BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२३ एप्रि, २०२२

'हनुमान चालीसा' च्या राजकारणावर वारकरी खवळले !

 




सद्या सुरु असलेले  'हनुमान चालीसा' चे राजकारण बंद करावे अन्यथा वारकरी समिती पोलिसात गुन्हे दाखल करील असा सणसणीत इशारा वारकरी सेवा समितीने दिला आहे. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील सभेत मशिदीवरील भोंगे काढण्याचा मुद्दा उपस्थित केल्यापासून राज्यातील वातावरण बरेचसे दुषित झाले आहे. त्यातच हनुमान चालीसा विषयावरून राजकीय वातावरण देखील ढवळून निघाले आहे आणि आता राज ठाकरे हे औरंगाबाद येथे एक सभा घेणार असून या सभेला मुस्लीम बांधवांनी विरोध दर्शविला आहे. मनसे मराठीच्या मुद्द्यावरून थेट भोंग्यावर पोहोचली असून सामाजिक तेढ निर्माण केली जात असल्याचा आरोप जोर धरू लागला आहे. मुस्लीम बांधव विरोध करीत आहेतच पण आता राज ठाकरे यांच्यावर वारकरी देखील खवळले असल्याचे दिसत आहे. मशिदीवरील भोंगे (The speaker on the mosque) आणि हनुमान चालीसा यामुळे अकारण धार्मिक तेढ निर्माण होताना दिसत असून शांत महाराष्ट्र आतून अशांत होऊ लागला आहे. 


धार्मिक मुद्दे उपस्थित केले जात असले तरी सर्वसामान्य माणूस याचा हेतू ओळखून आहे. राजकारणासाठी असे वेगवेगळे मुद्दे काढले जातात हे राज्याच्या परिचयाचे झाले आहे. परंतु सर्वधर्मसमभाव मानणाऱ्या वारकरी समाजाने आता यात उडी घेतली आहे. हनुमान चालीसाचे सद्या सुरु असलेले राजकारण बंद करावे अन्यथा वारकरी समिती स्वत: याबाबत गुन्हे दाखल करील असा इशारा आता वारकरी समितीचे प्रा. अमर ठोंबरे यांनी दिला आहे. झणझणीत अंजन घालणारे काही सवाल देखील त्यांनी उपस्थित केले असून हिंदू मुस्लीम एकोप्याची अनेक उदाहरणे त्यांनी मांडली आहेत. 

नाशिक शहरात मुस्लीम बांधवांनी हनुमान मिरवणुकीवर फुले उधळली, ईद असूनही पंढरीत वारकरी दाखल झाले आहेत म्हणून मुस्लिमांनी मांसाहार करणार नाही असे सांगितले. एवढा एकोपा राजकीय आंधळेपण आलेल्यांना दिसत नाही का ? असा सवाल देखील प्रा. अमर ठोंबरे यांनी विचारला आहे. बारा वर्षानंतर नाशिक येथे भरणाऱ्या कुंभमेळ्यात मुस्लीम बांधवांनी हिंदू साधुना, महंतांना थंड पाण्याच्या  बिसलरी बाटल्यांचे वाटप केले होते हे यांच्यापैकी कुणालाच दिसले नाही काय ? असे देखील ठोंबरे म्हणाले आहेत. 

आषाढी एकादशीला पंढरीत वारकरी भाविकांची गर्दी होते, आषाढी एकादशी आणि बकरी ईद एकाच दिवशी आल्यामुळे पंढरीतील मुस्लीम बांधवांनी आधीच एक बैठक घेतली आणि मांसाहारी ईद साजरी करणार नाही असा निर्णय घेतला होता. ईद असून देखील बोकडाचा बळी दिला गेला नाही. कोरोनाच्या कालावधीत प्रेते उचलून स्मशानभूमीत नेण्याचे काम अनेक मुस्लीम तरुणांनी केले. इथल्या बकरी ईद सणाच्या निमित्ताने नमाज आदा करताना मुस्लीम बांधवांनी 'भारत देश हमारा है, हम सब एक है ' असा नारा दिला होता. एवढेच काय तर, परवाच्या हनुमान जन्मोत्सवाच्या मिरवणुकीत मुस्लीम बांधवांनी फुले उधळून हिंदू धर्माच्या बाबतीत आपला आदर व्यक्त केला होता. अशी अनेक  उदाहरणे असताना केवळ मतावर डोळा ठेवून दोन धर्मात तेढ निर्माण करण्यासाठी मशिदीवरील भोंगे प्रकरण सुरु केले असल्याचे प्रा. अमर ठोंबरे यांनी म्हटले आहे. 


हातावर पोट असलेले अनेक मुस्लीम आणि हिंदू कुटुंब आहेत, भविष्यात काही वाद उद्भवले तर रस्त्यावर उभे राहून पोट भरणारे हेच गरीब लोक बळी ठरतील. सामान्य माणूस आता हिंदू किंवा मुस्लीम असा भेद आणि वाद करीतच नाहीत. रस्त्यावर येवून दुसऱ्या धर्मातील आपल्याच देशाबंधावना मारतील एवढे लोक धर्मभोळे नाहीत. त्यामुळे वारकरी सेवा समिती भोंगे प्रकरणाचा निषेध करीत आहे. जातीय सलोखा कायम ठेवत कायदेशीर मार्गाचा अवलंब करून हा विषय मिटविणे गरजेचे आहे. (Warakari angry over the politics of Hanuman Chalisa) तसे घडले नाही तर भविष्यात दोन समाजात तेढ निर्माण होईल. त्यामुळे वारकरी सेवा समिती स्वत: याची दखल घेत पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आघाडीवर राहील असे वारकरी सेवा समितीने सुनावले आहे.


भोंग्यावरून राजकरण 
मशिदीवरील भोंग्यावरून राजकीय वातावरण तापू लागले असून भाजपने राज ठाकरे यांच्या सुरात सूर मिसळला आहे पण भाजप सत्तेत होती तेंव्हा हे भोंगे का काढले नाहीत ? असा सवाल देखील उपस्थित होऊ लागला आहे.आंतरराष्ट्रीय विश्व हिंदू परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी तर 'आधी भाजपची सत्ता असलेल्या राज्यात मशिदीवरील भोंगे उतरवावेत असे म्हटले आहे.


   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !