शिरुरू : पाच हजाराच्या लाचेसाठी पोलीस उपनिरीक्षक आणि पोलीस हवालदार गोत्यात आले असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्याने पुणे पोलीस दलात (Bribe Case) खळबळ उडाली आहे.
भल्या मोठ्या पगाराची नोकरी असली तरी शासकीय सेवक चिरीमिरीसाठी धावाधाव करून आपला स्वाभिमान देखील विकतात आणि फुकटच्या पैशाच्या हव्यासापोटी संकट ओढवून घेतात. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत रोज कुठे ना कुठे अधिकारी कर्माचारी अडकतात तरी देखील लाचेचा मोह लोकसेवकाला सुटत नाही. पोलीस आणि महसूल विभागाचे अनेक बडे अधिकारी तर लाच घेताना सापडले आहेतच पण साहेबासह शिपाई देखील लाच मागताना अडकलेले आहेत. पोलीस उपनिरीक्षक आणि पोलीस हवालदार केवळ पाच हजाराच्या लाचेपोटी गोत्यात आले असून त्यांच्याविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यात जामीन मिळवून देतो असे सांगून आरोपीकडे दहा हजाराची लाच मागण्यात आली आणि यात तडजोड होऊन अखेर पाच हजार रुपयांची लाच निश्चित करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक सुरेश कुंडलिक गीते आणि पोलीस हवालदार संतोष रामदास साठे यांनी ही लाच मागितली असल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली. या विभागाने केलेल्या पडताळणीत या दोघांनी लाच मागितली असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक सुरेश गीते आणि हवालदार साठे या दोघांच्या विरोधात शिरूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केवळ पाच हजाराच्या लाचेपोटी एक अधिकारी आणि एक कर्मचारी गोत्यात आले आहेत. (Case file against police sub-inspector in bribery case) गुन्हा दाखल होताच पुणे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे आणि हा जिल्हाभर चर्चेचा विषय बनला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !