BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२८ जुलै, २०२२

महाराष्ट्रात पुन्हा सत्तांतर होण्याचे संजय राऊत यांचे सुतोवाच !



मुंबई : महाराष्ट्रात पुन्हा सत्तांतर झाल्यास आश्चर्य वाटून घेऊ नका' असे विधान शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केले असून यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे.


राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून रोज नव्या घडामोडी घडत आहेत. शिवसेनेचे कधीकाळी एकनिष्ठ म्हणवले जाणारे एकनाथ शिंदे यांनी बंड केले आणि सेनेतील ४० आमदारांना सोबत घेवून गुवाहाटी गाठली. भाजपच्या मदतीने राज्यात सरकार स्थापन केले परंतु या नव्या सरकारचे भवितव्य सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून आहे. एकनाथ शिंदे यांनी सरकार स्थापन केले पण २६ दिवस उलटून गेले तरी या सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार होऊ शकला नाही. केवळ दोघांवरच सरकार सुरु असून अंतर्गत कलह सुरु झाला असल्याची देखील राजकीय चर्चा होऊ लागली आहे. शिवसेनेतून फुटल्यानंतर शिंदे गटाला कुठल्यातरी पक्षात विलीन व्हावे लागणारच आहे असे घटनेचे जाणकार सांगत आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल राज्याच्या राजकारणावर मोठा परिणाम करणारा ठरणार आहे. 


आपली बाजू न्यायालयात भक्कम असल्याचा दावा शिंदे गटाकडून केला जात असताना घटनेचे अभ्यासक मात्र वेगळेच सांगत आहेत. शिवसेना आपलीच आणि आपण अजूनही शिवसेनेत आहोत असे देखील शिंदे गट सतत सांगत आहे पण सर्वोच्च न्यायालयात काय घडतेय यावर सरकारचे भवितव्य अवलंबून आहे आणि येत्या १ ऑगस्ट रोजी सुनावणीची तारीख आहे. या दिवशी न्यायालय काही निर्णय देतेय की तो लांबणीवर पडतोय हे पाहावे लागणार आहे. परंतु शिवसेनेचे खासदार आणि नेते संजय राऊत यांनी मात्र आज एक सूचक वक्तव्य केल्याने आणखी एकदा खळबळ उडाली आहे. "महाराष्ट्रात पुन्हा एकदा सत्ता परिवर्तन झाल्यास आश्चर्य वाटून घेऊ नका " असे विधान संजय राऊत यांनी केले आहे. 


संविधान आणि कायद्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालय निकाल देणार नाही  त्यामुळे १६ आमदार अपात्र ठरतील यावर आमचा विश्वास आहे असे राऊत यांनी म्हटले आहे. शिंदे गटात गेलेल्या आमदारांना दुसऱ्या पक्षात विलीन होण्याशिवाय पर्याय तर नाहीच, दुसऱ्या राजकीय पक्षात विलीन झाल्यावर हे स्वत:ला शिवसैनिक कसे म्हणवून घेणार? शिंदे गटात गेलेले अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत आणि त्यांना दुसऱ्या पक्षात विलीन होण्याची इच्छा नाही. दुसऱ्या पक्षात विलीन होण्याची किती आमदारांची मानसिक तयारी आहे याची आम्हाला कल्पना आहे. बचाव करण्यासाठी दुसऱ्या पक्षात विलीन व्हावे लागले तर त्यांना शिवसैनिक म्हणवून घेता येणार नाही हे उघड आहे.


भारतीय जनता पक्षाला शिवसेना फोडायची होती, पालिका, स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या निवडणुकीत महाराष्ट्राला दुबळे आणि मराठी माणसाला कमजोर करण्याचे कारस्थान झाले आहे, सद्या त्यांना यश मिळताना दिसत असेल पण हे यश अधिक काळ टिकणार नाही.  शिवसेनेतून बाहेर पडून काय मिळवलं आणि महाराष्ट्राला काय दिलं यावर आत्मचिंतन करण्याची वेळ आली असून गेल्या महिन्यापासून महाराष्ट्राच्या राजकारणाचा खेळखंडोबा झालेला आहे. (Sanjay Raut said, change of power in Maharashtra again) मंत्रीमंडळाची स्थापना होऊ शकली नाही आणि एक महिना झाला तरी दोघांचेच सरकार बेकायदेशीर पणे निर्णय घेत आहे 


राज्याची सूत्रे दिल्लीत !
महाराष्ट्राची सूत्रे मुंबईतून नव्हे तर दिल्लीतून हलत आहेत. शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांना कधी दिल्ली वाऱ्या कराव्या लागल्या नाहीत, शिवसेनेचे हायकमांड नेहमी मुंबईतच राहिले आणि मुंबईतच निर्णय झाले. आता मात्र मुंबईत चर्चा न होता दिल्लीत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा काल दिल्लीला जाणार होते पण हा दौरा रद्द झाला आहे. गेल्या २६ दिवसात मुख्यमंत्री शिंदे यांचा हा पाचवा दिल्ली दौरा होता. युती करण्यासाठी दिल्लीतून लोक मुंबईत येत होते पण आता मुख्यमंत्र्यांना मुंबईहून दिल्लीकडे जावे लागते आहे. मुख्यमंत्री आपला मुक्काम दिल्लीतच हलवतात की काय असे वाटू लागल्याचे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे. 



 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !