आत्याबाईला मिशा असत्या तर ........? अशी आपल्याकडे एक म्हण आहे परंतु खरोखरच बाईला मिशा आणि दाढी उगवल्याचे आणि त्यांना त्याचेही अप्रूप असल्याचे समोर आले आहे.
मिशा आणि दाढी म्हटलं की पुरुष मंडळीची एक शान समजली जाते. अनेक पुरुष आपल्या मिशा पिळदार ठेवतात तर कुणी तलवार कट असलेल्या मिशा घेवून अभिमानाने मिरवत असतात. दाढी, मिशा ठेवण्याचे ज्याचे त्याचे प्रकार वेगवेगळे असतात तशी आवडही वेगळी असते. पुरुषांच्या ओठावर मिशा आणि गालावर दाढी शोभूनही दिसते पण हीच कल्पना महिलांच्या बाबतीत केली तर ....? महिलांना मिशा आणि दाढी उगवली असल्याचे कुणी सांगितले तर ...? विश्वास न बसण्यासारखी ही बाब आहे ना? पण महिलांना देखील कधी कधी दाढी मिशा येतात हे देखील तेवढेच सत्य आहे. अशा महिलांना भलतेच अडचणीचे वाटते आणि त्या नाराज देखील असतात. केरळमधील कन्नूर येथील शायजा ही ३५ वर्षे वयाची महिला मात्र नाराज तर नाहीच पण तिला आता या मिशाचे देखील एक वेगळे अप्रूप वाटू लागले आहे.
या शायजाला पुरुषाप्रमाणे मिशा आहेत केवळ मिशाच नव्हे तर तिच्या भुवया आणि चेहऱ्यावर इतर भागावर देखील अधिक प्रमाणात केस येतात. या केसांची वाढ देखील मोठी आहे. चेहऱ्यावर आणि ओठाच्या वरच्या बाजूस केस उगवल्याने शायजाला सुरुवातीला भलतेच कठीण गेले. स्वाभाविकच आहे, डोक्यावरील लांबसडक केस म्हणजे महिलांचे सौंदर्य असते. शायजाला मात्र चक्क काळ्याभोर मिशा आलेल्या होत्या. पुरुषाप्रमाणे तिचा चेहरा दिसू लागला आणि तिला हे सगळं स्वीकारण कठीण होऊ लागलं. तिच्यासाठी हा सगळा प्रकार कठीण होता. चेहऱ्यावरच हा प्रकार असल्याने तो लपवणे देखील अशक्य होते. मिशा घेवून ती समाजात वावरू लागली पण समाजात वावरताना तिला अडचणीचे वाटू लागले. लोक वेगळ्याच नजरेने तिच्याकडे पाहत होते आणि या नजरा तिला टोचत होत्या.
शायजा सुरुवातीला मिशा कापून टाकायची पण हळूहळू हे केस दाट होऊ लागले त्यामुळे गेल्या पाच वर्षांपूर्वी तिने चेहऱ्यावरील केस कापणे बंद केले. मिशा घेवून ती समाजात वावरू लागली. तिला भेटणारे लोक मिशा कापण्याबाबत विचारतात देखील पण आता ती आपल्या मिशा काढत नाही. तिच्या चेहऱ्यावरील केस आता तिला आवडू लागले आहेत. ( Kerala woman flaunt facial hair) गेल्या पाच वर्षांपासून शायजा आता ओठावरील मिशा घेवून वावरत असते आणि तिला याची आता सवय देखील झालेली आहे.
अशा मिशा असलेली शायजा ही काही एकमेव महिला नाही, हरनाम कौर ही ३१ वर्षे वयाची महिला इंग्लंडमध्ये राहते आणि तिला केवळ मिशाच नव्हे तर पुरुषासारखी चेहराभरून दाढी आहे. हरनाम ही अकरा वर्षाची असताना तिच्या मानेवर आणि हनुवटीवर केस उगवायला लागले. तिच्या आईने बाराव्या वर्षी हरनामला डॉक्टरकडे नेले. डॉक्टरांनी तिला पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम असल्याचे सांगितले.
हार्मोनच्या असंतुलनामुळे असे घडत असल्याची माहिती देखील तिला मिळाली. महिला असून तिला दाढी मिशा उगवत होत्या आणि विशेष म्हणजे तिच्या या केसांची वाढ देखील अत्यंत वेगाने होत होती. सुरुवातीला हे केस कापण्याकडे कल असलेल्या हरनाम कौरने आपला इरादा बदलला आणि पुन्हा कधीच हे केस कापायचे नाहीत असे ठरवले. आता हरनाम आपली दाढी मिशा घेऊन बिनधास्तपणे समाजात वावरत असते आणि तिला याचे आता काहीच वाटत नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !