BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

३० एप्रि, २०२२

पंढरपूर तालुक्यात बनावट दारू निर्मितीचा पर्दाफाश !

 


पंढरपूर : आरोग्याला घातक असलेली बनावट दारूचा पर्दाफाश झाला असून याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे तर या प्रकरणातील मुख्य संशयित असलेला एक जण पसार झाला आहे. या घटनेने मात्र मोठी खळबळ उडाली आहे.


गेल्या अनेक वर्षापासून बनावट दारूची चर्चा होत असते. कोरोना काळात शासनमान्य दारू विक्री बंद असल्यामुळे अशी बनावट नकली दारू अधिक चर्चेत आली होती. दारू दुकाने बंद असली तरी ज्यांना हवी त्यांना ती उपलब्ध होत होती. सरकारी दुकाने तर बंद असताना विविध कंपन्यांची दारू कुठून आणि कशी मिळते ? हा प्रश्न सर्वांनाच पडलेला होता. पाच ते सहा पट जादा दराने ती त्यावेळी उपलब्ध होत असल्याचे सांगितले जात होते आणि काही ठिकाणी पोलिसांनी हा प्रकार पकडून त्यांच्यावर कारवाई देखील केली आहे. पण आता पंढरपूर तालुक्यातच बनावट दारू तयार केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आजवर छुप्या पद्धतीने चालणारा हा प्रकार प्रकाशात आला असून यामुळे तळीरामात खळबळ उडाली आहे. 


बनावट दारू तयार केली जात असल्याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाला माहिती मिळताच त्यांनी वाखरी येथे छापा टाकला असता सगळाच नकली प्रकार उजेडात आला. उत्पादन शुल्क विभागाचे पथक वाखरी येथील गोसावी आणि गायकवाड वस्ती येथे दाखल झाले तेंव्हा त्यांना मिळालेली माहिती सत्य असल्याचे दिसले. बाटल्यासह टोपणे, नकली लेबल्स अशा प्रकारचे विविध साहित्य देखील आढळून आले. (Production of counterfeit liquor in Pandharpur taluka) बनावट दारू पॅकिंग करण्याचे साहित्य, स्पिरिट, गोवा बनावटीची दारू, वेगवेगळ्या कंपन्यांच्या नावांची लेबल्स, बाटल्यांची झाकणे, पॅकिंग करण्याची मशीन असे साहित्य पथकाला आढळून आले. 


दोघांना अटक 

बनावट दारू तयार करण्याचे साहित्य राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त करून विशाल बिभीषण गायकवाड आणि ऋषिकेश बिभीषण गायकवाड या दोघांना अटक करण्यात आली परंतु मुख्य संशयित अमोल फडतरे हा मात्र उत्पादन शुल्क (State Excise Department) अधिकाऱ्यांच्या हाती लागला नाही. 


नकली पण हुबेहूब !

गोव्यातून स्वस्त किमतीचे  मद्य आणून त्यात स्पिरिट तसेच अन्य घटक मिसळून बनावट दारू तयार केली जायची, या बाटल्यावर नामवंत विदेशी मद्य कंपनीचे लेबल्स चिकटवून तिची विक्री केली जायची. सगळे काही हूबेहूब केले जात असल्यामुळे ग्राहकांची सहज फसवणूक होत होती. नकली आणि मूळ कंपनी यांनी  यांच्यातील फरक लक्षात येणार नाही अशा पद्धतीने हा सगळं प्रकार सुरु होता पण राज्य उत्पादन शुल्क विभागाने हा प्रकार उजेडात आणला आहे.  


ढाब्यावर विक्री 

नकली बनावटीची ही दारू ढाब्यावर विकली जात असल्याची बाब समोर आल्याने ढाब्यावर जाऊन मद्यप्राशन करणाऱ्या शौकिनांत देखील खळबळ उडाली आहे. कोणकोणत्या ढाब्यावर अशी दारू विकली जात होती त्या ढाबा चालकावर देखील कारवाई करण्याची मागणी आता पुढे येऊ लागली आहे. ढाब्यावर विनापरवाना मद्यविक्री केली जाते यावर देखील शिक्कामोर्तब होणार असून अशा प्रकारचे विष ग्राहकांना विकून फसवणूक करणारे ढाबेचालक देखील या कारवाईमुळे उघडे पडण्याची शक्यता आहे.  


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !