BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१५ मे, २०२२

आणखी एका शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न !

 



पंढरपूर : तालुक्यातील आणखी एका शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला असून सदर प्रकार बेकायदा सावकारीतून झाला असल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबियाकडून होऊ लागली आहे.


पंढरपूर शहर आणि तालुक्यात बेकायदा सावकारीच्या तक्रारी नेहमीच्या असून सावकारीच्या जाचाला कंटाळून काही आत्महत्या झालेल्या आहेत. पोलिसांकडून काही सावकारांच्या मुसक्या आवळल्या गेल्या आहेत पण सावकारी कमी होताना दिसत नाही. गरीब व्यापारी, सामान्य शेतकरी आर्थिक अडचणीत असतो तेंव्हा अवास्तव व्याज दराने सावकाराकडून कर्ज घेतो आणि त्यानंतर मात्र यात वाद निर्माण होऊन विषय टोकाला पोहोचतो. अडचणीत असलेले शेतकरी सावकारी व्याजामुळे आणखीच अडचणीत येत असतात. कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्यासारखे पाऊल उचलतात. कर्जबाजारी होण्यामागे देखील अनेक कारणे असतात. अलीकडेच पंढरपूर तालुक्यातील एका शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना अजूनही चर्चेत असताना तालुक्यात आणखी एक आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. 


वाखरी येथील परमेश्वर पोरे या शेतकऱ्याने सावकाराच्या त्रासाला कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा काल प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे या शेतकऱ्याने व्हिडीओ बनवत हा प्रकार केल्याचे समाज माध्यमावर देखील पाहायला मिळाले आहे. परमेश्वर कृष्णदेव पोरे (वय ४५)  यांनी विष प्राशन केल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. (Attempted suicide of a farmer by poisoning) या एकूण दुर्दैवी प्रकाराबाबत पोरे यांच्या पत्नीने सावकारावर अनेक प्रकारचे आरोप केले आहेत. मारहाण, दमदाटी झाल्याचीही त्यांची तक्रार आहे.


मुलाला ब्रेन ट्युमर 
परमेश्वर पोरे यांच्या लहान मुलाला ब्रेन ट्युमरचा आजार आहे आणि त्याच्या उपचारासाठी पोरे कुटुंबाचा अनेक दिवसांपासून प्रयत्न सुरु आहे. महागडा उपचार त्यांच्या आवाक्याबाहेर जाऊ लागल्याने उपचाराच्या खर्चासाठी त्यांनी आपली जमीन विकली होती. या जमिनीच्या वादातून आणि एकंदर निराशेतून पोरे यांनी टोकाचे पाऊल उचलले आणि विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.  


परस्पर जमीन विक्री 
एका सावरकाराकडून पोरे यांनी मुलाच्या उपचारासाठी काही रक्कम घेतली होती आणि त्या बदल्यात त्यांनी आपल्या शेतजमिनीची खरेदी दिली होती. कर्जाची रक्कम परत दिल्यानंतर ही जमीन परत करण्याचे ठरले होते असे सांगण्यात येत आहे. सावकाराने मात्र पोरे यांना काहीही न सांगता सदर जमीन अन्य व्यक्तीला विकली आणि शेतीचा कब्जा घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि यावेळी मारहाण देखील करण्यात आली असा आरोप पोरे यांच्या पत्नींनी केला आहे. 


हे देखील वाचा :



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !