BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१४ जून, २०२२

पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमात अजितदादांचा अवमान !



 



पुणे : देहू येथे झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा अवमान झाल्याच्या प्रकरणी राज्यात पडसाद उमटले असून हा राज्याचाच अपमान असल्याच्या प्रतिक्रिया येवू लागल्या आहेत.

 
देशाचे पंतप्रधान आज देहू येथील एका कार्यक्रमासाठी आले होते. राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे विमानतळावर स्वागत केले. अत्यंत देखण्या कार्यक्रमात मात्र वेगळेच घडले आणि त्याचे स्वाभाविकपणे पडसाद उमटले. या कार्यक्रमात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे भाषण झाले परंतु राज्याचे उप मुख्यमंत्री असलेल्या अजित पवार यांना बोलू दिले नाही. या कार्यक्रमात अजित पवार यांचे भाषण व्हायला हवे होते, ते राज्याचे उपमुख्यमंत्री तर आहेतच पण ज्या जिल्ह्यात देशाचे पंतप्रधान आले आहेत त्या जिल्ह्याचे ते पालकमंत्री देखील आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना भाषणाची संधी देण्यात आली परंतु अजित दादांना (Ajit Pawar) डावलण्यात आले. ही बाब राजकीय वर्तुळात तर खटकलीच आहे पण सामान्य जनतेतून देखील चर्चा होऊ लागली आहे. 


राष्ट्रवादीच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रकाराबाबत प्रचंड नाराजी व्यक्त करून हा महाराष्ट्राचा आणि पुणे जिल्ह्याचाही अपमान असल्याचे म्हटले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री असूनही देहूतील कार्यक्रमात अजित पवार यांना बोलू न देणे हा महाराष्ट्राचा अपमान आहे असे मला वाटते' अशी प्रतिक्रिया खा. सुप्रिया सुळे यांनी दिली. अजित पवार हे पालकमंत्री आहेत त्यामुळे प्रोटोकॉलनुसार पंतप्रधान आले असता त्या कार्यक्रमास जावे लागते. या कार्यक्रमात त्यांना बोलू न देणे हे अयोग्यच आहे. (Insult to Ajit Pawar in Modi's program) पंतप्रधान कार्यालयाकडे तशी परवानगीही मागण्यात आली होती अशी माहिती खा. सुळे यांनी दिली आहे. 


दुर्दैवी घटना - सुळे 

अत्यंत दुर्दैवी घटना असून हा महाराष्ट्राचा अपमान आहे, पुण्याचा अपमान आहे, महाराष्ट्र सरकारने विनंती पाठवली होती पण केंद्राने ती नाकारली होती, देवेद्र फडणवीस यांना संधी देण्यात आली. विरोधी पक्षनेत्यांना संधी दिली जात असेल तर अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, त्यांना संधी न देणे म्हणजे महाराष्ट्राचा अपमान आहे. एवढ्या कोत्या मनाचे राजकारण पहिल्यांदाच होत आहे असे खा. सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.  


हे तर जाणीवपूर्वक !
देहू येथील कार्यक्रमात अजित पवार यांना बोलू न देणे हे जाणीवपूर्वक घडले असल्याचे दिसते अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी व्यक्त केली आहे. अजित पवार यांनी गेल्या वेळी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबाबत महत्वाच्या व्यक्तीकडून झालेली वक्तव्ये पंतप्रधान यांच्या निदर्शनास आणून दिली होती त्याचाच राग यावेळी निघालेला दिसतो असे सावंत यांनी आपल्या ट्वीटमधून म्हटले आहे. 


देशाची माफी मागावी 
अजित पवार यांच्याबाबत हे जाणीवपूर्वक घडले असेल तर त्यांनी देशाची माफी मागावी असे राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे. या प्रकाराबाबत राजकीय वर्तुळात अनेक प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते देखील या प्रकारावर नाराज असून सामान्य जनतेतून देखील नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. 


मोदींनी निर्देश केला पण --
देवेंद्र फडणवीस यांचे भाषण संपल्यानंतर निवेदकाने भाषणासाठी पंतप्रधान यांचे भाषणासाठी नाव घेतले तेंव्हा स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे हात केला होता. अखेर पंतप्रधान मोदी यांना भाषणासाठी उठावे लागले.    







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !