BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२३ जुलै, २०२२

सशाची केली शिकार पण व्हिडीओमुळे पडल्या बेड्या !

 



मोहोळ : खाण्याच्या उद्देशाने सशाची शिकार करण्यात आली पण बनविण्यात आलेल्या व्हिडीओमुळे सगळेच भांडे फुटले आणि दोघांना तुरुंगाची हवा खावी लागल्याची घटना मोहोळ तालुक्यात घडली आहे. 


वन्य जीव कायद्यानुसार पशु पक्षांची अथवा अन्य कुठल्याही प्राण्यांची शिकार करणे कायद्याने प्रतिबंधित केले आहे तरी देखील काही जण खाण्याच्या उद्देशाने प्रतिबंधित असलेल्या प्राण्याची हत्या करताना दिसतात. मनाई असतानाही शिकार करण्याच्या मोहात कुणी आले आणि त्याचा सुगावा लागला की मग त्याला शिकारीऐवजी तुरुंगाची हवा खावी लागते. असाच एक प्रकार मोहोळ तालुक्यात उघडकीस आला आहे. (Hunting of wild animals, two arrested) दोघांनी सशाची शिकार केली पण त्याचा व्हिडीओ तयार झाला आणि त्यांना थेट तुरुंगाची वाट धरावी लागली. गुपचूप शिकार केली पण एका व्हिडीओ ने सगळाच प्रकार उघडकीस आला आहे. वन विभागाने मोठ्या चातुर्याने आणि कौशल्याने पोखरापूर येथील घटना प्रकाशात आणली आहे. 


मोहोळ वन विभागाला एक गुप्त माहिती मिळाली तसेच वन्यप्राणी असलेल्या सशाची शिकार करून तो खाण्याच्या हेतूने कातडी काढीत असल्याचा एक व्हिडीओ वन विभागाच्या निदर्शनास आला. ससा हा वन्य प्राणी असल्यामुळे नियमानुसार त्याची शिकार अथवा हत्या करता येत नाही. प्राप्त व्हिडीओमध्ये मात्र सशाची कातडी काढली जात असल्याचे दिसून येत होते. वन विभागाने या व्हिडीओचा माग घेतला असता हा व्हिडीओ मोहोळ तालुक्यातील पोखरापूर येथील असल्याची माहिती वन अधिकारी यांना मिळाली. मोहोळ वन परिक्षेत्र अधिकारी सतीश उटगे हे क्षेत्रीय कर्मचारी यांना सोबत घेऊन पोखरापूर येथे धडकले. गावात चौकशी करून माहिती घेतली असता हणमंत विठ्ठल खंदारे आणि बिरुदेव विठ्ठल खंदारे या दोघांच्या बाबत माहिती मिळाली. 


वन अधिकारी आणि कर्मचारी यांनी सदर दोघांचा शोध घेतला आणि त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता या घटनेबाबत अधिक प्रकाश पडला. वन अधिकारी यांनी या दोघांच्या विरोधात वन्यजीव संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आणि सशाची शिकार करणाऱ्या दोघा संशयिताना अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्यांना वन कोठडीचा आदेश दिला. सोलापूर येथील उप वन संरक्षक पाटील, वन संरक्षक आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहोळ वन विभागातील अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !