BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

६ ऑग, २०२२

पोलीसदादाने मागितली तब्बल एक कोटीची लाच !

 




कोल्हापूर : पोलीस शिपायाने एका वृद्ध शेतकऱ्याकडे तब्बल एक कोटीची लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून यातून पोलीस शिपायाची भूक किती असू शकते हेच दिसून आले आहे.

 
पोलीस आणि भ्रष्टाचार यांचा संबंध किती जवळचा आहे हे सामान्य जनतेलाही माहित आहे. काही पोलीस आयुष्यभर कष्ट उपसत राहतात पण कुणाच्या रुपयात मिंदे होत नाहीत तर काहीजण आयुष्यभर केवळ वसुलीचेच उद्योग करतात. पोलीस शिपायांना आपली सेवा बजावताना प्रचंड परिश्रम घ्यावे लागतात. कोरोनाच्या कालावधीत पोलिसांचे परिश्रम सर्वानाच पाहायला मिळाले आहेत पण काही मोजके पोलीस इमानदार असलेल्या पोलिसांच्या परिश्रमावर पाणी टाकतात आणि चांगल्या पोलिसांना देखील बदनाम व्हावे लागते. महसूल, पोलीस हे विभाग लाच प्रकरणात नेहमीच चर्चेत येत असतात आणि शिपायापासून साहेबांपर्यंत अनेकजण लाच लुचपत विभागाच्या सापळ्यात अडकत देखील असतात. पोलीस काही किरकोळ रकमेची लाच मागतात असा कुणाचा समज असेल तर तो खोटा आहे हे दाखविणारा धक्कादायक प्रकार कोल्हापूर जिल्ह्यात उघडकीस आला आहे. 


हातकणंगले तालुक्यातील कोरोची येथील ४० वर्षीय पोलीस शिपाई जॉन तिवडे याच्याविरोधात कोल्हापूरच्या शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्याच्या महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरण खंडपीठात दाखल असलेल्या दाव्याचा निकाल आपल्या बाजूने करून देतो असे सांगून एका वृद्ध शेतकऱ्याकडे एक कोटी लाचेची मागणी केल्याचे हे प्रकरण असून लाचेची रक्कम ऐकून पोलीस खाते देखील हादरले आहे. (A demand of one crore bribe from the police) सदर पोलीस शिपायावर गुन्हा दाखल झाला असला तरी त्याला अद्याप अटक झालेली नसून लवकरच अटक करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. या संशयित पोलिसावर आधीही एक गुन्हा दाखल झालेला होता आणि त्या प्रकरणी त्याला निलंबित देखील करण्यात आले होते. त्यानंतर आणखी एक गुन्हा त्याच्यावर दाखल झाला . 


हवेली तालुक्यातील देहूगाव येथील एका सत्तर वर्षे वयाच्या शेतकऱ्याच्या जमीनीच्या बाबतीत पुण्याच्या महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरण खंडपीठात दावा सुरु आहे. एकूण तीन दावे दाखल असून याप्रकरणी सुनावणी देखील सुरु आहे. सदर वृद्ध शेतकऱ्यास फेब्रुवारी २०२२ मध्ये एका अनोळखी व्यक्तीचा मोबाईलवर फोन आला आणि तुमच्याशी महत्वाच्या काही गोष्टीवर बोलायचे असून तुम्ही समक्ष मला भेटा असे सांगितले गेले. शिवाय आपल्याशी संपर्कात राहण्याबाबत देखील सांगण्यात आले. त्यानुसार या शेतकऱ्याने या व्यक्तीशी संपर्क ठेवला. त्यानंतर मात्र या अज्ञात व्यक्तीने या शेतकऱ्यास कोल्हापूर बस स्थानकाच्या परिसरात येण्यास सांगितले. त्यानुसार वृद्ध शेतकरी २२ मार्च २०२२ रोजी कोल्हापूर येथे दाखल झाला. 


कोल्हापूर येथे पोहोचल्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आल्यावर त्या व्यक्तीशी संपर्क साधला असता सदर अपरिचित व्यक्ती ही पोलीस असल्याचे त्यांना समजले. त्यानंतर हे दोघे कोल्हापूर येथील मध्यवर्ती बस स्थानकाच्या परिसरातील हॉटेलमध्ये गेले आणि तेथे दोघांत एक बैठक झाली. यावेळी अनोळखी असलेल्या व्यक्तीने आपले नाव जॉन तिवडे असल्याचे सांगत ओळख करून दिली. आपण पोलीस असल्याचे देखील त्याने या शेतकऱ्यास सांगितले. महसूल खात्यातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आपले जवळचे संबंध आहेत अशी बतावणी देखील त्याने केली.  तुमच्या जमिनीचे तीन दावे दाखल झालेले आहेत त्यात आपण मदत करू शकतो, ओळखीने सदर खटल्याचा निकाल तुमच्या बाजूने करता येईल पण तुमच्या विरुद्ध असलेल्या लोकांनी यासाठी मला एक कोटी देण्याचे कबूल केलेले आहे. हा निकाल आपल्या बाजूने लावून घेण्यासाठी तुम्ही किती देता ? असा सवाल करीत त्याने एक कोटीची मागणी केली.

  
वृद्ध शेतकऱ्याने त्याला काही न सांगता आपण आपल्या घराच्या लोकांशी चर्चा करतो आणि नंतर तुम्हाला सांगतो असे सांगून शेतकऱ्याने थेट लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे उप अधीक्षक आदिनाथ बुधवंत यांच्याकडे जाणे पसंत केले. तेथे संपर्क करून त्यांनी सदर जॉन तिवडे नावाच्या पोलीस शिपायाबाबत तक्रार दिली. त्यानंतर सदर शेतकऱ्याने आता पुन्हा एकदा या विभागाशी संपर्क साधला. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने एक कोटीच्या लाच मागणी प्रकरणी पडताळणी केली. या पडताळणीत सदर पोलीस शिपायाने एक कोटीच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार तिवडे याच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एक पोलीस शिपाई तब्बल एक कोटीची लाच मागतो हे ऐकून भल्याभल्यांनी तोंडात बोट घातले आहे.   
  

  • अधिक बातम्यांसाठी       येथे क्लिक        करा !


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !