BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

४ मार्च, २०२२

एक आत्महत्या, पंढरपूर तालुक्यातील शेतकरी खवळला !



पंढरपूर : मगरवाडी येथील शेतकरी तरुणाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याने पंढरपूर तालुक्यातील शेतकरी अस्वस्थ झाला असून खर्डी भागात याची पुनरावृत्ती होण्याच्या आधी महावितरणने वीज पुरवठा पूर्ववत करावा अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत. 


महावितरणने थकित वीज बिलांसाठी वसुली मोहीम सुरु केली असून या मोहिमेत शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित केला जात असल्याने शेतकरी आधीच संतापलेल्या अवस्थेत आहेत. वीज पुरवठा खंडित केल्याने शेतातील उभी पिके जळून जाण्याचा मोठा धोका समोर दिसत आहे. अशाच परिस्थितीत पंढरपूर तालुक्यातील मगरवाडी येथील सुरज जाधव या तरुणाने 'शेतकरी जन्माला पुन्हा येणार नाही' असे म्हणत सरकारवर ठपका ठेवत विष प्रश्न करून आत्महत्या केली आहे. दोन दिवसांपूर्वी त्याने हे विष प्राशन केले आणि त्याचा व्हिडीओ देखील बनवला होता. आज त्याचा उपचार घेत असताना मृत्यू झाला आहे. या घटनेने पंढरपूर तालुका सुन्न झाला आहे. 


या घटनेचा संदर्भ देत पंढरपूर तालुक्यातील खर्डी परिसरातून शेतकरी महावितरणला आवाहन करीत आहेत. खर्डी, बोहाळी, उंबरगाव, तपकिरी शेटफळ या परिसरातील वीज महावितरणने खंडित केली आहे. शेतकऱ्यांना कुठलीही पूर्वसूचना न देता थ्री फेज पुरवठा बंद करण्यात आला आहे, द्राक्षे, डाळिंब, मका काढणीच्या अंतिम टप्प्यात असून द्राक्ष, डाळिंब यांना पाच ते सहा तास पाणी सोडावे लागत आहे आणि नेमक्या याच वेळी महावितरणने विद्युत पुरवठा खंडित करण्याचे काम सुरु केले आहे. खर्डी परिसरातील शेतकऱ्यांनी याबाबत संताप व्यक्त करीत महावितरणला आवाहन केले आहे. 


महावितरणने ही कारवाई करण्याआधी शेतकऱ्यांना आठ ते दहा दिवस आधी कल्पना देणे आवश्यक होते परंतु असे न करता वीज खंडित करण्याचे धाडस केले असल्याचे शेतकरी बांधवांचे म्हणणे आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत असून शेतकऱ्यांना काही दिवसांची मुदत देण्यात यावी आणि आज रात्री थ्री फेज पुरवठा पूर्ण दाबाने करण्यात यावा. शेतकरी उद्या सकाळी दहा वाजता महावितरण कार्यालयात समक्ष हजर होतील. महावितरण आणि शेतकरी यांच्या दरम्यान चर्चा होऊन जो काही निर्णय होईल तो मान्य असेल परंतु आज रात्री वीज मिळावी अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे. 


वीज खंडित केल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. आजच पंढरपूर तालुक्यातील एका तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे, अशाच प्रकारे काही विपरीत घडण्याआधी विद्युत पुरवठा पूर्ववत सुरळीत करण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. पंढरपूर तालुक्यातील आंबे येथील शेतकऱ्यांनी उठाव केल्यानंतर आता गावोगाव शेतकरी आक्रमक होऊ लागले आहेत. यातून शेतकरी आणि महावितरण यांच्यात संघर्ष निमाण होताना दिसत आहे. राज्य शासनाने याची दखल घेऊन काही तोडगा तातडीने काढण्याची गरज निर्माण झाली आहे.     


 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !