BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२९ एप्रि, २०२२

विशाल फटे विरुद्ध चौदाशे पानांचे आरोपपत्र दाखल !




बार्शी : महाराष्ट्रात खळबळ उडवून दिलेल्या विशाल फटे आर्थिक घोटाळयाप्रकरणी (Financial scam) बार्शी पोलिसांनी चौदाशे पानांचे दोषारोपपत्र येथील विशेष न्यायालयात दाखल केले आहे. 


मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना परतावा दिला नाही आणि त्यांची फसवणूक तसेच आर्थिक गैरव्यवहार केल्याच्या प्रकरणाचा राज्यभर मोठा गाजावाजा झाला होता. शंभर कोटींचा घोटाळा झाल्याचेही सांगितले जात होते परंतु प्रत्यक्षात एवढ्या मोठ्या रकमेचा हा घोटाळा नव्हता असे देखील नंतर समोर आले होते. या प्रकरणी मुख्य आरोपी विशाल अंबादास फटे, अंबादास गणपती फटे, वैभव अंबादास फटे, राधिका विशाल फटे, अलका अंबादास फटे यांच्याविरुद्ध बार्शी पोलिसांनी दोषारोपपत्र न्यायालयात सदर केले असून हे आरोपपत्र एक हजार चारशे पानांचे आहे.  बार्शी येथील दीपक बाबासाहेब अंबारे यांनी बार्शी शहर पोलीस ठाण्यात या आर्थिक गैरव्यवहार आणि फसवणूक याबाबत फिर्याद दाखल केली होती. 


शेअर मार्केटमध्ये रक्कम गुंतवणूक करून फायदा मिळवून देण्याचे आश्वासन दिल्याने अंबारे यांनी गुंतवणूक केली होती. विशाल फटे याच्या विश्लका कन्सल्टन्सी प्रा.लि., अलका शेअर सर्व्हिसेस, जे एम फायनांशियल सर्व्हिसेस या विशाल फटे, अंबादास फटे, वैभव फटे, अलका फटे यांच्या नावाने असलेल्या कंपनीत मोठी रक्कम गुंतवली. ट्रेडिंगमध्ये रक्कम गुंतवून रोज दोन टक्के नफा मिळवून देण्याचे अमिश फटे याने दाखवले होते असे फिर्यादीचे म्हणणे आहे. त्याच्या या बोलण्यावर  विश्वास ठेवून दीपक अंबारे यांनी ९६ लाख ५० हजार, फिर्यादी दीपक यांचा भाऊ किरण यांनी ५० लाख आणि त्याचा मित्र असलेल्या संग्राम मोहिते याने ३ कोटी ६० लाख २० हजार रुपयांची गुतंवणूक केली. रोहित व्हनकळस याने ३५ लाख, सुनील जानराव याने २० लाख, हनुमंत ननवरे याने २ लाख असे ५ कोटी ६३ लाख २५ हजार रुपयांची गुंतवणूक केली असल्याचे फिर्यादीने म्हटले आहे.  


आरोपी फटे याने ही रक्कम परत न देता विश्वासघाताने फसवणूक केली असल्याची फिर्याद बार्शी पोलीस ठाण्यात दिल्यानंतर हे प्रकरण राज्यभर चर्चेचे ठरले होते. (Fourteen hundred page chargesheet against the vishal fate) पोलिसांनी याप्रकरणी सखोल तपास करून बार्शी येथील विशेष न्यायालयात चौदाशे पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. 


४१ कोटींची फसवणूक 
पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या आरोपपत्रात एकूण ५५९ गुंतवणूकदार व्यक्तींची ४१ कोटी १४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे म्हटले आहे. एकूण १०१ साक्षीदारांची टिपणे या सोबत जोडण्यात आली आहेत. महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबंधांचे संरक्षण अधिनियमाच्या कलमानुसार हे दोषारोपपत्र दाखल केले आहे.       
 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !