्णांना आपला प्राण गमवावा लागला आहे. सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये १ लाख ८७ हजार २०९ नागरिकांना कोरोनाची लागण झाली तर सोलापूर शहरात ३४ हजार २४४ नागरिक कोरोनाबाधित झाले होते. एप्रिल २०२० मध्ये सोलापुरात पहिला कोरोना रुग्ण आढळून आला होता आणि त्यानंतर रुग्णांचे आणि मृत्यूचे आकडे वाढत राहिले. कठीण परिस्थिती असतानाही सोलापूर जिल्ह्यातील २ लाख १६ हजार १३४ नागरिकांनी कोरोनाला हरवले आहे.


प्रभाव बोथट झाला !

कोरोनाची तीव्रता तिसऱ्या लाटेत कमी झाली आणि यासाठी लसीकरण महत्वाचे ठरले. कोरोनाची बाधा झाली तरी आता पाच ते सहा दिवसांत रुग्ण घरीच उपचार घेत बरा होऊ लागला आहे. घरी उपचार घेण्याची परवानगीही आता देण्यात आली आहे. अत्यंत जीवघेणा ठरलेला कोरोना आता बोथट झाला असून रुग्णात तीव्र अथवा मध्यम स्वरुपाची लक्षणेही दिसून येत नाहीत. लसीकरणाच्या माध्यमातूनच या विषाणूला प्रतिबंध करण्यात यश मिळाले असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.   


  • अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !