BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२३ जुलै, २०२२

लाचखोर महिला तलाठ्यास तीन वर्षे तुरुंगवास !



सोलापूर : फुकटच्या पैशाचा मोह भलताच अंगलट आला आणि एका महिला तलाठ्यास अवघ्या पाचशे रुपयांच्या लाचेसाठी न्यायालयाने तीन वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. 


महसूल आणि पोलीस विभागातील भ्रष्टाचाराची नेहमीच चर्चा होते, शासनाच्या विविध विभागातील अनेक अधिकारी, कर्मचारी फुकटच्या पैशाला चटावलेले असल्याचे सतत समोर येत असते. बड्या अधिकाऱ्यांपासून शिपायापर्यंत अनेकजण लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात रंगेहात सापडत असतात तरीही वेगवेगळ्या युक्त्या लढवत लाच घेण्याचा प्रयत्न केला जातो. अर्थात कितीही हुशारी दाखवली तरी ही लाचखोर मंडळी सापळ्यात अडकतातच. लाच घेताना रंगेहात पकडल्याच्या अनेक घटना आपल्या आजूबाजूला सतत घडताना दिसतात पण लाचखोरांना शिक्षा झाल्याचे जनतेपर्यंत पोहोचत नाही. लाच घेण्याच्या प्रकरणी अनेकांना शिक्षा सुनावण्यात आल्या असून सोलापूर जिल्ह्यातील एक महिला तलाठ्याला आज लाच प्रकरणी तब्बल तीन वर्षांची शिक्षा न्यायालयांने  सुनावली आहे. 


महसूल विभागातील तलाठी नेहमीच चर्चेत असताना उत्तर सोलापूर तालुक्यातील कौठाळी येथील छाया बिराजदार या महिला तलाठ्यास विशेष न्यायालयाने तीन वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. मागील आठवड्यातच एका लाचखोर तलाठ्याला लाच घेतल्याप्रकरणी तब्बल पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. या लाचखोर तलाठ्यांची चर्चा अद्याप सुरु असतानाच एका महिला तलाठ्याला कायद्याचा दणका बसला आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील कौठाळी येथील शेतजमिनीचे वाटप पात्रात नोंद घेऊन सात बारा आणि आठ अ चा उतारा एका शेतकऱ्यास हवा होता. गाव कामगार तलाठी छाया बिराजदार या महिला तलाठ्याने या कामासाठी तक्रारदारांकडे पाचशे रुपयांची लाच मागितली होती. 


सदर कामासाठी लाच देणे मान्य नसल्यामुळे संबंधित तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार दिली. सदर विभागाने याप्रकरणाची पडताळणी केली आणि आपल्या पद्धतीने सापळा लावला. उत्तर सोलापूर तहसील कार्यालयात ही लाच देण्याचे ठरल्यामुळे २२ जुलै २०१४ रोजी तहसील कार्यालयातच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावला. या सापळ्यात लाच घेताना छाया बिराजदार ही महिला तलाठी रंगेहाथ सापडली होती. शासकीय कामासाठी लोकसेवकाने पदाचा गैरवापर करून लाचेची मागणी केली आणि ती स्वीकारली म्हणून या लाचखोर महिला तलाठ्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 


सदर खटल्याची सुनावणी होऊन न्यायालयाने या महिला तलाठ्यास दोषी धरले आणि शिक्षा सुनावली. या खटल्यात चार साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीपुरावे, सरकारी वकिलांचा युक्तिवाद यातून गुन्हा सिद्ध झाल्याने न्यायालयाने या तलाठी महिलेस सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.  एकूण शिक्षेत तीन वर्षे सक्तमजुरी, दोन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास आणखी दोन महिने सध्या कारावासाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. (Bribery case: Woman Talathi sentenced to three years)या खटल्यात सरकार पक्षातर्फे ऍड प्रकाश जाणणे तर आरोपीच्या वतीने ऍड राहुल खंडाळ यांनी काम पहिले.  


महसूल हादरले !

न्यायालयातून लाच प्रकरणी शिक्षा होण्याची ही आठवड्यातील दुसरी घटना असून दोन्ही प्रकरणे महसूल विभागातीलच आहेत. लाचखोरीबाबत एका तलाठ्यास नुकतीच पाच वर्षांची शिक्षा न्यायालयाने ठोठावली होती तर त्यानंतर लगेच एका महिला तलाठ्याला तीन वर्षांचा सश्रम कारावास सुनावण्यात आला आहे. या दोन्ही शिक्षामुळे महसूल विभाग हादरला असून लाचखोर घाबरून गेले आहेत. 


अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !