BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२५ फेब्रु, २०२२

बुटात लपविली चावी, सव्वा लाखाला बसला फटका !

 



पंढरपूर : बुटात चावी लपवून ठेवून परगावी गेलेल्या शिक्षक दाम्पत्यांना मोठा फटका बसला असून त्यांच्या घरातील दागिने आणि रोकड असा सव्वा लाखांचा ऐवज चोरट्यांनी विनासायास लंपास केला आहे. 


अनेक नागरिक परगावी अथवा बाहेर पडताना घराला कुलूप लावतात पण घराची चावी तेथेच कुठेतरी लपवून ठेवतात. दुसरे कुणीतरी येणार असते आणि त्यांना घर उघडता यावे यासाठी केलेली ही सोय असते. चावी कुठे ठेवली आहे हे संबंधिताना सांगितलेले असते. अनेकदा घराची मंडळी बाहेर गेली तरी शाळेत गेलेली मुले घरी येणार असतात म्हणून बाहेरच कुठे ठरलेल्या जागी चावी ठेवलेली असते. कित्येकदा प्रवासात चावी हरवते म्हणूनही कुणी अशा प्रकारे चावी घराबाहेर ठेवून परगावी निघून जात असतात. अनेक नागरिक असे करतात पण कधी ही चावी चोरांच्या हातात पडली तर ते विनासायास घर साफ करून निघून जातात हे देखील समोर आले आहे. 


पंढरपूर शहराला लागून असलेल्या इसबावी परिसरात असाच प्रकार घडला असून लोखंडे शिक्षक दाम्पत्याला अशा प्रकारे घराची चावी ठेवणे तब्बल सव्वा लाखाला पडले आहे. परगावी जाताना या शिक्षक दाम्पत्यांनी घराला कुलूप तर लावले पण घराची चावी बाहेर असलेल्या चप्पल स्टॅन्डमधील एका बुटात लपवून ठेवली. शिक्षक नागनाथ महादेव लोखंडे आणि त्यांच्या शिक्षिका पत्नी सुहासिनी लोखंडे हे नोकरीच्या निमित्ताने परगावी निघून गेले असता त्यांच्या उमानगर येथील घरी चोर आले. बुटात लपवलेली चावी नेमकी या चोरांच्या हाती लागली आणि त्यांनी विनासायास या चवीच्या मदतीने घर उघडले आणि घरातील रोकड तसेच दागिने आरामात लांबवीले असल्याचे निदर्शनास आले. 


चोरटयांनी या चावीने घराचे कुलूप काढले आणि घरातील २५ हजार रुपये रोकड तसेच सोन्याचे दागिने लंपास केले. सव्वा लाख रुपयांचा ऐवज या चोरटयांनी हातोहात लांबवला आहे. नोकरीसाठी बाहेर पडलेल्या या शिक्षक दाम्पत्याना हा मोठा फटका बसला असून परिसरात चोरांची दहशत पुन्हा एकदा निर्माण झाली आहे. बंद घराचे कुलूप हे चोरट्यांसाठी खुले निमंत्रण ठरत असून अलीकडे चोऱ्यांचे प्रमाण सतत वाढत आहे. घराबाहेर पडणे हे धोक्याचे बनू लागले असून येथे तर चोरांना घराची चावीच मिळाली होती. नागरिकांनी स्वतःच पुरेशी दक्षता घेऊन आपल्या मालमत्तेचे रक्षण करण्याची गरज निर्माण झाली आहे .    


 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !