BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

३० एप्रि, २०२२

आ. समाधान आवताडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी !


 


मंगळवेढा : आमदार समाधान आवताडे यांच्यावर कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहाराचा आरोप करून त्यांच्यासह कारखान्याच्या संचालक मंडळावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य अजित जगताप यांनी केली आहे.


मंगळवेढा तालुक्यातील श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्यातील जुने प्रकरण बाहेर काढत जगताप यांनी साखर आयुक्तांकडे ही मागणी केल्याने राजकीय वर्तुळात आणि सभासद शेतकऱ्यात देखील खळबळ उडाली आहे. श्री संत दामाजी साखर कारखान्याची निवडणूक समोर असतानाच हा विषय ऐरणीवर आणण्यात आला आहे. विद्यमान अध्यक्ष आणि संचालक मंडळाने ९० हजार ६७० क्विंटल साखर पोत्यांची परस्पर विक्री करून सुमारे २९ कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याबाबत विशेष लेखापरीक्षक वर्ग - १ यांनी चौकशी केली होती. सदर चौकशी अहवालात साखर गोदामात तफावत आढळल्याने कारखाना चेअरमन आमदार समाधान आवताडे आणि संचालक मंडळ यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, ऊस नियंत्रण आदेश १९६६ मधील तरतुदीप्रमाणे केलेल्या अपहाराची रक्कम वसूल करून कारवाई करावी अशी मागणी जगताप यांनी केली आहे. 


जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य अजित जगताप यांनी साखर आयुक्त यांच्याकडे लेखी तक्रार केली असून ही मागणी करण्यात आली आहे. संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आणि संचालक मंडळ यांनी गेल्या सहा वर्षात मनमानी कारभार करून गैरव्यवहार केले आहेत त्यामुळे सभासदांचे आणि कामगारांचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत काही सभासदांनी साखर संचालक यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानुसार जी. व्ही. निकाळजे, विशेष लेखा परीक्षक वर्ग - १  यांनी समक्ष कारखाना गोडाऊनची तपासणी केली. या तपासणीत त्यांनी आपल्या अहवालात चेअरमन आणि संचालक मंडळ यांच्यावर ठपका ठेवलेला असून ९० हजार ६७० क्विंटल साखरेची तफावत आढळून आली. एमएससी बँकेची परवानगी न घेता साखरेची विक्री केल्याचे देखील म्हटले आहे. 


नफा तोटा पत्रक आणि शासकीय ताळेबंद पत्रक संशयास्पद असून तत्कालीन नियमाप्रमाणे एफआरपी देखील देण्यात आली नाही आणि कर्मचारी  प्रॉव्हिडंट फंडाची रक्कम एमएससी बँकेत जमा कार्नाय्त आलेली नाही शिवाय काही कर्मचाऱ्यांची भविष्य निर्वाह निधी, ग्रॅच्युइटी आणि अंतिम रक्कम देण्यात आलेली नाही साखर संचालकांची पूर्व परवानगी न घेता २०१८ ते २०२१ या काळात भंगारविक्री करून त्या रकमेचा हिशोब देखील ठेवला नसल्याचा ठपका चौकशी अहवालात ठेवण्यात आला आहे. मनमानी कारभार करून पैशाची उधळपट्टी करण्यात आली असून यामुळे २०० कोटींचे कर्ज करण्यात आले आहे. (Demand to file a case against MLA Samadhan Avtade) चौकशी अहवाल आलेला असताना त्यावर कसलीच कार्यवाही अथवा कारवाई झाली नाही. 


सदरचे जुने प्रकरण उकरून काढत जगताप यांनी निवडणुकीच्या तोंडावर मोठी मागणी साखर आयुक्त यांच्याकडे केली आहे. चेअरमन आणि संचालक मंडळ यांनी बेकायदेशी काम करून सभासद, कर्मचारी यांची फसवणूक केली आहे, त्यामुळे त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा आणि रक्कम वसूल करून सभासंदाना न्याय द्यावा अशी मागणी जगताप यांनी साखर आयुक्त यांच्याकडे लेखी स्वरूपात केली आहे. 


मुख्यमंत्र्यांकडेही तक्रार !

साखर आयुक्त पुणे यांच्याकडे जगताप यांनी तक्रार केली आहेच परंतु राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री सचिव, जिल्हाधिकारी यांच्याकडेही ही तक्रार करण्यात आली आहे. या तक्रारींवर शासन प्रशासन काय निर्णय घेतेय याकडे सभासदांचे लक्ष लागले आहे. 


निवडणुकीच्या तोंडावर --

कोरोनामुळे कारखान्याची निवडणूक लांबणीवर पडली होती आणि आता साखर कारखाना निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली असतानाच हा मोठा विषय जगताप यांनी पुढे केला आहे. त्यामुळे कारखाना निवडणुकीत हा प्रमुख मुद्दा ठरण्याची शक्यता असून हे प्रकरण वादळ निर्माण करण्याची शक्यता दिसत आहे.


हे देखील वाचा !> खालील बातमीला टच करा 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !