BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

४ मार्च, २०२२

महावितरण उपकेंद्राला शेतकऱ्यांनी ठोकले टाळे !

 



बार्शी : वीज पुरवठा खंडित करण्याच्या प्रकारामुळे संतापलेल्या तेरा गावाच्या शेतकऱ्यांनी एकत्र येत महावितरणच्या उपकेंद्रास टाळे ठोकले असून महावितरण विरोधात वाढत चाललेल्या संतापाचे हे प्रतिबिंब पाहायला मिळू लागले आहे. 


कोरोनाच्या कालावधीपासून मोठ्या प्रमाणत वीज बिले थकली आहेत आणि त्यामुळे महावितरण देखील आर्थिक अडचणीत आले आहे. सोलापूर जिल्ह्यातील ग्राहकांकडे कोट्यावधी रुपयांची बिले थकली आहेत त्यामुळे वसुली मोहिमेचा धडाकाच महावितरणने लावला आहे. विजेची बिले भरा अन्यथा वीज पुरवठा कापला जाईल असा इशारा उर्जामंत्री नितीन राऊत यांनी नुकताच दिला आहे. कोट्यावधी रुपयांची वसुली करण्याचा दबाव महावितरण अधिकारी कर्मचारी यांच्यावर आहे. या वसुलीसाठी ग्राहकांचे वीज कनेक्शन कापले जात आहे पण यामुळे शेतकरी अधिकच अडचणीत येताना दिसत आहे. संतापलेल्या शेतकऱ्याचे उग्र पडसाद आता समोर येऊ लागले आहेत. 


बार्शी तालुक्यातील चिखर्डे येथील महावितरण उपकेंद्राला टाळे ठोकून शेतकरी बांधवांनी आपला संताप दाखवून दिला आहे. कुठलीही पूर्वसूचना न देता महावितरणने १३ गावातील शेतकऱ्यांची वीज कापली. उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले आहेत आणि पिकांना पाणी देण्यासाठी विजेची देखील गरज वाढली आहे. अशा परिस्थितीत महावितरणने वीज बिलासाठी कनेक्शन कापल्याने पिकेच धोक्यात आली आहे. द्राक्ष बागाईतदार, कांदा उत्पादक यांची मोठी अडचण महावितरणच्या मोहिमेमुळे झाली आहे. त्यामुळे संतप्त झाल्येल्या १३ गावाच्या शेतकऱ्यांनी एकत्र येत चिखर्डे उपकेंद्रालाच टाळे ठोकण्याची घटना घडली आहे. 


पंढरपूर तालुक्यातील आंबे गावातल्या शेतकरी बंधूनी थेट महावितरणला आव्हान देत गावातील रोहित्रे, विजेचे खांब, तारा असे सगळे काही काढून नेण्याबाबत ठराव केला आहे . अन्यथा होणाऱ्या नुकसानीची जबाबदारी महावितरणची असेल असे ठणकावले आहे. आंबे ग्रामपंचायतीचा हा ठराव अनके गावांना जागा करणारा असल्याने याचे लोण पसरणार याचा अंदाज कालच 'शोध न्यूज' ने व्यक्त केला होता. आज बार्शी तालुक्यातील तेरा गावाचे शेतकरी एकत्र आले आणि त्यांनी उपकेंद्राला टाळे ठोकले. शेतकरी बांधवांचा हा आक्रोश आगामी काळात सगळीकडे दिसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.  


'शोध न्यूज' ने दिलेले वृत्त 

पंढरपूर : आम्हाला तुमची वीज नको, महावितरणने त्यांचे गावातील विजेचे खांब, तारा, डीपी असे सगले काही काढून घ्यावे अन्यथा होणाऱ्या नुकसानीला जबाबदार रहा असा सणसणीत इशाराच आंबे ग्रामपंचायतीने दिला आहे. 


महावितरणने थकीत बिलांच्या वसुलीची मोठी मोहीम सुरु केली आहे तर शेतकरी मात्र यामुळे अधिक अडचणीत येताना दिसत आहे. एकीकडे शेतकरी शेतीसाठी दिवसा दहा तास वीज मागत आहे तर दुसरीकडे महावितरण थकीत बिलासाठी पुरवठाच खंडित करीत आहे. मार्च महिन्यात तर ही वसुली मोहीम अधिक प्रभावी करण्याचे नियोजन महावितरणने केले आहे. बिल न भरलेल्या ग्राहकांचे वीज कनेक्शन थेट कापले जात आहे त्यामुळे तर शेतकरी प्रचंड अस्वस्थ होत आहे. गावोगावी शेतकरी आणि महावितरण असा संघर्ष अनुभवायला मिळत असताना पंढरपूर तालुक्यातील आंबे येथील ग्रामपंचायतीने एक ऐतिहासिक ठराव केला आहे.  


महावितरणकडून शेतकऱ्यांचा वीज पुरवठा बेकादेशीररित्या तोडला आहे असा आरोप करण्यात येत आहे. वीज पुरवठा तोडल्याने शेतकरी बांधवाचे प्रचंड नुकसान होत आहे त्यामुळे ग्रामस्थ आणि शेतकरी संतापलेले आहेत.  याच संतापातून एक ठराव करण्यात आला असून हा एक ऐतिहासिक ठराव मानला जात आहे. गावातील सगळे खांब, डीपी, विजेच्या तर, कंडक्टर असे सगळेच महावितरणने काढून न्यावे, अन्यथा होणाऱ्या नुकसानीस महावितरण कंपनीच जबाबदार असेल असा ठराव सर्वानुमते करण्यात आला आहे. असा ठराव करणारी ही पहिलीच ग्रामपंचायत असून यामुळे महावितरण पेचात येणार आहे. 


आंबे गावातून विजेची किती वसुली करण्यात आली याची आकडेवारी जाहीर करावी आणि बिलाच्या वसुलीतून ३० टक्के रक्कम ग्रामपंचायतीला दिली जाणार होती, ही रक्कम का दिली नाही ? असा सवाल देखील उपस्थित करण्यात आला आहे. गावकऱ्यानी महावितरणला चांगलेच कोंडीत पकडले असून विद्युत उपकेंद्रातून वीज खंडित करण्याचा आदेश देणाऱ्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही करण्यात आली आहे. 


अशाच प्रकारे गावागावातून ठराव झाले आणि शेतकरी आक्रमक झाले तर महावितरणचे अवघड होण्याची शक्यता आहे. गावागावात महावितरणच्या विरोधात संतापजनक भावना आहे. थकीत बिलामुळे एकीकडे महावितरण अडचणीत असताना गावोगावच्या शेतकरी बांधवांनी आंबे गावाचा कित्ता गिरवला तर हे लोण राज्यभर पसरेल आणि मग महावितरण वेगळ्याच पेचात अडकेल याचे संकेत आता मिळू लागले आहेत.   

 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !