BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१३ ऑग, २०२२

श्रीकांत देशमुख, अदालत मे हाजीर हो ......!


 



सोलापूर : भारतीय जनता पक्षाचे माजी सोलापूर जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख  यांना न्यायालयात हजर होण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायालयाने दिले आहेत. 


भारतीय जनता पक्षाच्या सोलापूर जिल्हाध्यक्ष पदावर असताना श्रीकांत देक्षमुख यांच्यावर एका महिलेने मोठा आणि गंभीर आरोप केल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आणि लाखो लोकांनी तो पाहून तोंडात बोट घातले. या व्हिडीओत देशमुख हे एका खोलीत बेडवर बसलेले आहेत आणि सदर महिला त्यांच्याकडे बोट दाखवत याने आपली फसवणूक केल्याचे सांगत आहे. हे सांगताना सदर महिला रडत असल्याचेही दिसत आहे.  हा धक्कादायक व्हिडीओ पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते. भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष असल्याने राज्यपातळीवर या घटनेचे पडसाद उमटले होते. 


संस्कृतीचे हक्कदार म्हणवून घेणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या  जिल्हाध्यक्षाचा हा कारनामा समोर आल्याने खळबळ उडणे स्वाभाविक होते, त्याप्रमाणे राज्यभर खळबळ उडालीही. सदर व्हिडीओ हा अत्यंत कमी लांबीचा असल्यामुळे त्यातून संपूर्ण खुलासा होत नव्हता परंतु हा व्हिडीओ लोक पहात असतानाच एक ऑडीओ क्लिप देखील व्हायरल झाली होती  आणि त्यातून सगळेच रहस्य बाहेर आले. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी देखील या घटनेची तातडीने दखल घेत सोलापूर जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देशमुख यांच्याकडून विनाविलंब घेतला गेला.  एकूण घटनेची सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक चर्चा देखील झाली. 


सदर प्रकरणी पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्यात देशमुख याच्याविरोधात गुन्हा दाखल करून तो सोलापूर येथे वर्ग करण्यात आला होता. लग्नाचे आमिष दाखवून श्रीकांत देशमुख याने आपल्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याची तक्रार सदर महिलेने पोलिसात दाखल केली आणि या तक्रारीनुसार पोलिसांनी देशमुख विरोधात गुन्हा दाखल केला. भारतीय दंड विधान कलम ३७६, ७७७, ५०४, ५०६ अन्वये दाखल करण्यात आलेला गुन्हा सोलापूरला वर्ग करण्यात आल्यानंतर देशमुख यांना अटक होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती परंतु देशमुख यांनी न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज केला आहे, त्यावर न्यायालयाने त्यांना तात्पुरता दिलासा दिला होता. (Case file against Shrikant Deshmukh) या अर्जावर अंतिम सुनावणी अद्याप झालेली नाही.


सदर अर्जावर आता १६ ऑगस्ट रोजी जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी होणार असून यावेळी आरोपी श्रीकांत देशमुख यांनी उपस्थित रहावे असे आदेश जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या. के. डी. शिरभाते यांनी दिला आहे. १६ ऑगष्ट पर्यंत देशमुख यांना अटक न करण्याबाबत न्यायालयाने यापूर्वीच आदेश दिलेले आहेत. (Srikant Deshmukh ordered to appear in court) अटकपूर्व जामिनाबाबत सरकार पक्षाने आपले म्हणणे न्यायालयात दिले असून देशमुख यांना जामीन देण्यास प्रखर विरोध केला आहे. आरोपी हा भारतीय जनता पक्षाचा माजी जिल्हाध्यक्ष असून राजकीय पार्श्वभूमी असल्याने त्याला जामीन मंजूर झाल्यास तो पळून जाण्याची दाट शक्यता आहे. तसे घडल्यास या गुन्ह्याचा तपास करणे पोलिसांना अशक्य होईल असे निदर्शनास आणून दिले आहे. शिवाय आरोपी हा युक्तिवादाच्या वेळी न्यायालयात उपस्थित असणे आवश्यक आहे असे सरकार पक्षाच्या वतीने सांगण्यात आले आहे.


आरोपीच्या वकिलाने यावर हरकत घेतली असून पिडीत महिलेने देखील आपले प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. आरोपी हा तक्रार मागे घेण्याबाबत वारंवार धमकी देत आहे तसेच आपल्या जीवाला धोका असल्याचेही पिडीत महिलेने म्हटले आहे. सरकार पक्षाचा युक्तिवाद आणि पिडीतेचे प्रतिज्ञापत्र विचारात घेवून न्यायालयाने आरोपी देशमुख यास १६ ऑगष्ट रोजी न्यायालयात हजर होण्याचे आदेश दिले आहेत. सदर प्रकरणी जिल्हा सरकारी वकील एड प्रदीपसिंह राजपूत हे सरकार पक्षातर्फे तर फिर्यादीच्या वतीने एड महेश जगताप, विद्यावंत पांढरे हे काम पाहत आहेत. एड मिलिंद थोबडे, एड बाबासाहेब जाधव हे आरोपीच्या वतीने काम पाहत आहेत.


निर्णयाकडे लक्ष !

देशमुख यांच्या अटकपूर्व जामिनावर न्यायालय काय निर्णय येतोय याकडे सर्वांचे लक्ष  लागलेले आहे. न्यायालयाने अटकपूर्व जमीन नामंजूर केल्यास देशमुख यांना अटक होण्याची शक्यता आहे. ही अटक टाळण्यासाठी त्यांचा नेटाचा प्रयत्न आहे. जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व नामंजूर केल्यास ते उच्च न्यायालयात जाऊ शकतात पण त्यांना न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश असल्यामुळे, अर्ज नामंजूर झाल्यास त्यांना तेथेच अटक होण्याची शक्यता दिसून येत आहे. त्यांच्या जामीन अर्जाचे भवितव्य १६ ऑगष्ट रोजीच ठरण्याची शक्यता आहे. 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !