BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१० मार्च, २०२२

पराभव असह्य झाल्यामुळे नेत्याने लावली स्वत:लाच आग !


उत्तर प्रदेश : कुठलाही पराभव माणसांच्या जिव्हारी लागतो पण उत्तर प्रदेशातील एका नेत्याला पक्षाचा पराभव एवढा जिव्हारी लागला की त्याने स्वत:लाच आग लावली. या घटनेने प्रचंड खळबळ उडाली. 


लढाई म्हटलं की  कुणीतरी जिंकणार आणि कुणीतरी हरणार हे निश्चित असते. निवडणूक ही देखील लोकशाहीतील एक लढाईच असते. या लढाईत एक निवडून येत असतो तर बाकीचे पराभूत होत असतात. विजयापेक्षा पराजय पचविण्यासाठी जास्त ताकद लागते असे नेहमी म्हटले जाते पण उत्तर प्रदेशमधील समाजवादी पक्षाच्या एका नेत्याला निवडणुकीतील पराभव पचवणे कठीण गेले आणि त्याने आपल्या हाताने स्वत:ला आग लावून जाळून घेण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आणि एकच खळबळ उडाली.  स्वत:च्या आयुष्यापेक्षाही या नेत्याला निवडणूक महत्वाची वाटली होती हेच यातून समोर आले. 


उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला यश आले तर प्रतिस्पर्धी असलेल्या समाजवादी पक्षास सत्तेत जाता आले नाही. भाजपचा पराभव होऊन उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी सरकार स्थापन करेल असा अनेकांचा होरा होता परंतु प्रत्यक्षात असे काही झाले नाही याचा अनेकांना धक्का बसला आहे.  कानपूर मतदारसंघातून समाजवादी पक्षाचे जेष्ठ नेते नरेंद्रसिंह उर्फ पिंटू हे देखील पराभूत झाले. हा पराभव जिव्हारी लागलेल्या या उमेदवाराने विधानभवनासमोरच आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. समाजवादी पक्षाचे कानपूर येथील वरिष्ठ उपाध्यक्ष असलेले नरेंद्रसिंह यांनी हा प्रकार केला आणि यात ते गंभीररित्या भाजले गेले आहेत.  


वरिष्ठ उपाध्यक्ष आणि पराभूत उमेदवार नरेंद्र सिंह हे विधान भवन येथे पोहोचले, यावेळी उत्तर प्रदेशात सगळीकडे भाजपचा जल्लोष सुरु होता. विधान भवनाच्या समोर ते पोहोचले आणि त्यांनी आपल्या अंगावर तेल ओतले. त्यानंतर त्यांनी आपल्या हाताने स्वत:ला आग लावली. हे घडत असताना एका पोलीस कर्मचाऱ्याची नजर त्यांच्याकडे गेली पण तोपर्यंत त्यांनी पेटवून घेतले होते. पोलिसांनी आग विझवत त्यांना तातडीने सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल केले. 'भाजपने पुन्हा सरकार स्थापन केले यांचे मला दु:ख झाले आहे' असे ते ओरडत होते. या आगीत ते चाळीस टक्के भाजले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.  


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !