BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२६ जुलै, २०२२

थरार .......अर्धे डबे सोडून रेल्वे एक्सप्रेस पुढे धावली !

 


चाळीसगाव : अर्धे डबे अर्ध्यावरच सोडून रेल्वे पुढे धावत राहिल्याची घटना आज पाटलीपुत्र एक्सप्रेसच्या बाबतीत घडला आणि प्रवाशांत कमालीचा गोंधळ उडाला. या थरारक घटनेने प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला !


रस्त्यावरील अपघात गेल्या काही काळापासून वाढलेले आहेत आणि आता रेल्वेचे देखील अधून मधून अपघात होत आहेत. आज झालेला अपघात मात्र मोठा थरार निर्माण करून गेला. धावती रेल्वे एक्सप्रेस धावता धावता अर्धे डबे रुळावरच सोडून धावत राहिली. (Pataliputra express) एक्सप्रेसचे निम्मे डबे इंजीनासोबत धावत राहिले तर निम्मे डबे इंजिनाशिवाय रुळावर उरले. मुंबईहून पाटणाच्या दिशेने धावत असेलेल्या पाटलीपुत्र एक्सप्रेसच्या बाबतीत ही घटना घडली आहे. रेल्वे एक्सप्रेस वेगाने धावत असताना दोन डब्यांना जोडणारी कपलिंग तुटली आणि त्यामुळे अर्धी रेल्वे इंजिनाच्या सोबत पुढे गेली तर अर्धी रेल्वे मागेच राहिली.  चाळीसगाव तालुक्यातील वाघळी रेल्वे स्थानकाच्या जवळ ही अजब घटना घडली त्यामुळे रेल्वे प्रशासनाची मोठी तारांबळ उडाली. 


भुसावळमार्गाने निघालेल्या पाटलीपुत्र एक्सप्रेसमधून प्रवासी प्रवास करीत होते. ही रेल्वे वाघळी रेल्वे स्थानकापासून काही अंतर पुढे गेली त्यावेळी हा प्रकार घडला. इंजिनासोबत अर्धे डबे धावत राहिले आणि अर्धी रेल्वे मागेच राहिली. रेल्वे एक्सप्रेसचे दोन भाग झाले आणि एक रेल्वे धावत असताना विभागली गेली. हा प्रकार लक्षात आल्यावर प्रवाशांची भीतीने गाळण उडाली. रेल्वेतील प्रवाशांनी आरडाओरडा सुरु केला. लोको पायलटच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी सदर एक्सप्रेस थांबवली परंतु तोपर्यंत ही रेल्वे बरीच पुढे निघून गेली होती. (Railway Accident) जवळपास तीन किलोमीटर पुढे अर्धी रेल्वे गेली होती परंतु पुढे ती थांबविण्यात आली आणि पुन्हा रेल्वे मागे घेवून सुटलेले डबे जोडण्यात आले. त्यानंतर ही एक्सप्रेस पुढे सोडण्यात आली.  

 
अचानक घडलेल्या या प्रकाराने प्रवाशांची दाणादाण उडालीच पण रेल्वे प्रशासनाची देखील तारांबळ उडाली. या घटनेमुळे सदर मार्गावरील रेल्वे वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. दीड ते दोन तास या मार्गावरील वाहतूक थांबविण्यात आली होती त्यामुळे अनेक रेल्वे विलंबाने धावू लागल्या. (The railway express ran ahead leaving half the coaches) रेल्वे दोन भागात विभागली गेली असली तरी देखील या अपघातात कुणीही जखमी झाले नाही अथवा कसलीही जीवितहानी झाली नाही. प्रवाशांच्या काळजाचा ठोका मात्र या घटनेने चुकविला होता.  
 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !