BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१५ मार्च, २०२२

विहीर चोरी गेल्याची शेतकऱ्याची तक्रार !


उस्मानाबाद : आपल्या शिवारातील विहीर गायब झाली असल्याची तक्रार करीत विहीर शोधून देण्याची मागणी एका शेतकऱ्याने कळंब तहसीलदार यांच्याकडे केली आहे. 


विहीर चोरीला गेली म्हटलं की, 'जाऊ तेथे खाऊ' हा चित्रपट प्रत्येकाच्या डोळ्यापुढे येतो. विहिरीची चोरी झाल्याची तक्रार नायक करतो आणि त्याद्वारे प्रशासनातील भ्रष्ट्राचार समोर आणला जातो. विहिरीसारखी बाब चोरीला जाणे हे चित्रपटात ठीक आहे पण प्रत्यक्षात अशी घटना घडत नाही असेच सगळ्यांचे मत असणार हे उघड आहे पण प्रत्यक्षात अशा प्रकारची तक्रार करून उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील माळकरंजा गावच्या एका शेतकऱ्याने केली आहे. Farmer's complaint that well was stolen ) यामुळे प्रशासनात देखील खळबळ उडाली आहे. 


अशी झाली गायब !

माळकरंजा येथील शेतकरी महादेव डोलारे यांनी कळंब तहसीलदार यांच्याकडे आपली विहीर गायब झाली असल्याची तक्रार दिली असून ही विहीर शोधून देण्याची मागणीही केली आहे. डोलारे यांना वडिलोपार्जित जमिनीचा दोन एकराचा हिस्सा वाटून मिळाला आहे. एकूण आठ एकर जमिनीची वाटणी झाल्यानंतर त्यांच्या वाट्याला दोन एकर जमीन आली आहे. या वडिलोपार्जित आठ एकर जमिनीत दोन विहिरी होत्या असा दावा डोलारे यांनी केला आहे. यातील एक विहीर महादेव डोलारे यांच्या वाटणीत तर दुसरी भावाच्या वाटणीत गेली, काही काळानंतर भावकीतील लोकांनी एक विहीर बुजवली आणि कागदपत्रात बदल करून संपूर्ण विहीर गायब केली. अशी डोलारे यांची तक्रार आहे.  


विहीर पाहिजेच !

महादेव डोलारे हे विहीर शोधून देण्यासाठी प्रशासनाच्या पायऱ्या झिजवत असून प्रशासनही कोंडीत सापडले असल्याचे दिसत आहे. आपली विहीर शोधून द्यावी किंवा बुजवलेली विहीर उकरून द्यावी या मागणीवर शेतकरी महादेव डोलारे ठाम आहेत. त्यासाठी कितीही पर्यंत करण्याची त्यांची तयारी असून त्यांनी असलेल्या विहिरीचा देखील त्याग केला आहे. 


दुसरी विहीर बंदच !

भाऊबंदकीच्या वादात शेतकरी अनेकदा आपले नुकसान करून घेतो हे अनेकदा पाहायला मिळते. या घटनेत देखील असेच काहीसे झाले आहे. महादेव डोलारे यांच्या शेतात सद्या असलेली विहीर विनावापर पडून आहे. विहिरीत पाणी असूनही त्या पाण्याचा वापर केला जात नाही आणि जमीन कोरडवाहू ठेवण्यात आली आहे. विहिरीवरील पंप आणि अन्य साहित्य गंजून चालले आहे पण वापर केला जात नाही. बुजवलेली विहीर उकरून देत नाही किंवा निकाल लागत नाही तोपर्यंत दोघांनीही विहिरीचे पाणी घ्यायचे नाही असा कराराच या भाऊबंदकीत करण्यात आला आहे. 


भाऊबंदकीचा वाद !

ग्रामीण भागात सख्खे भाऊ पक्के वैरी होताना दिसत असतात, भाऊबंदकीच्या वादात एकमेकांच्या जीवावर उठले जाते तसेच एका आईच्या पोटी जन्म घेवूनही परस्पराशी शत्रुत्वाने वागले जाते. या वादात दोघांचे नुकसान होते परंतु हट्ट आणि अहंकार सुखाला काडी लावतो तरी देखील ते स्वीकारले जाते हाच अनुभव येथेही आहे. विहिरीचा निकाल लागेपर्यंत पाणी असलेली विहीर विनावापर पडून आहे त्यामुळे दोघांच्याही शिवाराला पाणी मिळत नाही आणि त्यामुळे दोघानाही शेतीचे उत्पन्न मिळत नाही. काही झाले तरी निकाल लागेपर्यंत दोघांनीही पाणी घ्यायचे नाही याच भूमिकेवर ही भाऊबंदकी (Brotherhood dispute) ठाम आहे. 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !