BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

३० मे, २०२२

विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीचे धुराडे पेटले !

 


पंढरपूर : अनेक दिवसापासून प्रतीक्षा असलेल्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचे धुराडे अखेर पेटले असून कारखान्याच्या निवडणुकीची घोषणा झाली आहे. 


सोलापूर जिल्ह्यातील महत्वाचा असलेला पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत आधीच संपलेली होती परंतु कोरोना कालावधीमुळे ही निवडणूक रखडली होती. पंढरपूर तालुक्यातील राजकारणात महत्वाची भूमिका बजावणारा विठ्ठल सहकारी साखर कारखाना गेल्या काही काळापासून वादात सापडला आहे. कर्ज आणि एफआरपी रक्कम न दिल्यामुळे सभासदात असंतोष तर होताच यावर्षी हा कारखाना सुरु देखील होऊ शकला नाही.  संचालक मंडळातील दुही देखील चव्हाट्यावर आली असून ही निवडणूक लढविण्यासाठी अनेकांनी तयारी करून ठेवली आहे. दिवंगत आमदार भारत नाना भालके यांच्या चेअरमनपदाच्या कारकिर्दीत मौन बाळगणारे देखील आता या कारखान्यावर तोंडसुख घेताना दिसून आले आहेत. 


विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची ही निवडणूक यावेळी वेगळीच रंगत आणणार हे उघड आहे. अनेक दिवसांपासून ही निवडणूक जाहीर होण्याची अनेकांना प्रतीक्षा होती.  निवडणूक कार्यक्रमाला मान्यता दिली असून त्यानुसार ही निवडणूक ५ जुलै रोजी होणार आहे. कारखान्याच्या निवडणुकीची प्रक्रिया राबविण्यासाठी प्रांताधिकारी गजानन गुरव यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. ३ जून ते ९ जून दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत तर १० जून रोजी अर्जांची छाननी होणार आहे. अर्ज माघारी घेण्याची मुदत २७ जून पर्यंत असणार आहे तर २८ जून रोजी निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाणार आहे. निवडणुकीतील प्रत्यक्ष मतदान ५ जुलै रोजी घेतले जाणार असून ६ जुलै रोजी मतमोजणी केली जाणार आहे.  


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !