BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

३ मार्च, २०२२

राज्यपालांनी छत्रपतींचे नाव उच्चारताच गोंधळ ! 'हटाव' चा जोरदार नारा !

 



मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्यामुळे महाराष्ट्र संतापलेला असतानाच आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपल्या भाषणात शिवछत्रपतींचे नाव घेताच गदारोळ उडाला. 


राज्य विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरु झाले असून सुरुवातीला राज्यपालांचे अभिभाषण होत असते. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आले आणि त्यांचे भाषण सुरु झाले यावेळी बोलताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा उल्लेख करताच एकच हंगामा सुरु झाला आणि राज्यपालांना आपले भाषण अर्ध्यावर सोडावे लागले. राज्यपाल भाषण अर्धवट सोडून गेल्याची आणि राष्ट्रगीत होण्याआधीच निघून झाण्याची ही पहिलीच घटना घडली आहे. राज्यपालांनी शिवछत्रपतींचा उल्लेख होताच सत्ताधारी गटाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने जोरदार घोषणा देणे सुरु केले. त्यावेळी विरोधी पक्षाने देखील नवाब मलिक यांच्या नावाने हाय  हाय करीत प्रत्युत्तर दिले.  


छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचा अपमान केला असल्याचे सांगून राज्यपालांच्या विरोधात महाविकास आघाडी जोरदार आक्रमक झाली असून पायऱ्यावर देखील राज्यपालांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. 'राज्यपाल हटाव, महाराष्ट्र बचाव' अशा घोषणाही देण्यात आल्या. महाराष्ट्र विधानसभेत अशी घटना यापूर्वी कधीही घडली नव्हती.   राज्यपालांनी भाषण सोडून आणि राष्ट्रगीत न होताच निघून जाणे हे पहिल्यांदाच घडले आहे. राज्यपालांनी केलेल्या विधानावर राज्यात पडसाद उमटत आहेत आणि राज्यपाल हटावची मागणी केली जात आहे पण आता विधानसभेत देखील जोरदार पडसाद उमटलेले आहेत. 


छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात अवमानकारक विधाने केल्याबाबत राज्यपालांना माफी मागावीच लागेल याबाबत कायदेशीर प्रस्ताव आणला जाणार आहे अशी माहिती काँग्रेस नेते नाना पटोले यांनी दिली आहे. राज्यात छत्रपती शिवाजी महाराज आणि फुले दाम्पत्य यांच्याबाबत केलेली विधाने राज्यपालांना शोभणारी नाहीत, त्याबाबत भारतीय जनता पक्षाने आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.   



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !