BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२१ मार्च, २०२२

पावसाच्या शक्यतेने वाढले बळीराजाचे टेन्शन !

 


मुंबई : शेतकरी एकेक संकट झेलत असताना हवामान विभाग देत असलेल्या पावसाच्या अंदाजाने बळीराजाचे टेन्शन पुन्हा वाढले (Farmers in tension due to rain forecast) असून ऐन उन्हाळ्यात पावसाचे अंदाज व्यक्त केले जात आहेत. 


गतवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असल्याने विविध धरणांची पाणी पातळी अद्यापही सुस्थितीत आहे, विहिरींना पुरेसे पाणी असून जमिनीतील पाणीपातळी देखील चांगली आहे त्यामुळे या उन्हाळ्यात पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याची टंचाई भासणार नाही. एकीकडे हे समाधान असताना दुसरीकडे नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी अडचणीत येत आहे. अवकाळी पाऊस, (Forecast of unseasonal rain) वादळ वारे, मधूनच होणारी गारपीठ यामुळे शेतकऱ्यांचे गणित सतत विस्कटून जात असतानाच उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच 'असानी' चक्रीवादळ येत आहे त्यामुळे हवामानात बराच बदल होत आहे आणि हवामान विभागाकडून पावसाचा अंदाज व्यक्त होत आहे. 


शिवारातील रब्बी पिके अंतिम टप्प्यात असून द्राक्षबागाही आता शेवटच्या टप्प्यात आलेल्या आहेत, अशात पाऊस अथवा गारपीठ झाली तर शेतकरी मोडून पडणार आहे.  बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला असून कमी दाबाचा पट्टा तयार झाला असल्यमुळे राज्यातील हवामान बदलून गेले आहे. राज्याच्या काही भागात पावसाळी वातावरण असून गेल्या तीन चार दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झालेले आहे. मुंबई सोबत कोकण परिसरात देखील हवामान ढगाळ असून काही ठिकाणी हलका पाउस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. 


तापमानात घट !

उन्हाळ्याचे दिवस सुरु होताच उन्हे तापू लागली होती, तपमानात मोठी वाढ होताना दिसत होती परंतु हवामान बदलल्यामुळे एकदम तापमानात काही प्रमाणात घट झाली आहे. अजूनही विदर्भ आणि मराठवाडा परिसरात उन्हाचा तडाखा कायम आहे परंतु पावसामुळे आगामी दोन दिवसात दोन ते तीन अंशांनी तपमान खाली येणार आहे. वाढलेल्या तापमानाने आणि उकाड्याने त्रस्त झालेल्यांना या वातावरणामुळे मात्र दिलासा मिळू शकतो. 'असानी' चक्रीवादळाचा इशारा असला तरी महाराष्ट्रावर याचा फारसा परिणाम होणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. ढगाळ हवामानामुळे उकाडा वाढलेला असून राज्याच्या काही भागात अजूनही तापमान वाढते आहे.     


बळीराजाला टेन्शन !

मुंबई, कोकणात ढगाळ हवामान तयार झालेले असून आजपासून पुढील दोन दिवस काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाउस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. यामुळे तापमानात घट पाहायला मिळणार असली तरी बळीराजाचे टेन्शन मात्र वाढत आहे. येऊ घातलेल्या या अवकाळी पावसामुळे हातात येऊ लागलेल्या पिकांना मोठा फटका बसण्याची भीती आहे. पावसाला संपल्यानंतर दोन ते तीन वेळा निसर्गाने दिलेल्या दणक्याने राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान या आधीच केले आहे. विविध पिके आता अंतिम टप्प्यात आलेली आहेत आणि अशा वेळी अवकाळी पावसाचा इशारा हा शेतकरी वर्गाला घाम फोडणारा ठरत आहे.  


दाब क्षेत्रात वाढ होणार !

आग्नेय बंगालच्या उपसागरावर आणि दक्षिण अंदमान सुमुद्राच्या लगत कमी दाबाचे क्षेत्र आहे, ते किमान दाबाच्या क्षेत्रात बदलले असून आगामी २४ तासात ते अधिक तीव्र किमान दाब क्षेत्रात वाढण्याची अधिक शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.  चक्रीवादळ बांगला आणि म्यानमार किनारपट्टीच्या दिशेने सरकण्याची शक्यता असल्यामुळे अंदमान, निकोबार बेटावर काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे, त्यानंतर हे चक्रीवादळ बांगला देशाच्या दिशने निघून जाईल. दरम्यान गडगडाट करीत काही ठिकाणी मुसळधार किंवा अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. दरम्यानच्या काळात ४५ ते ५५ किमी प्रतितास ते ६५ किमी प्रतितास असा वाऱ्याचा वेग राहू शकतो.  'असानी' चक्रीवादळाचा हा परिणाम असला तरी महाराष्ट्रात याचा फारसा परिणाम होणार नसल्याचेही सांगण्यात आले आहे.    


हे वाचा :

अधिक बातम्यांसाठी येथे क्लीक करा > शोध न्यूज


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !