BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

३ मार्च, २०२२

पोलिसांना लाच देणारच अडकला जाळ्यात !

 



खेड : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील पोलीस अधिकाऱ्यास लाच देवू पाहणारा लाकूड व्यापारीच लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला आणि थेट तुरुंगात जाऊन बसला.


लाच देणे आणि घेणे हे दोन्हीही कायद्याने गुन्हा ठरतो परंतु तरीही अनेक सरकारी अधिकारी लाच घेताना रंगेहात पकडले जातात. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात नेहमीच पोलीस, महसूल अशा विविध सरकारी विभागातील अधिकारी आणि कर्मचारी अडकताना दिसतात. त्यांना मदत करणारे खाजगी व्यक्तीही तुरुंगात जाऊन बसतात. लाच देणारा मात्र क्वचितच या जाळ्यात अडकत असतो. खेड येथे मात्र पोलीस अधिकाऱ्यास लाच देण्याचा प्रयत्न करणारा लाकडाचा व्यापारी 'लाचलुचपत' च्या सापळ्यात अडकल्याची दुर्मिळ घटना समोर आली आहे.  


रत्नागिरी जिल्ह्यातील गोवळकोट येथील लाकडाचा व्यापारी निजाम हुसेन पटाईत याला पोलीस अधिकाऱ्याला लाच देण्याच्या प्रयत्नात अटक करण्यात आली आहे. खेड पोलीस ठाण्याच्या अंतर्गत लोटे दूरक्षेत्रात सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय बाळू कदम यांना लाच देण्याचा प्रयत्न त्याने केला होता. लाकडाचा ट्रक आरटीओ कडून पकडण्यात आला होता आणि तो लोटे पोलीस दूरक्षेत्र येथे ठेवलेला होता. या व्यापाऱ्याने नियमानुसार झालेला दंड देखील भरला होता. ट्रकमधील लाकडाबाबत वन विभागाकडे प्रस्ताव न पाठवता लाकूड साठ्यासह आपला ट्रक सोडून दिला जावा यासाठी या व्यापाऱ्याने पोलिसांना पाच हजार रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न केला. याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कदम यांनी रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. ठरल्याप्रमाणे लाकूड व्यापारी तीन हजार रुपयांची लाच देवू लागताच त्याला रंगेहात पकडण्यात आले. नेहमी अशा सापळ्यात लाच घेणारा अडकत असतो पण येथे मात्र लाच देणारा अडकला असल्याने जिल्हाभर या घटनेची चर्चा सुरु आहे.   


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !