BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२२ मार्च, २०२२

पंढरपूर तालूक्यात गरीब विक्रेत्यालाही लुटले !



पंढरपूर : पंढरपूर शहर आणि तालुक्यात चोरीचे प्रमाण वाढत असतानाच एका गरीब फिरत्या विक्रेत्यालाही ( Poor seller) लुटण्याचा लाजीरवाणा प्रकार समोर आला असून या घटनेने हळहळ देखील व्यक्त होऊ लागली आहे. 



मागील काही काळापासून पंढरपूर शहर आणि तालुक्यात मोठ्या चोऱ्या, घरफोड्या होत आहेत, लाखोंचे दागिने चोरून नेले जात आहेत तर भर रस्त्यावर भूलथापा देवून लुटले जात आहे. या घटनामुळे नागरिकांच्या मनात चोरट्यांच्या बाबतीत एक अनामिक दहशत निर्माण झालेलीच आहे. चोरीच्या घटना घडल्यानंतर पोलीस परिश्रमाने चोरट्यांचा शोध घेत आहेत आणि चोरीचा माल देखील हस्तगत करीत आहेत. पोलिसांच्या कामाने एकीकडे दिलासा मिळत असताना दुसरीकडे मात्र चोरीच्या घटना थांबताना दिसत नाहीत. 


मोठ्या घरफोड्या होत आहेतच पण चोरांची पातळी किती खालच्या स्तराला गेली आहे याचे एक उदाहरण काल समोर आले आहे. पंढरपूर तालुक्यातील करकंब बस स्थानकावर एका गरीब फिरत्या विक्रेत्यास लुटण्याचा प्रकार समोर आला आहे. (Theft of a traveling vendor at Karkamb)  सोमवारी करकंब येथे साप्ताहिक बाजार भरतो, यामुळे पंढरपूर येथे आंबेडकर नगरमध्ये राहणारा  फिरता विक्रेता शाहरुख इर्शाद खान हा करकंब येथे व्यवसायासाठी गेला होता. करकंब परिसरातील अनेक गावातील लोक करकंब बाजारात येतात त्यामुळे चार पैसे फायदा होईल या आशेने शाहरुख कपडे घेवून या बाजारात विक्री करण्यासाठी गेला होता. 



करकंब बस स्थानकाच्या परिसरात शाहरुख हा आपल्या जवळचे कपडे विक्री करण्याकरिता थांबलेला होता. यावेळी एका तीस पस्तीस वर्षे वयाच्या तरुणाने शाहरुखच्या खांद्यावर जोरदार फटका मारला. शाहरुखला काही कळायच्या आत त्या अज्ञात तरुणाने त्याच्याजवळचे चार शर्टपीस जबरदस्तीने हिसकावून घेतले. हा प्रकार पाहणाऱ्या जवळच्याच एका वृद्धाने या तरुण भामट्यास हटकले. गरिबाचे कपडे कशाला हिसकावून घेवून जातो ? असा सवाल देखील त्याला या वृद्धाने केला. आजूबाजूला लोक असतानाही या गरीब विक्रेत्याकडून कपडे हिसकावून नेण्यात आले पण त्याला रोखण्यास कुणीही पुढे आले नाही. 


गावोगाव फिरून प्रामाणिकपणे व्यवसाय करून पोट भरणाऱ्या गरीब विक्रेता चार पैशाच्या कमाईच्या आशेने करकंब येथील बाजारात आला होता पण तेथेही त्याचीच लुट करण्याचा निंद्य प्रकार झालाच आणि गजबज असलेल्या परिसरात ही घटना घडूनही त्याच्या मदतीला कुणीही धावले नाही याचेही आश्चर्य व्यक्त होत आहे.  या विक्रेत्याचा एक हजार चारशे रुपयांचा माल नेण्यात आला असला तरी ही रक्कम त्याच्यासाठी मोठीच आहे त्यामुळे त्याने करकंब पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (The poor seller was robbed during the day) सुमारे तीन महिन्यापूर्वी देखील करकंब बस स्थानकात एका प्रवाशाला लुटण्यात आले होते.  

हे देखील वाचा :>> 




   




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !