BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२४ एप्रि, २०२२

अवकाळीचा धिंगाणा, शेतकऱ्यांची वाढली चिंता !

 


सोलापूर : सोलापूर जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात अवकाळी पावसाने भलताच धिंगाणा घातला असून आंबा आणी द्राक्ष बागांचे मोठे नुकसान होऊ लागल्याने शेतकरी अधिकच चिंताग्रस्त झाला आहे. 


भर उन्हाळ्यात आणि कडाक्याची उष्णता असताना अवकाळी पाऊस हजेरी लावू लागला आहे. आणखीही पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहेच पण कालपासून अनेक जिल्ह्यात अवकाळीने हजेरी लावली असून हा पाऊस शेतकऱ्यांचे नुकसान करताना दिसत आहे. गेल्या दोन दिवसांपासून सोलापूर, सातारा, सांगली जिल्ह्यात आणि कोकणात देखील पावसाने धिंगाणा घातला आहे. आंबा आणि द्राक्ष उत्पादकांच्या काळजाचा ठोका वाढू लागला आहे. (Farmers worried over unseasonal rains)  सोलापूरचे तापमान गेल्या दोन दिवसांपासून वाढलेले होते आणि संपूर्ण जिल्हा उष्णतेने हैराण झालेला होता, काल रात्रीपासून मात्र वातावरणात बदल होऊन पावसाळी वातावरण तयार झाले आणि  मध्यरात्रीपासूनच सोलापूर जिल्ह्यातील अनेक तालुक्याना पावसाने झोडपून काढले आहे. 


सांगलीत फटका !

सांगली जिल्ह्यात देखील असाच नुकसान करणारा पाऊस झाला असून मध्यरात्रीच पावसाने धिंगाणा घातला. विजांच्या प्रचंड कडकडाटासह पावसाने हजेरी लावली आणि जोरदार वाऱ्याने झाडे देखील उन्मळून पडली आहेत. वादळी वाऱ्यामुळे कित्येक दुकानावरील फलक उडून गेले आणि झाडे रस्त्यावर पडल्याने वाहतूक देखील खोळंबली होती.  


पंढरपूर तालुक्यात पाऊस 

भल्या पहाटेपासून पंढरपूर शहरात आणि तालुक्यात पावसाच्या सरी कोसळू लागल्या. पंढरपूर तालुक्यातील काही भागात या सरी वेगवान होत्या. पंढरपूर तालुक्यात द्राक्ष उत्पादन अधिक प्रमाणात असून या बागा आता अंतिम टप्प्यात आल्या आहेत. काही द्राक्ष बागा आता रिकाम्या होत असून अजून काही बागातील द्राक्ष विकली जाण्याच्या प्रतीक्षेत असतानाच पाऊस होत असल्याने होणारे नुकसान शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर दिसू लागले आहे.


दरात देखील घट !

द्राक्ष बागांना भेटी देवून व्यापारी जो दर ठरवत होते त्यात आता मोठी घट झाली आहे. कमी दरात द्राक्ष देण्यास शेतकरी राजी नव्हते पण पावसाच्या या संकटामुळे मिळेल त्या दरात द्राक्ष द्यायला तयार होऊ लागले आहेत. नैसर्गिक परिस्थिती पाहून व्यापारी देखील अत्यंत कमी किमतीत द्राक्षांची मागणी करू लागले असून मिळेल त्या दरात द्राक्ष देण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. 


आंब्याचेही नुकसान 

वाढती उष्णता आणि त्यातच अवकाळी आणि गारपीठ यामुळे आंब्याचे नुकसान होत आहे. वादळी वारा देखील आंबा उत्पादकांच्या मुळावर आला असून रत्नागिरी, चिपळूण, देवरुख, संगमेश्वर, लांजा भागातील शेतकरी प्रचंड चिंतेत आले आहेत. त्यातच आज आणि पुढील तीन दिवस पावसासह गारपीठ होण्याची शक्यता असल्याने अधिक चिंता निर्माण होऊ लागली आहे.  

  




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !