BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२२ एप्रि, २०२२

पाणी देताना सर्पदंश, शेतकऱ्यात चिंता !

 


करमाळा : रात्रीच्या वेळेस पिकांना पाणी देताना पोथरे येथील एका शेतकऱ्याचा सर्पदंशाने (Snake Bite) मृत्यू होण्याची दुर्दैवी घटना घडली असल्याने शेतकरी वर्गातून चिंता व्यक्त होऊ लागली आहे.


शेतीसाठी रात्रीच्या वेळेलाच वीज मिळत असल्याने रात्री अपरात्री शेतात जाऊन पिकांना पाणी देण्याशिवाय शेतकऱ्यांकडे दुसरा पर्याय नसतो. शेतात रात्री पाणी देण्यासाठी गेल्यावर साप तसेच अन्य प्राण्यांचा धोका असतो म्हणून दिवसा वीज देण्यात यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी सतत करीत आहेत. रात्री शेतीला पाणी देताना आढळलेले साप आणि अन्य प्राणी अलगद आणून सरकारी कार्यालयात सोडावेत असे आवाहन देखील शेट्टी यांनी केले आणि काही शेतकऱ्यांनी प्रत्यक्षात साप आणून वीज कंपनीच्या कार्यालयात देखील सोडले. हा आंदोलनाचा भाग झाला तरी प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या जीविताला मोठा धोका असून करमाळा तालुक्यातील पोथरे येथील शेतकरी सुखदेव सखाराम झिंजाडे यांना प्राण गमवावा लागला आहे. 


छप्पन्न वर्षाचे झिंजाडे हे आपल्या शेतात रात्रीच्या वेळेस शेतीला पाणी  देत होते. मध्यरात्रीनंतर दोन वाजण्याच्या सुमारास त्यांना काहीतरी चावल्याची जाणीव झाली. रात्री असल्यामुळे नेमके काही दिसले नाही त्यामुळे ते घरी परतले. घरी येवून त्यांनी  काहीतरी चावले असल्याचे सांगत सर्पदंश झाला असण्याची शक्यता देखील व्यक्त केली. या घटनेने घरातील सगळेच घाबरून गेले आणि त्यांनी  तातडीने दुचाकीवरून करमाळा येथील खाजगी रुग्णालयात नेण्यात आले पण तोपर्यंत झिंजाडे यांचा मृत्यू झाला होता. या घटनेने करमाळा तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात आली परंतु अन्य शेतकरी देखील भयभीत झाले आहेत. 


रात्रीच्या वेळेलाच वीज मिळते त्यामुळे शेतीला पाणी देण्यासाठी रात्रीच शेतीत जावे लागते. शेतकऱ्यांच्या मनात आधीच भीती असते आणि आता एक शेतकऱ्याचा पाणी देताना सर्पदंश होऊन मृत्यू झाल्याने शेतकरी वर्ग धास्तावला आहे. जीवावर उदार होऊन रात्री शेतीत पाणी देण्यासाठी जावे लागत आहे पण या घटनेने शेतकरी आणि त्याचे कुटुंबीय देखील चिंता व्यक्त करू लागले आहेत. (Snake bites while watering the farm)  सदर घटनेमुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी भयभीत झाला असून अशा परिस्थिती देखील त्याला रात्री शिवारात जावे लागत आहे.   


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !