BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२६ एप्रि, २०२२

शेतकऱ्यावर तलवारीने प्राणघातक हल्ला, पाच जणांविरुद्ध गुन्हा !

 



मंगळवेढा : शेतातील रस्त्याच्या वादातून शेतकऱ्यावर तलवार आणि कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला केल्याची घटना मंगळवेढा तालुक्यात घडली असून या घटनेने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.


शहरी भागातून गुन्हेगारी पाहायला मिळते आणि तलवारीचे हल्ले देखील घडतात पण आता तलवारीसारखे शस्त्र ग्रामीण भागात आणि शेतकऱ्याच्या देखील हातात आल्याचे दिसत असून थेट तलवार आणि कुऱ्हाडीने शेतकरी बांधवावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना मंगळवेढा तालुक्यातील महमदाबाद येथील शेतशिवारात घडल्याचा मोठा गुन्हा मंगळवेढा पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. शेतकऱ्यांत शेताच्या रस्त्यारून पूर्वी वाद झालेला होता आणि या वादातून झालेल्या भांडणाचा राग मनात धरून पाच जणांनी मिळून दोघांवर जीवघेणा हल्ला केला असल्याप्रकरणी पोलिसात फिर्याद देण्यात आली आहे. 


सांगोला तालुक्यातील सावे येथील तुकाराम लवटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते मावसभाऊ असलेल्या समाधान माने यांच्या महमदाबाद (शेटफळ) येथील शेतात बसलेले होते. त्यांच्यासोबत पांडुरंग मेटकरी आणि आप्पासाहेब मासाळ हे देखील होते. यावेळी पाच जण तेथे हातात तलवार आणि कुऱ्हाड अशी शस्त्रे घेवून आले आणि 'इथे का बसला आहात?' असे विचारात शिवीगाळ करीत थेट जीवे मारण्याची धमकी देऊ लागले. अचानक घडलेल्या या प्रसंगाने शेतात बसलेले सगळेच गोंधळून गेले होते. तोपर्यंत तर महमदाबाद येथील अभिजित जकाप्पा माने याने 'आता तुला जिवंतच ठेवत नाही' असे म्हणत समाधान माने यांच्या डोक्यावर तलवारीने हल्ला केला.


अचानकपणे हा सगळा प्रकार सुरु झाला होता आणि थेट तलवारीनेच हल्ला करण्यात आला होता. समाधान याच्या डोक्यात वार होताच तुकाराम लवटे हे पुढे धावले आणि सोडवासोडावीचा प्रयत्न करू लागले पण यावेळी सोबत असलेल्या पंढरपूर तालुक्यातील तपकिरी शेटफळ येथील मोहन बीर चोरमले याने उलट्या कुऱ्हाडीने तुकाराम यास देखील मारले. त्यामुळे तुकाराम लवटे देखील जखमी झाले. इतर तिघांनीही लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. (Deadly attack on a farmer) या घटनेत समाधान आणि तुकाराम हे दोघेही जखमी झाले असून समाधान माने यांना उपचारासाठी सोलापूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. 


 पाच जणांवर गुन्हा !

पोलिसांनी या घटनेप्रकरणी पाच जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मंगळवेढा तालुक्यातील महमदाबाद येथील अभिजित जकाप्पा माने, तात्यासाहेब जकाप्पा माने, जकाप्पा लक्ष्मण माने यांच्यासह पंढरपूर तालुक्यातील तपकिरी शेटफळ येथील मोहन बीरा चोरमले आणि सोमा बीरा चोरमले यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. मोहन चोरमले याच्या शोधात पोलीस आहेत.      


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !