सोलापूर : सोलापूर अन्न आणि औषध प्रशासनाने एका वर्षात चार कोटी रुपयांचा गुटखा जप्त केला आहे त्यामुळे जिल्हाभरात विकला जाणारा चोरटा गुटखा किती असू शकेल याचा सहज अंदाज येत आहे.
महाराष्ट्रात गुटखा बंदी असली तरी कुठल्याही शहरात आणि खेड्यात देखील तो सहज उपलब्ध होताना दिसतो. गुटख्यावर बंदी आणल्यानंतर छोट्याश्या पुडीची किंमत देखील प्रचंड वसूल करण्यास सुरुवात झाली. अवाजवी किंमत आकारली तरी गुटखा शौकीन ती घेतात आणि रस्ते, इमारतीचे कोपरे मोफत रंगवून देतात, जागोजागी चित्रविचित्र नकाशे काढत असतात. या गुटख्याची क्रेझ तरुण वर्गात अधिक असून शाळा महाविद्यालयातील अनेक मुले देखील गुटख्याचे तोबरे भरलेले दिसतात. बंदी असलेला गुटखा सगळीकडे उपलब्ध होतो आणि याची मोठी वाहतूक देखील होत असते. अधूनमधून अशी वाहतूक पकडलीही जाते. कधीतरी गुटखा विकणाऱ्या टपरीचालकाच्या विरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात येत असतो.
राज्यात बंदी असलेला गुटखा आणि सुगंधित तंबाखूच्या विक्रीवर नियंत्रण आणण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासन पोलिसाची मदत घेत विविध ठिकाणी कारवाई करीत असते. सोलापूर शहर आणि ग्रामीण विभागात एका वर्षात अशा १३८ धाडी टाकून तब्बल ३ कोटी ९४ लाख ११ हजारांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. या सर्व धाडीत १०५ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आले तर ८० आस्थापना सील केल्या गेल्या. (Four crores gutaka seized in Solapur district) ही कारवाई सातत्याने झाल्यास काही नियंत्रण येण्याची शक्यता आहे.
पथक आले रे !
अन्न आणि औषध प्रशासनाचे पथक आल्याची चाहूल गुटखा विक्रेत्यांना लागते आणि पथक परत जाईपर्यंत गुटखा मिळणे बंद होते. पंढरीत देखील नुकतेच असे पथक आल्याची चर्चा शहरभर पसरली होती आणि गुटखा विक्रेते वेळीच सावध झाले होते. पंढरपूर शहरासह इसबावी, टाकळी परिसरात काही दुकानांत तरुणांची प्रचंड गर्दी होते आणि येथे काहीतरी तोंडात कोंबून तरुण तोबरे भरून जाताना दिसतात याचीही नेहमीच चर्चा सुरु असते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !