कोल्हापूर : देवदर्शनासाठी आलेल्या सोलापूर येथील एका तरुण भाविकाचा पंचगंगा नदीत बुडून मृत्यू झाला असून सलग दोन दिवसात घडलेली ही दुसरी दुर्घटना आहे.
सोलापूर येथून केशव नंदकुमार अलकुंटे (बुधवार पेठ, सोलापूर ) हा अठरा वर्षे वयाचा युवक भाविक आपल्या मित्रांसह सोलापूर येथून कोल्हापूरला देवदर्शन करण्यासाठी गेला होता. गवंडी काम करणारा केशव आज आपल्या मित्रासह कोल्हापुरात दाखल झाला आणि पंचगंगा नदीत स्नान करून अंबाबाई दर्शन घेण्याचे आणि पुढे ज्योतिबाच्या दर्शनासाठी जाण्याचे नियोजन या सर्व मित्रांनी केले होते. त्यानुसार हे सगळे मित्र पंचगंगा नदीवर स्नानासाठी गेले. पंचगंगेच्या घाटावरील हनुमान मंदिराजवळ तो पोहोण्यासाठी पाण्यात उतरला पण पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तो या पाण्यात बुडाला. त्याचे कपडे घाटाच्या पायरीवर होते पण तो मात्र दिसत नव्हता त्यामुळे तो बुडाला असल्याचा अंदाज त्याच्या मित्रांना आला.
सर्वांनी केशवचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण तो सापडला नाही. त्यानंतर या दुर्घटनेची माहिती अग्निशामक दलाला मिळाली आणि त्यांनी पंचगंगेत केशवचा शोध सुरु केला. बोटीच्या सहाय्याने अग्निशामक दल त्याचा शोध घेत होते परंतु त्याचा काहीच ठावठिकाणा लागत नव्हता. अग्निशामक दलाने अखंडपणे चार तास प्रयत्न केल्यानंतर केशव अलकुंटे याचा मृतदेह हाती लागला. (Young devotee drowns in Panchganga river) देवदर्शनासाठी आलेल्या तरुण भाविकाचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने पंचगंगा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
दुसरी घटना !
यापूर्वी देखील पंचगंगा नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाल्याच्या काही घटना घडल्या आहेत परंतु सलग दोन दिवसात दोन दुर्घटना घडल्या. नदीत पोहायला गेलेल्या राजबागेश्वर येथील एका तरुणाचा काल सायंकाळीच बुडून मृत्यू झाला आहे तर आज सोलापूर येथील एका तरुण भाविकाचा मृत्यू झाला आहे. दोन दिवसातील ही दुसरी दुर्घटना आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !